पंतप्रधान कार्यालय

मध्यप्रदेशात भोपाळ इथे विविध रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 15 NOV 2021 8:08PM by PIB Mumbai

मध्यप्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगूभाई पटेल जी, मुख्यमंत्री
शिवराज सिंह चौहान जी, केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, इथे उपस्थित अन्य मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,

आजचा दिवस, भोपाळसाठी, मध्यप्रदेशासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी गौरवास्पद इतिहास आणि वैभवशाली भविष्याच्या संगमाचा दिवस आहे. भारतीय रेल्वेचे भविष्य किती उज्ज्वल आहे, याचे प्रतिबिंब भोपाळच्या या भव्य रेल्वे स्थानकावर जो कोणी येईल, त्याला निश्चित दिसेल. भोपाळच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा केवळ कायापालट झालेला नाही, तर गिन्नौरगढ़ ची राणी कमलापति जी यांचे नाव आता या स्थानकाला देण्यात आल्याने या स्थानकाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. गोंडवानाच्या गौरवामुळे आज भारतीय रेल्वेची प्रतिष्ठाही वाढली आहे आणि हे अशावेळी घडले आहे, जेव्हा आज देश आदीवासी गौरव दिन साजरा करत आहे. यासाठी मध्यप्रदेशच्या सर्व बंधू-भगिनींचे, विशेषतः आदिवासी समाजाचे मी खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

आज इथे या कार्यक्रमात भोपाळ-राणी कमलापति-बरखेड़ा मार्गाचे तिपदरीकरण, गुना-ग्वाल्हेर भागाचे विद्युतीकरण, फतेहाबाद चंद्रावतीगंज-उज्जैन आणि मथेला-निमारखेड़ी भागाचे विद्युतीकरण तसेच त्याचे ब्रॉडगेज मध्ये परिवर्तन करण्यात आले असून या सगळ्या प्रकल्पांचे आज लोकार्पण झाले. या सगळ्या सुविधा कार्यान्वित झाल्यामुळे मध्यप्रदेशातील रेल्वेच्या या सगळ्यात व्यस्त महामार्गावरचा ताण कमी होणार आहे तसेच, पर्यटन-तीर्थयात्रेच्या महत्वाच्या स्थळांची संपर्कव्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. विशेषतः महाकाल शिवाची नगरी उज्जैन आणि देशातील सर्वात स्वच्छ शहर इंदूर दरम्यान मेमू सेवा सुरु झाल्यामुळे, रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा थेट लाभ मिळणार आहे. आता इंदूरचे लोक महाकालाचे दर्शन करुन वेळेत घरी पोहोचू शकतील आणि जे कर्मचारी, व्यावसायिक, श्रमिक सहकारी रोज जाणे-येणे करतात, त्यांना देखील उत्तम सुविधा मिळाली आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारत कसा बदलतो आहे, स्वप्ने कशी साकार होऊ शकतात, हे बघायचे असेल तर याचे एक उत्तम उदाहरण, भारतीय रेल्वे देखील आहे. 6-7 वर्षांपूर्वीपर्यंत, ज्याचा ज्याचा भारतीय रेल्वेशी संबंध येत असे, ते नेहमी रेल्वेला दूषणेच देताना, काहीतरी तक्रारी करतानाच दिसत. स्थानकांवर गर्दी, कचरा, रेल्वेच्या प्रतीक्षेत कित्येक तासांची चिंता, स्थानकांवर देखील बसण्याची, खाण्यापिण्याची असुविधा, आपण अनेकदा पाहिले असेल, लोक बॅगेसोबत साखळी घेऊन येत, कुलूप लावत असत. अपघातांची भीती  असे.. असे सगळे होते. म्हणजे रेल्वेचे नाव उच्चारल्यावर हेच सगळे आठवत असे. आपल्या मनात रेल्वेची हीच एक प्रतिमा समोर येत असे. ही परिस्थिती इतकी विकोपाला गेली होती, की लोकांनी रेल्वेची स्थिती सुधारण्याची अपेक्षाही सोडून दिली होती. आपल्याला अशाच स्थितीत प्रवास करावा लागणार आहे, अशी लोकांनी आपल्या मनाशी तडजोड केली होती. मात्र जेव्हा देश प्रामाणिकपणे संकल्प पूर्ण करण्यासाठी एकत्र कष्ट करतो, तेव्हा सुधारणा निश्चित होतात, परिवर्तन घडते हे आपण गेल्या काही वर्षात सातत्याने बघत आहोत.

मित्रांनो,

देशातील सर्वसामान्यांना आधुनिक अनुभव देण्याचा जो संकल्प आम्ही केला आहे आणि त्यासाठी जे परिश्रम आम्ही अहोरात्र घेत आहोत, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी, गुजरात इथे गांधीनगर रेल्वे स्थानकाचे नवे स्वरूप देश आणि जगानेही पाहिले होते. आज मध्यप्रदेशात भोपाळ इथे रानी कमलापति रेल्वे स्थानकाच्या रुपात देशातले पहिले आयएसओ प्रमाणित, देशातील पहिले पीपीपी मॉडेलवर आधारित रेल्वे स्थानक देशाला समर्पित केले आहे. ज्या सुविधा कधीकाळी केवळ विमानतळांवर मिळत असत, त्या आता रेल्वे स्थानकांवर मिळत आहेत. आधुनिक शौचालये, उत्तम खाद्यपदार्थ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल, संग्रहालय, गेमिंग झोन, हॉस्पितल, मॉल, स्मार्ट पार्किंग, सगळ्या सुविधा इथे विकसित केल्या जात आहेत. यात भारतीय रेल्वेचा पहिला सेंट्रल एअर कॉंनकोर्स बनवण्यात आला आहे. या कॉनकोर्समधून अनेक प्रवासी एकाच वेळी बसून गाडीची प्रतीक्षा करु शकतात. यात भारतीय रेल्वेचा पहिला वहिला केंद्रीय एअर कॉनकोर्स बनविला गेला आहे. या कॉनकोर्समधून अनेक प्रवासी एकाच वेळी बसून गाडीची प्रतीक्षा करु शकतात आणि विशेष बाब म्हणजे सगळेच फलाट या कॉनकोर्सला जोडलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना अनावश्यक धावपळ करण्याची गरज नाही.

बंधू आणि भगिनींनो,

देशाचे सर्वसामान्य करदाते, देशातील मध्यमवर्गीय नागरिक यांना अशा पायाभूत सुविधांची, अशाच सेवा सुविधांची कायम अपेक्षा होती. हाच करदात्यांचा खरा सन्मान आहे. व्हीआयपी संस्कृतीकडून ईपीआय म्हणजे Every Person Is Important कडे परिवर्तनाचे हे मॉडेल आहे. रेल्वे स्थानकांच्या संपूर्ण व्यवस्थेला याचप्रकारे परिवर्तीत करण्यासाठी आज देशातील 175 पेक्षा जास्त रेल्वेस्थानकांचा कायापालट केला जात आहे.

मित्रांनो,

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पासह आज भारत, येत्या काही वर्षांसाठी स्वतःला सज्ज करत आहे, मोठी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. आजचा भारत, आधुनिक पायाभूत सुविधा निर्माणासाठी विक्रमी गुंतवणून तर करतो आहेच, सोबतच प्रकल्प रखडणार नाहीत, त्यांच्या मार्गात कुठल्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत हे देखील सुनिश्चित करतो आहे. नुकताच सुरु करण्यात आलेला पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा, याच संकल्पपूर्तीसाठी देशाला मदत करेल. पायाभूत सुविधांशी निगडीत सरकारची धोरणं असोत, मोठ्या प्रकल्पांचे नियोजन असो, त्यावर काम करणे असो, गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा सर्व बाबतींत मार्गदर्शक ठरेल. जेव्हा आपण बृहद आराखड्याला आधार मानून काम करायला लागू, तेव्हा देशाच्या स्रोतांचा योग्य वापर होईल. पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याअंतर्गत सरकार वेगवेगळ्या मंत्रालयांना एकाच मंचावर आणत आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांची माहिती, प्रत्येक विभागला वेळेवर मिळावी यासाठी देखील व्यवस्था बनविण्यात आली आहे. 

मित्रांनो,

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची ही मोहीम देखील केवळ स्थानकांच्या सुविधांपुरती मर्यादित नाही, तर याच प्रकारची विकास कामे गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यात देखील अंतर्भूत आहेत. ही, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, पायाभूत सिविधा निर्मितीची मोहीम आहे, जी देशाच्या विकासाला अभूतपूर्व गती देणार आहे. ही गतीशक्ती मल्टीमोडल संपर्काची आहे, एक सर्वंकष पायाभूत सुविधांची आहे. आता, ज्या प्रमाणे राणी कमलापती रेल्वे स्थानकाला जोडणारा रस्ता बनविण्यात आला आहे. यथे पार्किंगची भव्य सुविधा निर्माण करण्यात आली आहे. लवकरच हे स्थानक भोपाल मेट्रोशी देखील जोडले जाणार आहे. बस मोडसह रेल्वे स्थानकाच्या एकत्रीकरणासाठी स्थानकाच्या दोन्ही बाजूंना BRTS लेनची सुविधा आहे. म्हणजे प्रवास असो अथवा अन्य निगडीत इतर गोष्टी, सर्व सोपे, सहज आणि सुरळीत असावे असे प्रयत्न केले जात आहेत. हे सर्व सामान्य भारतीयासाठी, सामान्य नागरिकांसाठी जगण्याची सुविधा सुनिश्चित करणारं आहे. मला आनंद आहे की रेल्वेचे अनेक प्रकल्प याच प्रमाणे गतीशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याशी जोडले जात आहेत.

मित्रांनो,

एक काळ असा होता, जेव्हा रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प ड्रॉइंग बोर्डावरून प्रत्यक्षात येण्यास वर्षानुवर्षांचा काळ लागत होता. कुठला प्रकल्प कुठवर आला आहे, याचा आढावा मी प्रत्येक महिन्यात घेतो. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की रेल्वेचे काही प्रकल्प माझ्यासमोर आले, जे 30 - 35 वर्षांपूर्वी घोषित करण्यात आले होते. पण 40 वर्षात कागदावर एक रेष देखील आखली गेली नव्हती. आता हे काम मला करावं लागत आहे, मी करणारच याचा विश्वास बाळगा. आज भारतीय रेल्वेमध्ये नवीन प्रकल्प सुरु करण्याची जितकी घाई आहे, तितकंच गांभीर्य ते प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्याचं देखील आहे.

पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहू मार्गिका हे याचे अतिशय समर्पक उदाहरण आहे. देशात वाहतुकीचं चित्र बदलण्याची क्षमता असलेले पायाभूत सुविधा प्रकल्पांवर अनेक वर्ष वेगाने काम होऊ शकलं नाही. मात्र गेल्या 6 - 7 वर्षांत 1100 किलोमीटर पेक्षा जास्त मार्ग पूर्ण करण्यात आले आहेत आणि इतर भागात वेगाने काम सुरु आहे.

मित्रांनो,

कामाचा हा वेग आज इतर प्रकल्पांत देखील दिसून येत आहे. गेल्या 6 - 7 वर्षांत, सरासरी अडीच हजार किलोमीटरचे लोहमार्ग सुरु करण्यात आले आहेत. कामाचा हा वेग इतर प्रकल्पात देखील दिसून येत आहे. गेल्या 7 वर्षांत दर वर्षी सरासरी अडीच हजार किलोमीटरचे लोहमार्ग सुरु करण्यात आले. त्यापूर्वी हा वेग वर्षाला सरासरी दीड हजाराच्या आसपास होता. आधीच्या तुलनेत या वर्षांत रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण 5 पट अधिक वेगाने झालं आहे. मध्य प्रदेशात देखील रेल्वेचे 35 प्रकल्पांपैकी जवळपास सव्वा 11 शे किलोमीटरचे प्रकल्प पूर्ण झाले
आहेत.

मित्रांनो,

देशात मजबूत होत असलेल्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, व्यापारी – उद्योगपतींना फायदा होत असतो. आज आपण बघतो आहोत की शेतकरी रेल्वेद्वारे, देशाच्या कानाकोपऱ्यातले शेतकरी, दूरवर पर्यंत आपला माल पाठवू शकत आहेत. या शेतकऱ्यांना माल वाहतुकीवर रेल्वे घसघशीत सूट देते. याचा फायदा देशातल्या लहान शेतकऱ्यांना देखील होत आहे. त्यांना नवीन बाजारपेठ मिळाल्या आहेत, त्यांना नवीन सामर्थ्य मिळाले आहे.

मित्रांनो,

भारतीय रेल्वे, केवळ अंतर कमी करण्याचं माध्यम नाही, तर या देशाची संस्कृती, देशाचे पर्यटन, देशाचे तीर्थाटनाचे महत्वाचे मध्यम बनत आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर पहिल्यांदाच भारतीय रेल्वेचे सामर्थ्य इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. आधी रेल्वेचा पर्यटनासाठी जरी उपयोग करण्यात आला, तरी तो उच्च वर्गापर्यंतच मर्यादित होता.

पहिल्यांदाच सामान्य माणसाला योग्य किमतीला पर्यटन आणि तीर्थाटनाची दिव्य अनुभूती दिली जात आहे. रामायण सर्किट गाडी असाच एक नवा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी पहिली रामायण एक्स्प्रेस गाडी, देशभरातील रामायण काळातील अनेक स्थळांचे दर्शन घ्यायला निघाली आहे. या गाडीच्या प्रवासाबाबत देशवासी अत्यंत उत्साहित होते.

येणाऱ्या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागातून देखील आणखी रामायण एक्स्प्रेस गाड्या चालविल्या जातील. इतकंच नाही, विस्टाडोम गाडीचा अनुभव देखील लोकांच्या पसंतीस उतरतो आहे. भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधा, परिचालन आणि दृष्टीकोन यात हर प्रकारे व्यापक बदल केले जात आहेत. ब्रॉडगेज मार्गांवरून मनुष्य रहित फाटके काढून टाकल्याने, गाड्यांचा वेग देखील वाढला आहे आणि अपघात देखील खूप कमी झाले आहेत. आज निम उच्चवेग गाडी नेटवर्कचा भाग बनत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, येत्या 2 वर्षांत 75 नव्या वंदे भारत गाड्या देशभरात चालविण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. म्हणजे भारतीय रेल्वे आपला जुना जल नवीन रंग रुपात आणत आहे.

मित्रांनो,

उत्तम पायाभूत सुविधा हे भारताचं स्वप्नंच नाही तर गरज देखील आहे. हाच विचार घेऊन आमचे सरकार रेल्वे सोबतच पायाभूत सुविधांच्या हजारो प्रकल्पांत अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. मला विश्वास आहे, भारताच्या आधुनिक होत असलेल्या पायाभूत सुविधा, आत्मनिर्भरतेचे संकल्प अधिक वेगाने देशाच्या सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवेल.

पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आधुनिक रेल्वे स्थानक आणि त्या सोबतच अनेक नव्या रेल्वे सेवांसाठी आपले अभिनंदन करतो. रेल्वेच्या संपूर्ण चमूला देखील या परिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी, हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी, रेल्वेची चमू नव्या उत्साहाने कामाला लागली आहे, मी त्यांचे देखील अभिनंदन करतो, त्यांना देखील अनेक अनेक धन्यवाद देतो. आपणा सर्वांना अनेक अनेक शुभकामना.
अनेक अनेक धन्यवाद!

 

****

STupe/RAghor/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772525) Visitor Counter : 164