पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या  महोबा येथे  विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण


"गेल्या 7 वर्षांत, महोबाने पाहिले आहे की कशा प्रकारे सरकार दिल्लीतील बंद खोल्यांमधून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे."

“शेतकऱ्यांना समस्यांमध्ये अडकवून ठेवणे हा काही राजकीय पक्षांचा नेहमीच आधार राहिला आहे. ते समस्यांचे राजकारण करतात आणि आम्ही उपाय शोधण्याचे राष्ट्रीय धोरण अवलंबतो.

“बुंदेलखंडमधील जनता प्रथमच सरकार विकासासाठी काम करताना पाहत आहे. यापूर्वीच्या  सरकारांना उत्तर प्रदेशला  लुटण्याचा  कंटाळा आला नाही, आम्ही काम करताना थकत नाही.

घराणेशाही सरकारने शेतकऱ्यांना केवळ वंचित ठेवले. ते शेतकर्‍यांच्या नावाने घोषणा द्यायचे, मात्र  शेतकर्‍यापर्यंत एक पैसाही पोहोचला  नाही.

"कर्मयोगींचे डबल इंजिन सरकार बुंदेलखंडच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम करत आहे"

Posted On: 19 NOV 2021 4:18PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील महोबा  येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण  केले. या प्रकल्पांमुळे या भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना आवश्यक  दिलासा मिळेल. या प्रकल्पांमध्ये अर्जुन सहाय्यक प्रकल्प, रतौली वायर प्रकल्प, भाऊनी धरण प्रकल्प आणि माझगाव-मिरची स्प्रिंकलर प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च   3250 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आणि ते कार्यान्वित झाल्यानंतर  महोबा, हमीरपूर, बांदा आणि ललितपूर जिल्ह्यांतील सुमारे 65000 हेक्टर जमिनीच्या  सिंचनासाठी मदत होईल आणि या क्षेत्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. या प्रकल्पांमुळे या प्रदेशाला पिण्याचे पाणीही उपलब्ध होईल. राज्यपाल  आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत, राज्याचे मंत्री  यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी गुलामगिरीच्या काळात भारतात  नवीन चेतना जागृत करणाऱ्या गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच भारताची शूर कन्या, बुंदेलखंडची शान राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती असल्याचा उल्लेखही  त्यांनी केला.

पंतप्रधान म्हणाले की, महोबाने  पाहिले आहे कशा प्रकारे सरकार गेल्या 7 वर्षांत दिल्लीतील बंद खोल्यांमधून  बाहेर पडून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे.  ही भूमी अशा योजनांची, अशा निर्णयांची साक्षीदार आहे, ज्यांनी देशातील गरीब माता-भगिनी-मुलींच्या जीवनात मोठे आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणले आहेत असे  पंतप्रधान म्हणाले. मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकच्या विळख्यातून मुक्त करण्याचे  वचन याच  महोबाच्या भूमीतून दिले होते , जे आज पूर्ण झाले याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. . उज्ज्वला 2.0 चा प्रारंभ देखील येथूनच  करण्यात आला होता.

काळाच्या ओघात हा परिसर पाण्याच्या समस्यांचे आणि स्थलांतराचे केंद्र कसे बनला  यावर पंतप्रधानांनी बारकाईने विश्लेषण केले. . हा प्रदेश जलव्यवस्थापनासाठी ओळखला जात असे त्या ऐतिहासिक काळाची त्यांनी आठवण करून दिली. हळुहळू, यापूर्वीच्या  सरकारांच्या काळात, या प्रदेशाला मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष आणि भ्रष्ट कारभाराचा सामना करावा लागला. परिस्थिती इथपर्यंत येऊन ठेपली  की  लोक आपल्या मुलींचे लग्न या भागात करण्यास टाळाटाळ करू लागले आणि इथल्या मुली मुबलक  पाणी असलेल्या भागातल्या मुलांशी   लग्न  करण्याची  इच्छा व्यक्त करू लागल्या. महोबाच्या लोकांना, बुंदेलखंडच्या लोकांना या प्रश्नांची उत्तरे माहित आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, मागील सरकारने बुंदेलखंड लुटून आपल्या  कुटुंबाचे भले केले. "त्यांना तुमच्या कुटुंबांच्या पाण्याच्या समस्येची कधीच काळजी नव्हती", यावर  पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधान म्हणाले की, बुंदेलखंडच्या जनतेने अनेक दशकांपासून त्यांना लुटणारी सरकारे पाहिली आहेत. बुंदेलखंडमधील जनता प्रथमच सरकार विकासासाठी काम करताना पाहत असल्याचे त्यांनी नमूद केले.  यापूर्वीच्या  सरकारांना उत्तर प्रदेशला  लुटण्याचा  कंटाळा आला नाही, आम्ही काम करून  थकत नाही. राज्यातील माफियांवर बुलडोझर फिरत असताना अनेक लोक रडत आहेत, मात्र या रडण्यामुळे  राज्यातील विकासकामे थांबणार नाहीत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, शेतकऱ्यांना समस्यांमध्ये अडकवून ठेवणे हा काही राजकीय पक्षांचा नेहमीच आधार राहिला आहे. ते समस्यांचे राजकारण करतात आणि आम्ही उपायांचे राष्ट्रीय धोरण अवलंबतो. सर्व संबंधितांशी चर्चा करून केन-बेतवा लिंकवर तोडगा आमच्याच सरकारने शोधला आहे.

 

पंतप्रधान म्हणाले की, घराणेशाही सरकारने शेतकऱ्यांना केवळ वंचित ठेवले. ते शेतकऱ्यांच्या नावाने घोषणा द्यायचे , मात्र  शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला  नाही. तर पंतप्रधान  किसान सन्मान निधी मधून आम्ही आतापर्यंत 1,62,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

बुंदेलखंडमधून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी या प्रदेशाला रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण  बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. बुंदेलखंड एक्स्प्रेस वे आणि उत्तरप्रदेश संरक्षण  कॉरिडॉर हा त्याचा मोठा पुरावा आहे.

पंतप्रधानांनी या प्रदेशातील समृद्ध संस्कृतीचाही उल्लेख केला  आणि कर्मयोगींच्या’ ‘डबल इंजिन सरकारअंतर्गत या प्रदेशाला प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली.

***

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773283) Visitor Counter : 215