पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशातील झाशी येथे  ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ला पंतप्रधानांची उपस्थिती


राणी लक्ष्मीबाई आणि 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील  वीर  वीरांगणांना  वाहिली आदरांजली; मेजर ध्यानचंद यांचे केले स्मरण

एनसीसी माजी छात्र  संघटनेचे पहिले सदस्य म्हणून पंतप्रधानांनी  केली नोंदणी

“एकीकडे, आपल्या सैन्य दलांचे  सामर्थ्य  वाढत आहे,त्याचवेळी भविष्यात देशाचे रक्षण करणाऱ्या  सक्षम तरुणांसाठी मैदानही तयार केले जात आहे.''

“सरकारने सैनिक शाळांमध्ये मुलींचे प्रवेश सुरू केले आहेत.३३ सैनिक शाळांमध्ये या सत्रापासूनच मुलींचे प्रवेश सुरू झाले आहेत ''

“दीर्घ काळापासून, भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र खरेदीदार देश आहे. पण आज देशाचा मंत्र आहे - मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड”

Posted On: 19 NOV 2021 10:01PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे राष्ट्र रक्षा समर्पण पर्वला उपस्थिती दर्शवली. झाशी किल्ल्याच्या परिसरात आयोजित राष्ट्र रक्षा समर्पण पर्वया भव्य समारंभात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्रालयाच्या अनेक नवीन उपक्रमांचे राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माजी छात्र  संघटनेचा शुभारंभ, या संघटनेत पंतप्रधानांनी  पहिले सदस्य म्हणून नोंदणी केली ; यासह एनसीसी छात्रांसाठी  सदृशीकरण प्रशिक्षणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुभारंभ; राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा  वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभारलेला मंडप ; राष्ट्रीय युद्ध स्मारक  मोबाईल अॅप; भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आरेखन आणि विकसित केलेले अत्याधुनिक  इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट 'शक्ती'; हलके लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा समावेश आहे. उत्तरप्रदेश संरक्षण औद्योगिक मार्गिकेच्या  झाशी नोड येथे भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या 400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी त्यांनी केली.

झाशीतील गरौथा येथे 600 मेगावॅटच्या अतिभव्य सौरऊर्जा पार्कची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.हे पार्क 3000 कोटी रुपयांपेक्षाजास्त खर्च करून बांधले जात आहे, आणि स्वस्त वीज आणि ग्रीड स्थिरता हे  दुहेरी फायदे प्रदान करण्यासाठी  मदत करेल.पंतप्रधानांनी झाशीतील अटल एकता पार्कचे उद्घाटनही केले. माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव असलेले, हे उद्यान 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आले आहे.  आणि सुमारे 40,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर या पार्कचा विस्तार आहे.यात एक ग्रंथालय तसेच श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा देखील असेल.हा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारणारे  प्रसिद्ध शिल्पकार श्री राम सुतार यांनी बांधला आहे.

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी शौर्य आणि पराक्रमाचे शिखर असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीचा उल्लेख केला आणि पंतप्रधान म्हणाले, आज ही झाशीची भूमी स्वातंत्र्याच्या भव्य अमृत महोत्सवाची साक्षीदार आहे ! आणि आज या भूमीवर एक नवा सामर्थ्यशाली  आणि शक्तिशाली भारत आकार घेत आहे.राणी लक्ष्मीबाईंच्या जन्मस्थानाचे म्हणजेच काशीचे प्रतिनिधित्व करताना त्यांना अभिमान वाटत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधानांनी गुरु नानक देवजींच्या प्रकाश पर्व, कार्तिक पौर्णिमा आणि देव-दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या.शौर्य आणि बलिदानाच्या इतिहासातील योगदानाबद्दल पंतप्रधानांनी अनेक वीर आणि विरांगनांना ना आदरांजली वाहिली.ही भूमी राणी लक्ष्मीबाईंच्या अविभाज्य सहकारी असलेल्या वीरांगना झलकारीबाईंच्या शौर्याची  आणि लष्करी पराक्रमाची  साक्षीदार आहे.1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातीलया अजरामर वीरांगनांच्या चरणी मी नतमस्तक होतो.या भूमीतून भारतीय शौर्याच्या आणि संस्कृतीच्या अमर गाथा लिहिणाऱ्या भारताचा गाऊराव करणाऱ्या चंदेल-बुंदेलांना मी नमन करतो ! मी बुंदेलखंडच्या अभिमानाला, आजही मातृभूमीच्या रक्षणासाठी त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या  त्या शूर अल्हा-उदलांना नमन करतो, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी झाशीचे सुपुत्र मेजर ध्यानचंद यांचेही स्मरण केले आणि क्रीडा उत्कृष्टतेतील सर्वोच्च पुरस्काराला  हॉकीच्या या दिग्गजाचे नाव दिल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

एकीकडे आपल्या सैन्य दलांचे सामर्थ्य  वाढत आहेत्याचवेळी  भविष्यात देशाचे रक्षण करणाऱ्या  सक्षम तरुणांसाठी मैदानही तयार केले जात आहे.असे पंतप्रधान म्हणाले. सुरू होत असलेल्या 100 सैनिकी  शाळा येत्या काळात देशाचे भवितव्य शक्तिशाली हातात सोपवण्याचे  काम करतील. ते म्हणाले की, सरकारने सैनिक शाळांमध्ये मुलींचे प्रवेश सुरू केले आहेत. ३३ सैनिक शाळांमध्ये या सत्रापासूनच मुलींचे  प्रवेश सुरू झाले आहेत.सैनिकी शाळांमधून  राणी लक्ष्मीबाईंसारख्या कन्याही निर्माण होतील, ज्या देशाचे  संरक्षण, सुरक्षा आणि विकासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील.

एनसीसी  माजी छात्र  संघटनेचे पहिले सदस्य म्हणून नोंदणी केलेल्या पंतप्रधानांनी माजी छात्रांनी देशाच्या सेवेत पुढे येण्याचे आणि शक्य असेल त्या पद्धतीने योगदान देण्याचे आवाहन केले.

आपल्या मागे ऐतिहासिक झाशी किल्ला असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, शौर्याअभावी भारत एकही युद्ध हरला नाही.राणी लक्ष्मीबाईंकडे इंग्रजांप्रमाणेच  साधनसामग्री आणि आधुनिक शस्त्रे असती , तर देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास कदाचित वेगळा असता, असे ते म्हणाले. भारत हा दीर्घकाळापासून जगातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र खरेदीदार देशांपैकी एक आहे.पण आज देशाचा मंत्र आहे - मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड.आज भारत आपल्या सैन्य दलांना आत्मनिर्भर  बनवण्यासाठी कार्यरत आहे.या उपक्रमात झाशीची एक प्रमुख भूमिका असेल, असेही ते म्हणाले.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी राष्ट्र रक्षा समर्पण पर्वसारखे कार्यक्रम खूप पुढे घेऊन जातील, असे पंतप्रधान म्हणाले. आपण आपले  राष्ट्रीय वीर  आणि वीरांगनांचे योगदान  अशाच भव्य पद्धतीने साजरे केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

 

***

G.Chippalkatti/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1773371) Visitor Counter : 269