पंतप्रधान कार्यालय

ग्लासगो येथे कॉप-26 शिखर परिषदेमध्ये  ‘स्वच्छ तंत्रज्ञान नवोन्मेष आणि वापराला गती’ या विषयावर आयोजित सत्रात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 02 NOV 2021 11:45PM by PIB Mumbai

 

महामहिम

नमस्कार !

आज वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीडचा प्रारंभ करताना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीडया माझ्या मनात अनेक वर्षांपासून असलेल्या संकल्पनेला आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि यूकेच्या ग्रीन ग्रीड उपक्रमामुळे एक ठोस रुप मिळाले आहे. महामहिम,  औद्योगिक क्रांतीला जीवाश्म इंधनांमुळे उर्जा मिळाली होती. जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे एकीकडे अनेक देश समृद्ध झाले खरे पण आपली पृथ्वी, आपल्या पर्यावरणाने समृद्धी गमावली आहे. जीवाश्म इंधनाच्या चढाओढीमुळे भौगोलिक- राजकीय तणाव देखील निर्माण झाले. आज तंत्रज्ञानाने आपल्याला एक चांगला पर्याय दिला आहे.

 

महामहिम,

आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी सूर्योपनिषदामध्ये सांगितले गेले आहे, ‘सूर्याद् भवन्ति भूतानि, सूर्येण पालितानि तुअर्थात सर्व काही सूर्यापासूनच उत्पन्न झाले आहे. सर्वांच्या उर्जेचा स्रोत सूर्य आहे आणि सूर्याच्या उर्जेमुळेच सर्वांचे पालनपोषण होत आहे. पृथ्वीवर ज्यावेळी जीवन निर्माण झाले त्यावेळेपासूनच सर्व प्राण्यांचे जीवनचक्र, त्यांची दिनचर्या, सूर्योदय आणि सूर्यास्ताशी संबंधित राहिले आहे. जोपर्यंत हा नैसर्गिक संबंध टिकून होता तोपर्यंत आपला ग्रह देखील निरोगी होता. मात्र, आधुनिक काळात मनुष्याने सूर्याद्वारे स्थापित चक्राच्या पुढे जाण्याच्या चढाओढीमध्ये नैसर्गिक संतुलन बिघडवले आणि आपल्या पर्यावरणाची खूप मोठी हानी देखील केली. जर आपल्याला निसर्गाशी संतुलित जीवनाचा संबंध प्रस्थापित करायचा असेल तर त्याचा मार्ग आपल्या सूर्याद्वारेच उजळला जाईल. मानवतेच्या भवितव्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा सूर्यासोबत वाटचाल करावी लागेल.

 

महामहिम,

मानवजमातीकडून संपूर्ण वर्षभर जितक्या उर्जेचा वापर होत असतो तितकी उर्जा सूर्य एका तासात पृथ्वीला देत असतो आणि ही अगणित उर्जा पूर्णपणे स्वच्छ आहे, शाश्वत आहे. यामध्ये केवळ एकच समस्या आहे आणि ते म्हणजे सौर उर्जा केवळ दिवसाच उपलब्ध असते आणि हवामानावर देखील ती अवलंबून असते. वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीडहा याच समस्येवरील तोडगा आहे. एका विश्वव्यापी ग्रीडमधून सर्व ठिकाणी कोणत्याही वेळी स्वच्छ उर्जा मिळत राहील. यामुळे साठवणुकीची गरज देखील कमी होईल आणि सौर उर्जा प्रकल्पांच्या उपयुक्ततेत देखील वाढ होईल. या रचनात्मक उपक्रमामुळे कर्ब पद भार  आणि उर्जेचा खप कमी होईलच पण वेगवेगळ्या प्रदेशांदरम्यान आणि देशांदरम्यान सहकार्याची नवी दालने खुली होतील. वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड आणि ग्रीन ग्रीड उपक्रमांच्या सामंजस्यामुळे  एका संयुक्त आणि सशक्त वैश्विक ग्रीडची निर्मिती होऊ शकेल. आमची अंतराळ संस्था इस्रो जगाला एक सौर कॅल्क्युलेटर ऍप्लिकेशन देणार आहे अशी माहिती मी आज देत आहे.  या कॅल्क्युलेटरने, उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे जगातील कोणत्याही भागाच्या सौर उर्जा क्षमतेचे मोजमाप करता येणार आहे. या ऍप्लिकेशनमुळे सौर प्रकल्पांचे स्थान निश्चित करण्यामध्ये मदत मिळणार आहे आणि यामुळे वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीडला देखील बळकटी मिळेल.

 

महामहिम,

मी पुन्हा एकदा आयएसएचे अभिनंदन करतो आणि माझे मित्र बोरिस यांना त्यांच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. मी इतर सर्व देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.

 

धन्यवाद!

***

Jaydevi PS/S.PatilP/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1769193) Visitor Counter : 230