संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) साजरा करत आहे स्थापनेचा 73 वा वर्धापन दिन


एनसीसीच्या महासंचालकांनी राष्ट्रीय युद्धस्मारकावर हुतात्मा वीरांना पुष्पहार अर्पण करून वाहिली आदरांजली

Posted On: 27 NOV 2021 4:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2021

 

ठळक मुद्दे:-

  • एनसीसीने सराव -योगदानाद्वारे कोविड-19 महामारी व्यवस्थापनावरील नेमून दिलेली मोहीम प्रभावीपणे पार पाडली
  • छात्रसैनिक आणि सहयोगी एनसीसी अधिकारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’,‘आत्मनिर्भर भारत’आणि ‘फिट इंडिया’सारख्या उपक्रमांमध्ये आदर्शवत नेतृत्व करतात.
  • सीमावर्ती जिल्हे आणि किनारी तालुक्यांमध्ये एक लाख अतिरिक्त छात्रसैनिक वाढवण्याचे कार्य यशस्वीरित्या पूर्ण
  • एनसीसी माजी विद्यार्थी संघटनेची 19 नोव्हेंबर 2021 रोजी झाशी येथे स्थापना.पंतप्रधान हे माजी छात्रसैनिकांच्या या संघटनेचे पहिले सदस्य आणि रक्षा मंत्री ठरले दुसरे सदस्य

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना, 28 नोव्हेंबर 2021 रोजी तिच्या स्थापनेचा 73 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने , एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी 27 नोव्हेंबर, 2021 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे संपूर्ण एनसीसी बांधवांच्या वतीने शहीद वीरांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

देशभरात एनसीसी स्थापना दिवस साजरा केला जात आहे आणि संचलन , रक्तदान शिबिरे आणि सामाजिक विकास कार्यक्रमांमध्ये छात्रसैनिक सहभागी होत आहेत. गेल्या वर्षभरात, एनसीसीने कोविड-19 महामारीमुळे लागू असलेले निर्बंध असूनही यशस्वीरीत्या कार्य करत नेमून दिलेली मोहीम प्रभावीपणे पार पाडली आहे.महामारीच्या व्यवस्थापनात सराव -योगदानातील विविध उपक्रमांद्वारे छात्रसैनिकांनी दिलेल्या योगदानाचे देशभरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

'एक भारत श्रेष्ठ भारत', 'आत्मनिर्भर भारत' आणि 'फिट इंडिया' यासारख्या उपक्रमांमध्ये छात्रसैनिक आणि सहयोगी एनसीसी अधिकारी,आदर्शवत नेतृत्व करतात.छात्रसैनिकांनी 'स्वच्छता अभियान', 'भव्य प्रदूषण पंधरावडा ' मध्ये मनापासून भाग घेतला आणि 'डिजिटल साक्षरता', 'आंतरराष्ट्रीय योग दिन', 'वृक्ष लागवड' आणि सध्याच्या कोविड लसीकरण मोहिमेसारखे विविध सरकारी उपक्रम इत्यादी बद्दल जनजागृती करण्यात मोलाची भूमिका बजावली.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 15ऑगस्ट 2020 रोजी, देशाच्या सीमावर्ती आणि किनारी प्रदेशांमध्ये राष्ट्रीय छात्रसेनेच्या विस्ताराची योजना जाहीर केली होती.सीमावर्ती जिल्हे, किनारी तालुके आणि हवाई दलाची केंद्रे असलेल्या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करून लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तिन्ही विभागांमध्ये एकूण एक लाख अतिरिक्त छात्रसैनिकांचे सामर्थ्य वाढवण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या सीमावर्ती आणि किनारी जिल्ह्यांमध्ये एनसीसीच्या विस्तारामुळे सशस्त्र दलात भरती होण्यासाठी या भागातील तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल.आपल्या तरुणांमध्ये बंधुता, शिस्त, राष्ट्रीय एकता आणि नि:स्वार्थ सेवेची मूल्ये रुजवण्यासाठी देश एनसीसीकडे पाहत आहे.

19 नोव्हेंबर 2021 रोजी झाशी येथे आयोजित एका भव्य समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते एनसीसी माजी छात्रसैनिक संघटनेच्या शुभारंभामुळे एनसीसीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. श्री नरेंद्र मोदी हे या प्रतिष्ठित माजी छात्रसैनिक संघटनेचे पहिले सदस्य बनले आहेत. संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांना या संघटनेचे दुसरे सदस्य आहेत. .

ही संघटना एनसीसी मध्ये सेवा दिलेल्या सर्व माजी छात्रसैनिकांना आणि गणवेशधारी सेवेतील व्यक्तींना, संघटनेची ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एका व्यासपीठावर आणेल आणि सामान्यांच्या हितासाठी समाज आणि समुदायाच्या विकासामध्ये प्रभावीपणे सहभागी होईल.

एनसीसीचे बहुआयामी उपक्रम आणि वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम, तरुणांना स्वयं-विकासासाठी अनोख्या संधी उपलब्ध करून देतात.अनेक छात्रसैनिकांनी क्रीडा आणि साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून देश आणि संस्थीसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आजच्या तरुणांना उद्याचे जबाबदार नागरिक बनवण्यासाठी एनसीसीने आपले अथक प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

 

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775591) Visitor Counter : 294