माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उदयोन्मुख दिग्दर्शकांना आपल्या कथानकांबद्दल ठाम विश्वास असणे आवश्यक : इफ्फी 52 च्या मास्टरक्लास मध्ये मधुर भांडारकर यांचा सल्ला
ओटीटी प्लॅटफॉर्म ही नव्या दमाच्या चित्रपट निर्मात्यांना उत्तम संधी
पणजी, 21 नोव्हेंबर 2021
उत्तम चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी उदयोन्मुख आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांकडे दर्जेदार कथानक असणे अत्यंत आवश्यक असून, त्यांचा आपल्या कथेवर दृढ विश्वास असायला हवा, असा सल्ला राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक, मधुर भांडारकर यांनी दिला . 52 व्या इफ्फीदरम्यान ‘चित्रपट निर्मिती’ या विषयावर झालेल्या मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते.
“माझ्या चित्रपटाच्या संकल्पनेचा जन्म कायम माझ्यापासूनच होतो. माझा माझ्यावर आणि माझ्या कथांवर पूर्ण विश्वास असतो. जेव्हा कधी माझ्या कथानकाबद्दल, माझ्या मनात पूर्ण विश्वास असतो, तेव्हाच मी चित्रपट निर्मिती करण्यास सुरुवात करतो.”, असे भांडारकर यावेळी म्हणाले.
आपला कॅमेरा जे क्षण चित्रबद्ध करतो, ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. त्यामुळे चित्रपटाची गती प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी असावी. मी नेहमीच कला आणि व्यावसायिक चित्रपटांमधील समतोल राखण्याचा प्रयत्न करतो तसेच, वास्तववादी चित्रपट बनवण्यावर माझा भर असतो.” असेही ते पुढे म्हणाले.
चित्रपट रासिकांशी संवाद साधतांना ते म्हणाले, “आजच्या काळात, ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे, नवोदित दिग्दर्शक आणि निर्मात्यांना उत्तम संधी मिळाली आहे.”
पेज थ्री आणि ट्रॅफिक सिग्नल अशा पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मधुर भांडारकर यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीविषयी माहिती देतांना सांगितले की चाँदनी बार चित्रपटामुळे माझा या क्षेत्रात पुढे जाण्याचा आत्मविश्वास वाढला, “या चित्रपटाच्या सुरुवातीपासून मी गुंतलो होतो. जरी हा चित्रपट अत्यंत गडद आणि निराशाजनक विषयावरचा होता, तरीही, तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असेल, असा तयार करण्याचा मी प्रयत्न केला, असे त्यांनी पुढे सांगितले.
आपल्या भविष्यातील योजनांविषयी बोलतांना ते म्हणाले, “या कोरोना महामारीच्या काळात, आपण सगळेच अत्यंत कठीण आणि खडतर परिस्थितीतून गेलो, त्यामुळे आता मी लवकरच विनोदी चित्रपट निर्मितीसाठी काम करणार आहे.”
चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या अखेरीस, राष्ट्रीय चित्रपट विजेत्या दिग्दर्शिका नीला माहताब पांडा यांच्या हस्ते मधुर भांडारकर आणि तरुण आदर्श यांचा सत्कार करण्यात आला.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773757)
Visitor Counter : 272