पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लखनौ येथे 56 व्या पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेला उपस्थिती

Posted On: 21 NOV 2021 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे आज  लखनौ येथे आयोजित 56 व्या पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषदेला उपस्थित होते. ही परिषद 20-21 नोव्हेंबर रोजी येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल/ केंद्रीय पोलीस संघटनेचे 62 महासंचालक/महानिरीक्षक उपस्थित होते. याशिवाय, देशभरातील गुप्तचर विभागाच्या कार्यालयांमधून विविध सेवा ज्येष्ठतेच्या 400 हून अधिक अधिकाऱ्यांनी आभासी माध्यमातून सहभाग  घेतला.

माननीय पंतप्रधानांनी परिषदेदरम्यान या चर्चेत भाग घेतला आणि आपल्या अमूल्य सूचना दिल्या. परिषदेपूर्वी, कारागृह सुधारणा, दहशतवाद, डावा कट्टरतावाद, सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, स्वयंसेवी संस्थांना मिळणारा परदेशी निधी, ड्रोन संबंधित मुद्दे, सीमावर्ती गावांचा विकास इत्यादींसारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्वाच्या विषयांच्या प्रमुख पैलूंवर चर्चा करण्यासाठी पोलीस महासंचालकांचे अनेक मुख्य गट तयार करण्यात आले.

आज दुपारी परिषदेच्या सामारोप सत्राला संबोधित करताना पंतप्रधानांनी घडलेल्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा बनवण्याच्या दृष्टीने, पोलिसांशी संबंधित सर्व घटनांचे विश्लेषण आणि अभ्यास करण्याचे आवाहन केले. या परिषदेच्या माध्यमातून  विविध श्रेणींमधील अधिकाऱ्यांमध्ये माहितीचा प्रवाह सुलभ झाला आहे असे  सांगून त्यांनी  संमिश्र स्वरूपात ही परिषद  आयोजित केल्याबद्दल प्रशंसा केली.  देशभरातील पोलिस दलांच्या फायद्यासाठी आंतर-कार्यक्षम तंत्रज्ञान विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.तळागाळातील पोलिसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी  भविष्यातील तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उच्च-अधिकारप्राप्त पोलीस तंत्रज्ञान अभियान स्थापन करण्याचे आवाहन केले. सर्वसामान्यांच्या  जीवनात तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत  पंतप्रधानांनी को-विन , जीईएम आणि युपीआयची उदाहरणे दिली.विशेषत: कोविड महामारीनंतर सामान्य जनतेप्रती पोलिसांच्या दृष्टिकोनात झालेल्या सकारात्मक बदलाचे त्यांनी कौतुक केले.लोकांच्या हितासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

2014 मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट पोलिसिंग संकल्पनेच्या नियमित आढावा घेण्यावर  त्यांनी भर दिला आणि पोलिस दलांमध्ये सातत्याने परिवर्तन आणि संस्थात्मकीकरणासाठी मार्गदर्शक आराखडा विकसित करण्याची सूचना केली.पोलिसांसमोरील काही दैनंदिन  आव्हानांवर मात करण्यासाठी हॅकाथॉनद्वारे तांत्रिक उपाय शोधण्याच्या दृष्टीने  उच्च तंत्रशिक्षण प्राप्त  तरुणांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकेही प्रदान केली.पंतप्रधानांच्या सूचनेनुसार प्रथमच, विविध राज्यांतील भारतीय पोलीस सेवेतील  अधिकाऱ्यांनी समकालीन सुरक्षेच्या मुद्यांवर आपले लेख सादर करून परिषदेचे महत्त्व वाढवले.

यापूर्वी, 19 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी देशातील तीन-सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांना चषक प्रदान केले. या परिषदेतील सर्व चर्चांमध्ये  गृहमंत्र्यांनी सहभाग घेऊन आपल्या बहुमोल सूचना आणि  मार्गदर्शन केले.

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1773779) Visitor Counter : 444