पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक नवोन्मेष शिखर परिषद 2021 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 18 NOV 2021 10:53PM by PIB Mumbai

 

मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनसुख भाई, भारतीय औषध निर्माण आघाडीचे अध्यक्ष समीर मेहता, कॅडिया हेल्थकेअर लिमिटेडचे पंकज पटेल, आणि सर्व सन्माननीय उपस्थित

नमस्ते!

सर्वात प्रथम या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल भारतीय औषण निर्माण संघटनेचे मी अभिनंदन करतो.

कोविड-19 महामारीमुळे आरोग्य दक्षता क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वांच्या धान्यात आले आहे. मग त्यामध्ये आपली नित्याची जीवनशैली असो किंवा औषधे, वैद्यकीय तंत्रज्ञान असो अथवा लसी असो, आरोग्य सेवेच्या प्रत्येक पैलूकडे गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण विश्वाचे लक्ष वेधले गेले आहे. या संदर्भात भारतीय औषध उद्योगानेही या आव्हानांना तितक्याच ताकदीने पेलले आहे.

भारतीय आरोग्य दक्षता क्षेत्राची अलिकडच्या काळात एक नवीन ओळख झाली आहे. ती म्हणजे भारताला जगाचा औषध निर्मातादेश असे म्हटले जात आहे. या क्षेत्राने जवळपास 3 दशलक्ष लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. तसेच जवळपास 13 अब्ज डॉलर्सची व्यापारी उलाढाल करणारे भारतीय औषध निर्माण क्षेत्र म्हणजे देशाच्या आर्थिक वृद्धीचा प्रमुख घटक, अर्थव्यवस्थेचा चालक आहे.

सर्वसामान्यांना परवडणा-या दरामध्ये त्याचबरोबर उच्च गुणवत्तेची आणि पुरेशा प्रमाणात औषधांची उपलब्धता करून देणा-या भारतीय औषधनिर्माण क्षेत्राविषयी  जगभरातल्या लोकांना विशेष रस निर्माण झाला, 2014 पासून भारतीय आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये 12 अब्ज डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक आकर्षित झाली आहे. तसेच या क्षेत्रात आणखीही ब-याच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होवू शकणार आहे, तितकी क्षमता या क्षेत्राची आहे.

 

मित्रांनो,

वेलनेस म्हणजेच निरोगीपणा याची आमची व्याख्या काही फक्त भौतिक दृष्ट्या किंवा शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणे, इतकी मर्यादित नाही. तर या विश्वातल्या संपूर्ण मानवजातीचे कल्याण व्हावे, अशी आमची भावना आहे.

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः ।

आणि म्हणूनच कोविड-19 महामारीच्या काळामध्ये आम्ही याच भावनेने काम करून संपूर्ण जगाला आमचे विचार दाखवून दिले. महामारीच्या सुरवातीच्या काळातच आम्ही जगातल्या 150 पेक्षा जास्त देशांना जीवरक्षक औषधांचा आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा केला. यावर्षीही जवळपास 100 देशांना कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या 65 दशलक्ष मात्रांची निर्यात केली. आता आगामी काही महिन्यात आम्ही आमची लस निर्मितीची क्षमता वाढविणार आहोत. अशा विविध गोष्टी आम्ही करणार आहोत.

 

मित्रांनो,

जीवनात प्रत्येक पावलावर नवसंकल्पनांचे महत्व किती मोठे आहे हे, कोविड -19 च्या काळामध्ये सर्वांच्या चांगलेच लक्षात आले. कोरोना संकटामुळे जीवनशैली कशी असावी, याविषयी आपल्याला विचार करण्यास भाग पाडले. त्याचबरोबर आपल्या कार्यपद्धतीच्या कल्पना, कार्याचा विचार पुन्हा तपासणे आवश्यक वाटायला लागले. भारतीय औषध निर्माण क्षेत्राच्या संदर्भात बोलायचे झाले तर कामाचा वेग, कार्याचे प्रमाण आणि नवसंकल्पना प्रत्यक्षात आणण्याची प्रचंड इच्छाशक्ती हे प्रभावी ठरले. याचे उदाहरण द्यायचे झाले तर नवसंकल्पनेतूनच भारत पीपीई संचाचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदारही बनला आहे. नवतेच्या या ऊर्जेमुळेच कोविड-19 प्रतिबंधात्मक लस शोधणे, तिचे उत्पादन करणे तसेच ती जगात अनेक ठिकाणी पोहोचविण्यासाठी नियोजन-व्यवस्थापन करणे, निर्यात करणे यामध्ये आघाडीचा देश बनला आहे.

 

मित्रांनो,

नवोन्मेषी कल्पनेची हीच भावना वृद्धिंगत व्हावी, आणि त्यामधून औषध निर्माण क्षेत्राचाही विस्तार व्हावा, यासाठी भारत सरकार प्रोत्साहन देणारी पावले उचलत आहे. गेल्याच महिन्यात सरकारने भारतीय औषध निर्माण - वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या संशोधन आणि विकासयासंबंधीच्या नवसंकल्पानांना प्रेरणा देणा-या धोरणाचा मसुदा तयार केला आहे. नव्या धोरणामुळे सरकार या देशातल्या औषध निर्माण क्षेत्रात संशोधन आणि विकास करणे आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये आधुनिकता आणण्याविषय कटिबद्ध असल्याचे दर्शवते.

औषधांचा शोध लावणे आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये नवाचार आणणे, याबाबतीत भारताला आघाडीचा देश बनविण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करीत आहोत. यासाठी या क्षेत्रातल्या संबंधित भागीदारांबरोबर विस्तारपूर्वक चर्चा करून, त्यांचे सल्ले विचारात घेवून, आम्ही या क्षेत्राचे धोरण निश्चित केले आहे. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योगांच्या मागण्यांविषयी आम्ही संवेदनशील आहोत. त्यासाठी विशिष्ट चौकटीच्या अधीन राहून कार्य आम्ही करीत आहोत. औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरणांसाठी उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना तयार केली आहे. यासाठी तीस हजार कोटी रूपयांची तरतूद केल्यामुळे या क्षेत्रातल्या उद्योगांना चालना मिळत आहे.

 

मित्रांनो,

उद्योगाला शैक्षणिक जगताचा आणि विशेष करून आपल्या देशातल्या बुद्धिमान युवकांचा पाठिंबा मिळणे महत्वाचे आहे. यासाठीच आम्ही शिक्षण आणि उद्योग व्यवसाय यांच्यामध्ये सहकार्य निर्माण व्हावे, यासाठी प्रोत्साहन देत आहोत. भारतामध्ये संशोधक आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ यांचा मोठा गट आहे. त्यांच्याकडे उद्योग विश्वाला आणखी जास्त उंचीवर नेण्याची क्षमता आहे. त्यांच्याकडे असलेल्या या क्षमतेचा उपयोग  "डिसकव्हर अँड मेक इन इंडिया" मोहीम अधिक बळकट करण्यासाठी करून घेणे आवश्यक आहे.

 

मित्रांनो,

तुम्ही काळजीपूर्वक शोध घेवून कार्य करावे, अशा दोन क्षेत्रांना मी आज अधोरेखित करू इच्छितो. यामध्ये पहिला विषय कच्च्या मालाच्या आवश्यकतेसंबंधी आहे. आपण ज्यावेळी कोविड-19 विरोधात लढा देत होतो, त्यावेळी आमच्या लक्षात आले की, कच्च्या मालाच्या समस्येकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. आज ज्यावेळी भारतातल्या 130 कोटी लोकांनी देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा ध्यास घेतला आहे. त्यावेळी आपण लसी आणि औषधांसाठी लागणारे मुख्य घटक यांचे उत्पादन देशांतर्गतच झाले पाहिजे, असा विचार करण्याची गरज आहे. या आघाडीवरची लढाई भारताला जिंकायची आहे.

या संदर्भामध्ये येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी या क्षेत्रातले गुंतवणूदार आणि नवोन्मेषक संयुक्तपणे कार्य करण्यायसाठी उत्सुक आहेत, याची मला खात्री आहे. दुसरे क्षेत्र म्हणजे भारतामध्ये परंपरागत पद्धतीनेे वापरण्यात येणा-या औषधांचे आहे. सध्याच्या काळात आतंरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या या परंपरागत उत्पादनांना लक्षणीय मागणी असून ती वाढत आहे. अलिकडच्या वर्षांमध्येच या उत्पादनांच्या निर्यातीमध्ये झपाट्याने खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसू आले आहे. 2020-21 या एकाच वर्षात भारताने 1.5 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त मूल्यांच्या वनौषधींची निर्यात केली आहे. भारतामध्ये पारंपरिक औषधांचे वैश्विक केंद्र स्थापन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) कार्य करीत आहे. आपल्याकडची पारंपरिक औषधे अधिकाधिक लोकप्रिय व्हावीत यासाठी आपण काही वेगळा विचार करू शकतो का? यामध्ये जागतिक बाजारपेठेची आवश्यकता, वैज्ञानिक-शास्त्रीय मानके, आणि उत्तम दर्जाच्या उत्पादन पद्धतीचा अवलंब करणे, यांचा विचार करू शकतो का?

 

मित्रांनो,

‘‘आयडिया इन इंडिया, इनोव्हेट इन इंडिया, मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड’’ म्हणजेच भारताची कल्पना, भारतामधील नवसंकल्पना, ती संकल्पना भारतात निर्माण व्हावी आणि तिचा उपयोग मात्र संपूर्ण जगामध्ये केला जावा, यासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो. तुम्ही आपल्यातल्या ख-या शक्तीला, प्रचंड ऊर्जेचा शोध घेवून ओळखावे आणि जगाची सेवा करावी. आपल्याकडे खूप बुद्धिवंत, प्रतिभावान लोक आहेत, स्त्रोत-साधने आहेत आणि नवसंकल्पनेनुसार उद्योगाची उभारणी करण्यासाठी एक विशिष्ट परिसंस्था निर्माण करण्याची आपल्याला गरज आहे. आपक्या वेगवान प्रगतीचे, नवनिर्माणाच्या भावनेचे आणि औषध क्षेत्रात आपण मिळवलेल्या यशाचे दर्शन संपूर्ण जगाला झाले आहे, त्यामुळे सर्वांचे आता आपल्याकडे लक्ष लागले आहे. पुढची वाटचाल करताना नवीन उंची गाठण्यासाठी सध्याचा काळ सर्वात चांगला आहे. जागतिक आणि देशातल्या उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांना मी हमी देतो की, भारत नवसंकल्पनांसाठी, परिसंस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. या शिखर परिषदेमुळे संशोधन आणि विकास आणि नवसंकल्पना यामध्ये भारतीय औषध निर्माण उद्योग अधिक मजबूत होण्यासाठी मदतगार ठरणार आहे.

या शिखर परिषदेच्या आयोजकांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या दोन दिवसीय परिषदेमध्ये होणारी चर्चा फलदायी ठरावी, अशी इच्छा व्यक्त करतो.

धन्यवाद !

खूप -खूप धन्यवाद!

***

S.Tupe/S.bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773228) Visitor Counter : 255