पंतप्रधान कार्यालय
पंढरपूर इथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या कोनशिला समारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
08 NOV 2021 7:35PM by PIB Mumbai
रामकृष्ण हरी।
रामकृष्ण हरी।
या कार्यक्रमाला आपल्यासोबत उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री नितिन गडकरी जी, आणखी एक सहकारी नारायण राणे जी, रावसाहेब दानवेजी, रामदास आठवले जी, कपिल पाटील जी, डॉ भागवत कराड जी, डॉक्टर भारती पवार जी, जनरल वी के सिंह जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजीत पवार जी, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माझे मित्र, श्री देवेन्द्र फडणवीस जी, विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक जी, महाराष्ट्र सरकारमधील सर्व सन्माननीय मंत्रीगण, संसदेतील माझे सहकारी खासदार,महाराष्ट्रातील आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपले सर्व संत महंत, आणि भाविक मित्रांनो !
दोन दिवसांपूर्वी ईश्वरकृपेने मला केदारनाथ इथे आदि शंकराचार्य जी यांच्या पुनर्निर्मित समाधीची सेवा करण्याची संधी मिळाली आणि भगवान विठ्ठलाने आपले नित्य वास्तव्य असलेल्या पंढरपूर इथे आपल्याला सर्वांसोबत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधीप्राप्त करून दिली.यापेक्षा अधिक आनंदाचा, ईश्वरी कृपेचा साक्षात्कार होण्याचे सौभाग्य आणखी कोणते असू शकेल? आदि शंकराचार्य यांनी स्वतः म्हटले आहे--
महा-योग-पीठे,
तटे भीम-रथ्याम्,
वरम् पुण्डरी-काय,
दातुम् मुनीन्द्रैः।
समागत्य तिष्ठन्तम्,
आनन्द-कन्दं,
परब्रह्म लिंगम्,
भजे पाण्डु-रंगम्॥
म्हणजेच, शंकराचार्य जी म्हणतात- पंढरपूरच्या या पवित्र भूमीवर श्री विठ्ठल साक्षात आनंद स्वरूप आहे. "
आणि म्हणूनच, पंढरपूर देखील आनंदाचेच प्रत्यक्ष
स्वरूप आहे. आज तर, या आनंदात सेवेचा आनंदही जोडला जात आहे.
मला अतिशय आनंद होतो आहें की, संत ज्ञानोबा माऊली आणि संत तुकोबारायांच्या पालखी मार्गाचे आज उदघाटन होत आहे. वारकर्यांना अधिक सुविधा तर मिळणार आहेतच, पण आपण जसे म्हणतो की, रस्ते हे विकासाचे द्वार असते. तसे पंढरी-कडे जाणारे हे मार्ग भागवतधर्माची पताका आणखी उंच फडकविणारे महामार्ग ठरतील. पवित्र मार्गाकडे नेणारे ते महाद्वार ठरेल.
मित्रांनो,
आज इथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा कोनशिला समारंभ झाला आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या निर्मितीचा व्हिडीओ आपण सगळ्यांनी आता पाहिला असेल, नितीनजी यांच्या भाषणात देखील ऐकले, की हे काम पाच टप्प्यात होणार आहे. तर, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची निर्मिती तीन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे.
या सर्व टप्प्यात, 350 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे महामार्ग बांधले जाणार आहेत, आणि त्यावर 11 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च केला जाणार आहे. यातील सर्वात विशेष बाब म्हणजे,या महामार्गांच्या दोन्ही बाजूला, पालखीसोबत पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी, भाविकांसाठी विशेष मार्ग तयार केले जाणार आहेत.त्याशिवाय, आज पंढरपूरला जोडणाऱ्या सुमारे 200 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचाही शुभारंभ झाला आहे,लोकार्पण झाले आहे. या महामार्गांच्या निर्मितीसाठी सुमार 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सातारा, कोल्हापूर, सांगली , विजापूर, मराठवाड्याचा भाग, उत्तर महाराष्ट्राचा प्रदेश या सर्व ठिकाणांहून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना या राष्ट्रीय महामार्गामुळे खूप सोयीचे होणार आहे. एकप्रकारे, हे महामार्ग श्री विठ्ठलाच्या भक्तांच्या सेवेसह या संपूर्ण तीर्थक्षेत्राच्या विकासालाही पूरक ठरणार आहेत.
विशेषतः या महामार्गांमुळे दक्षिण भारताशी असलेली संपर्कव्यवस्था अधिक उत्तम होईल. यामुळे आणखी भाविक इथे सहज येऊ शकतील आणि त्यामुळे या क्षेत्राच्या विकासाशी संबंधित इतर सर्व कामानांही गती मिळेल. म्हणूनच, या सर्व पुण्यकामांशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे मी अभिनंदन करतो. हा एक असा प्रयत्न आहे,जो आपल्याला आत्मिक समाधान देतो, आपले आयुष्य सार्थक झाल्याची भावना निर्माण करतो. मी श्री विठ्ठलाच्या सर्व भक्तांना, या क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांना पंढरपूर क्षेत्राच्या या विकास अभियानासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. मी सर्व वारकर्यांना वंदन करतो, त्यांना कोटी-कोटी अभिवादन करतो. या कृपादृष्टीसाठी श्री विठ्ठलाच्या चरणी मी वंदन करतो, त्यांना साष्टांग दंडवत घालतो. मी सर्व संतांच्या चरणीही वंदन करतो.
मित्रांनो,
भूतकाळात आपल्या भारतावर कितीतरी आक्रमणे झाली आहेत. शेकडो वर्षें गुलामीच्या साखळदंडांनी आपल्या देशाला जखडून ठेवले होते. नैसर्गिक संकटे आली,आव्हाने आली, अनेक अडचणी आल्या मात्र, श्री विठ्ठलावरची आपली श्रद्धा, आपल्या दिंड्या तशाच अखंड, अविरत सुरु आहेत.
आज देखील ही वारी जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठ्या लोक यात्रांपैकी एक मानली जाते, ही एक व्यापक लोकचळवळ आहे, असेही मानले जाते.
'आषाढी एकादशी' च्या दिवशी दिसणारे पंढरपूर वारीचे विहंगम दृश्य कोण विसरु शकेल? हजारो-लाखो भाविक कुठल्यातरी ओढीने झपाटल्यासारखे विठुरायाकडे
चालत राहतात सगळीकडे 'रामकृष्ण हरी','पुंडलिक वरदा हरी विठ्ठल' आणि 'ज्ञानबा तुकाराम' चा जयघोष होत असतो. संपूर्ण 21 दिवस एक वेगळी शिस्त, एक असामान्य संयम आपल्याला बघायला मिळतो. या सगळ्या दिंड्या/ वाऱ्या वेगवेगळ्या पालखी मार्गांनी चालत असतात, मात्र त्यांचं उद्दिष्ट एकच असतं. ही वारी म्हणजे, भारत अशा शाश्वत शिक्षणाचे प्रतीक आहे, हे आपल्या श्रद्धांना बांधत नाही, तर मुक्त करतात.जे आपल्याला शिक्षण देतात की मार्ग वेगवेगळे असू शकतात, पद्धती आणि विचार वेगवेगळे असू शकतात,मात्र आपले उद्दिष्ट एकच असते. शेवटी सगळेच पंथ 'भागवत पंथ'च असतात आणि म्हणूनच, आपल्याकडे अत्यंत विश्वासाने आपल्या शास्त्रात असे म्हटले गेले आहे-
एकम् सत् विप्राः बहुधा वदन्ति॥
मित्रांनो,
संत तुकाराम महाराज यांनी आपल्याला मंत्र दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात--
विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ
अइका जी तुम्ही भक्त भागवत, कराल तें हित सत्य करा। कोणा ही जिवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥
म्हणजे या जगात सगळेकाही विष्णूमय आहे. म्हणूनच जीवा-जीवात भेद करणे, भेदभाव करणे, अमंगल आहे. आपापसात ईर्ष्या नको, द्वेष नको, आपण सर्वांना समान मानावे हाच खरा धर्म आहे. आणि म्हणूनच, दिंडीमध्ये कुठलीही जातपात नसते,कुठलाही भेदभाव नसतो. प्रत्येक वारकरी समान असतो, प्रत्येक वारकरी एकमेकांचा गुरुबंधू असतो, 'गुरूभगिनी' असते. सगळी एकाच विठ्ठलाची लेकरे आहेत, त्यामुळे सर्वांची जात एकच आहे, गोत्र एकच आहे- ते म्हणजे,'विठ्ठल गोत्र'! श्री विठ्ठलाचा गाभारा प्रत्येकासाठी खुला आहे, इथे कुठलाही भेदभाव नाही. आणि जेव्हा मी " सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास" असे म्हणतो, त्यामागेही याच महान परंपरेची प्रेरणा असते,तीच भावना असते. ही भावनाच आपल्याला देशाच्या विकासासाठी प्रेरणा देते."सर्वांना एकत्र घेऊन, सगळ्यांचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रेरित करते.
मित्रांनो,
पंढरपूरचे हे तेज, पंढरीचा अनुभव आणि पंढरपूरची अभिव्यक्ती सर्वच अत्यंत अलौकिक आणि अद्भुत आहे. आपण म्हणतो ना,
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी।
खरेच पंढरपूर आपल्या सर्वांसाठी माहेरच आहे. आणि माझी तर पंढरपूरशी आणखी दोन खास नाती आहेत, मला सर्व संत मंडळींसमोर सांगायला आवडेल माझे हे विशेष नाते. माझं पहिलं नातं आहे, गुजरातचे, द्वारकेचे. भगवान द्वारकाधीशच इथे विठ्ठलाच्या रुपात विराजमान झाले आहेत.आणि माझे दुसरे नाते आहे, काशीचे. मी काशीचा खासदार आहे आणि हे पंढरपूर आपले 'दक्षिण काशी' आहे. म्हणूनच, पंढरपूरची सेवा माझ्यासाठी साक्षात श्री नारायण हरीची सेवा आहे. ही ती भूमी आहे, जिथे भक्तांसाठी आजही देव प्रत्यक्ष स्वरूपात विराजमान आहे. ही ती भूमी आहे जिच्याविषयी संत नामदेव म्हणाले आहेत- की जेव्हा संसाराची निर्मितीही झाली नव्हती, तेव्हापासून पंढरपूर अस्तित्वात आहे.असे म्हणण्यामागचे कारण म्हणजे, पंढरपूर भौतिकदृष्ट्या नाही तर भावनिक दृष्ट्या आपल्या मनात वसलेले आहे.ही ती भूमी आहे, जिने संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आणि संत एकनाथांसारख्या अनेक संतांना युग-संत बनवले. या भूमीने भारताला एक नवी ऊर्जा दिली, भारताला पुन्हा नवचैतन्य दिले. भारतभूचे असे वैशिष्ट्य आहे की वेळोवेळी, वेगवेगळ्या क्षेत्रात अशा महान अवतारांनी इथे जन्म घेतला आणि देशाला ते दिशा दाखवत राहिले. आपण बघा, दक्षिणेत मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, वल्लभचार्य, रामानुजाचार्य झालेत. पश्चिमेत नरसी मेहता, मीराबाई, धीरो भगत, भोजा भगत, प्रीतम, तर उत्तरेत, रामानंद, कबीरदास, गोस्वामी तुलसीदास, सूरदास, गुरु नानकदेव, संत रैदास, पूर्वेकडे, चैतन्य महाप्रभु, शंकर देव यांच्यासारख्या विविध संतांच्या विचारांनी देशाला समृद्ध केले. वेगवेगळे स्थान, वेगवेगळे कालखंड असले तरी उद्दिष्ट एकच! या सर्वांनी मरगळलेल्या भारतीय समाजात नवे चैतन्य निर्माण केले. भारताच्या भक्तीच्या शक्तीची खरी ओळख करून दिली. हीच भावना, आणि याच भावनेतून आपण हे ही बघू शकतो की, मथुरेतला श्रीकृष्ण, गुजरातमध्ये द्वारकाधीश म्हणून ओळखला जातो, उडुपी इथे तो बाळकृष्ण असतो आणि पंढरपूर इथे येऊन विठ्ठलाच्या रुपात विराजमान होतो. हाच विठ्ठल, दक्षिण भारतात कनकदास आणि पुरंदरदास यांच्यासारख्या संत कवींच्या माध्यमातून लोकांशी जोडला जातो. आणि कवी लिलाशुक यांच्या काव्यातून केरळमध्ये देखील प्रकट होतो.
हीच तर भक्ती आहे आणि तिला जोडणारी शक्ती आहे.हेच तर 'एक भारत-श्रेष्ठ भारताचे'भव्य दर्शन आहे.
मित्रांनो,
वारकरी चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वारीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या आपल्या भगिनी, देशाची मातृशक्ती.देशाची स्त्री शक्ती! पंढरीची वारी, संधींमध्ये असलेल्या समानतेचे प्रतीक आहे. वारकरी आंदोलनाचे ध्येयवाक्य आहे- 'भेदाभेद अमंगळ'!
हा सामाजिक समरसतेचा उद्घोष आहे आणि या समानतेमध्ये स्त्री आणि पुरुष दोन्हीची समानता अध्याहृत आहे. अनेक वारकरी, स्त्री आणि पुरुषही, एकमेकांना, 'माऊली' नावाने आवाज देतात. श्री विठ्ठलाचे आणि ज्ञानेश्वर माऊलीचे रूप एकमेकांमध्ये बघतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 'माऊली'चा अर्थ आहे- आई! म्हणजेच, हा मातृशक्तीचा देखील गौरव आहे.
मित्रांनो,
वारकरी चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते आहे पुरुषांच्या बरोबरीने वारीमध्ये वाटचाल करत राहणाऱ्या आपल्या भगिनी. देशाची मातृशक्ती, देशाची स्त्री शक्ती! पंढरीची वारी म्हणजे संधींच्या समानतेचे प्रतीक आहे. वारकरी आंदोलनाचे ध्येयवाक्य आहे, 'भेदाभेद अमंगळ' हा सामाजिक समरसतेचा उद्घोष आहे आणि या समरसतेमध्ये स्त्री-पुरुष समानता देखील अंतर्भूत आहे. अनेक वारकरी, स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकमेकांना माऊली नावाने हाक मारतात. एकमेकांमध्ये भगवान विठ्ठल आणि संत ज्ञानेश्वरांचे रुप पाहतात. तुम्हाला माहीत आहेच की 'माऊली' चा अर्थ आहे आई. म्हणजेच हे मातृशक्तीचे देखील गौरवगान आहे.
मित्रांनो,
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महात्मा फुले, वीर सावरकर यांच्यासारख्या अनेक महापुरुषांना त्यांचे कार्य यशस्वी पद्धतीने ज्या पातळीपर्यंत नेता आले त्यामध्ये वारकरी चळवळीने जे स्थान निर्माण केले होते त्याचे खूप मोठे योगदान राहिले आहे. वारकरी चळवळीमध्ये कोण नव्हते? संत सावता महाराज, संत चोखा, संत नामदेव महाराज, संत गोरोबा, सेन जी महाराज, संत नरहरी महाराज, संत कान्होपात्रा, समाजातील प्रत्येक समुदाय वारकरी चळवळीचा भाग होता.
मित्रांनो,
पंढरपूर ने मानवतेला केवळ भक्ती आणि राष्ट्रभक्तीचा मार्ग दाखवला नाही तर भक्तीच्या शक्तीची मानवतेला ओळख देखील करून दिली. या ठिकाणी नेहमीच लोक येतात ते काही तरी मागणे मागण्यासाठी येत नाहीत. ते येतात ते श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी, त्याची निष्काम भक्ती हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. काय, विठू माऊलीच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटते की नाही? म्हणूनच तर देव स्वतः भक्ताच्या आदेशाने युगानु युगे कंबरेवर हात ठेवून उभा आहे. भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांमध्ये ईश्वराला पाहिले होते. नर सेवा नारायण सेवा मानली होती. आज हाच आदर्श आपला समाज जगत आहे. सेवा- दिंडी यांच्या माध्यमातून जीवमात्रांच्या सेवेलाच साधना मानून वाटचाल करत आहे. प्रत्येक वारकरी ज्या निष्काम भावनेने भक्ती करतो, त्याच भावनेने निष्काम सेवा देखील करतो. ‘ अमृत कलश दान- अन्नदान’ च्या माध्यमातून गरिबांच्या सेवेचे कार्यक्रम तर येथे सुरूच असतात. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात तुम्हा सर्वांची सेवा समाजाच्या सामर्थ्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे. आपल्याकडे श्रद्धा आणि भक्ती कशा प्रकारे राष्ट्रसेवा आणि राष्ट्रभक्तीशी निगडित आहे, याचे सेवा दिंडी हे सर्वात मोठे उदाहरण आहे. गावांचे उत्थान, गावांची प्रगती यांचे सेवा दिंडी एक खूप मोठे माध्यम बनले आहे. आज गावांच्या विकासाचे जितके संकल्प करून देश पुढे जात आहे, त्या सर्वांची वारकरी बंधू- भगिनी अतिशय मोठी ताकद आहेत. देशाने स्वच्छ भारत मोहीम सुरू केली तर आज विठोबाचे भक्त 'निर्मल वारी' अभियानासोबत या मोहिमेला गती देत आहेत. याच प्रकारे बेटी बचाओ, बेटी बढाओ अभियान असो, जल संरक्षणासाठी आपले प्रयत्न असोत, आपली आध्यात्मिक चेतना आपल्या राष्ट्रीय संकल्पांना उर्जा देत आहे आणि आज ज्यावेळी मी आपल्या वारकरी बंधू भगिनींसोबत संवाद साधत आहे त्यावेळी आशीर्वाद म्हणून तुमच्याकडून तीन गोष्टी मागण्याची माझी इच्छा आहे. मागू का? हात वर करून सांगा, नक्की मागू का? तुम्ही देणार? पहा ज्या प्रकारे तुम्ही सर्वांनी हात वर करून एका प्रकारे मला आशीर्वाद दिले आहेत. तुम्ही मला नेहमीच इतके प्रेम दिले आहे की मला स्वतःला रोखताच आले नाही. सर्वात पहिला आशीर्वाद मला हा हवा आहे की ज्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची निर्मिती होणार आहे, त्याच्या शेजारी जो विशेष पायी चालण्याचा मार्ग बनवला जात आहे, त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येक मीटरवर सावली देणाऱ्या वृक्षांची रोपे नक्की लावा. तुम्ही माझे हे काम कराल का? माझा तर सबका प्रयास हाच मंत्र आहे. ज्यावेळी हा मार्ग पूर्ण होईल तोपर्यंत हे वृक्ष इतके वाढतील की पायी चालण्याच्या संपूर्ण मार्गाला सावली देऊ लागतील. या पालखी मार्गालगत असलेल्या अनेक गावांना या लोकचळवळीचे नेतृत्व करण्याचा माझा आग्रह आहे. प्रत्येक गावाने आपल्या भागातून जाणाऱ्या पालखी मार्गाची जबाबदारी घ्यावी, तिथे झाडे लावावी. म्हणजे हे काम खूपच लवकर होईल.
मित्रांनो,
मला तुमचा दुसरा आशीर्वाद हवा आहे आणि हा दुसरा आशीर्वाद मला हा हवा आहे की या पायी चालण्याच्या मार्गावर ठराविक अंतरावर पिण्याच्या पाण्याची आणि ती सुद्धा पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी, या मार्गावर अनेक पाणपोया उभारल्या जाव्यात. श्री विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन झालेले भाविक जेव्हा पंढरपूर च्या दिशेने चालत असतात तेव्हा तर 21 दिवसांपर्यत सर्व काही विसरतात. पिण्याचे पाणी देणाऱ्या अशा पाणपोया भाविकांसाठी खूपच उपयुक्त ठरतील.
आणि तिसरा आशीर्वाद मला आज तुमच्याकडून नक्कीच घ्यायचा आहे आणि तुम्ही माझी निराशा करणार नाही. तिसरा आशीर्वाद जो मला हवा आहे तो पंढरपूर साठी हवा आहे. भविष्यात मला पंढरपूरला भारतातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र बनवायचे आहे. भारतामध्ये जर कोणी विचारले की बाबांनो सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र कोणते आहे तर त्यावेळी सर्वात पहिल्यांदा माझ्या विठोबाचे, माझ्या विठ्ठलाच्या भूमीचे, माझ्या पंढरपूरचे नाव आले पाहिजे. मला तुमच्याकडून ही गोष्ट हवी आहे आणि हे काम देखील लोकसहभागातूनच होईल. ज्यावेळी स्थानिक लोक स्वच्छतेच्या चळवळीचे नेतृत्व स्वतःकडे घेतील त्यावेळीच हे स्वप्न साकार होऊ शकेल आणि मी नेहमीच ज्या गोष्टीचा पुरस्कार करतो, सबका प्रयास म्हणतो त्याची अभिव्यक्ती अशीच असेल.
मित्रांनो,
आपण जेव्हा पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रांचा विकास करतो, त्यावेळी केवळ सांस्कृतिक प्रगतीच होत नाही तर संपूर्ण भागाच्या विकासाला बळ मिळते. या ठिकाणी जो रस्ता रुंद केला जात आहे, जे नवे महामार्ग स्वीकृत होत आहेत, त्यामुळे येथे धार्मिक पर्यटन वाढेल, नवे रोजगार येतील आणि सेवा अभियानांना देखील गती मिळेल. आपल्या सर्वांचे आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांची देखील अशी धारणा होती की जिथे महामार्ग पोहोचतात, रस्ते पोहोचतात, तिथे विकासाचे नवे प्रवाह वाहू लागतात. याच विचाराने त्यांनी सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प सुरू केला होता, देशातील गावांना रस्त्यांनी जोडण्याचे अभियान सुरू केले होते. आज त्याच आदर्शांवर देशात आधुनिक पायाभूत सुविधांवर जलद गतीने काम होत आहे. देशात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी वेलनेस सेंटर सुरू केली जात आहेत, नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली जात आहेत. डिजिटल व्यवस्थेला प्रोत्साहन दिले जात आहे. देशात आज नवे महामार्ग, नवे रेल्वे मार्ग, मेट्रो मार्ग, आधुनिक रेल्वेस्थानके, नवे विमानतळ, नव्या हवाई मार्गांचे एक मोठे विस्तृत जाळे तयार होत आहे. देशातील प्रत्येक गावापर्यंत ऑप्टिकल फायबरचे जाळे पोहोचवण्यासाठी अतिशय वेगाने काम होत आहे. या सर्व योजनांना आणखी वेगवान बनवण्यासाठी, त्यात समन्वय आणण्यासाठी पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याची देखील सुरुवात करण्यात आली आहे. आज देशात शंभर टक्के व्याप्तीच्या दृष्टीकोनासह आगेकूच सुरू आहे. प्रत्येक गरिबाला पक्के घर, प्रत्येक घरात शौचालय, प्रत्येक कुटुंबाला विजेचे कनेक्शन, प्रत्येक घराला नळाने पाणीपुरवठा आणि माता भगिनींना गॅस कनेक्शन, ही स्वप्ने आज प्रत्यक्षात येत आहेत. समाजातील गरीब, वंचित, दलित, मागास, मध्यमवर्गाला त्याचे फायदे मिळत आहेत.
मित्रांनो,
आपले बहुतेक वारकरी गुरुबंधू तर शेतकरी कुटुंबातले आहेत. गावातील गरिबांसाठी देशाकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे आज सामान्य मानवाच्या जीवनात कशा प्रकारे परिवर्तन होत आहे हे सर्व तुम्हाला दिसत आहे. आपल्या गावातील गरिबासोबत, जमिनीशी जोडल्या गेलेल्या अन्नदात्यासोबत हेच होत आहे. तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देखील सारथी असतो, आणि समाजाची संस्कृती, देशाची एकता यांना देखील नेतृत्व देतो. भारताच्या संस्कृतीला, भारताच्या आदर्शांना अनेक शतकांपासून धरतीमातेच्या या पुत्रानेच जिवंत ठेवले आहे. एक सच्चा अन्नदाता समाजाला जोडत असतो, समाजाला जगत असतात, समाजासाठी जगत असतात. तुमच्यामुळेच समाजाची प्रगती होत आहे. म्हणूनच अमृत काळात देशाच्या संकल्पांमध्ये आमचे अन्नदाते आमच्या उन्नतीचा मोठा आधार आहेत याच भावनेने देश पुढे जात आहे.
मित्रांनो,
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला अतिशय चांगली गोष्ट सांगितली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे, “दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो, प्राणिजात.” अर्थात जगातून वाईटाचा अंधःकार नष्ट होऊ दे, धर्माच्या, कर्तव्याच्या सूर्याचा संपूर्ण विश्वात उदय होऊ दे आणि प्रत्येक जीवाची इच्छा पूर्ण होऊ दे. आम्हाला हा विश्वास आहे की आपली सर्वांची भक्ती, आपल्या सर्वांचे प्रयत्न संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या विचारांना नक्कीच सिद्ध करतील. याच विश्वासाने मी पुन्हा एकदा सर्व संतांना नमन करत विठ्ठलाच्या चरणावर नमन करत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानतो.
जय जय रामकृष्ण हरी।
जय जय रामकृष्ण हरी।
***
S.Tupe/N.Chitale/R.Aghor/S.Patil
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770371)
Visitor Counter : 453
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam