कोळसा मंत्रालय
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कोल इंडियाचा प्रयत्न- डंपरमध्ये डिझेल ऐवजी एलएनजी वापराचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प
डिझेलचा वापर 40 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता; इंधनावर खर्च होणाऱ्या 500 कोटी रुपयांची वार्षिक बचत अपेक्षित
Posted On:
02 NOV 2021 4:25PM by PIB Mumbai
कार्बन उत्सर्जन आणखी कमी करण्यासाठी कोळसा मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या कोल इंडिया लिमिटेडने (सीआयएल) अलीकडेच त्यांच्या खाणींमध्ये कोळशाची वाहतूक करणारे मोठे ट्रक म्हणजेच डंपरमध्ये द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) वापरण्यासाठी संच बसवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोल इंडिया लिमिटेड ही जगातील सर्वात मोठी कोळसा खाणकाम करणारी कंपनी 3500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून दरवर्षी 4 लाख किलोलिटर डिझेलचा वापर करते.
कंपनीने भारतीय वायू प्राधिकरण मर्यादित म्हणजेच गेल (इंडिया) लिमिटेड आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल ) यांच्या सहकार्याने जीएआयएल आणि बीईएमएल यांच्यासोबतच्या सामंजस्य कराराअंतर्गत महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (एमसीएल ) येथे कार्यरत असलेल्या त्यांच्या दोन 100 टन क्षमतेच्या डंपरमध्ये एलएनजी संच बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प हाती घेतला आहे.
कोल इंडिया लिमिटेडकडे 2500 हून अधिक डंपर, पृष्ठभागावर असलेल्या उघड्या कोळसा खाणींमध्ये कार्यरत आहेत आणि कोल इंडिया लिमिटेडद्वारे वापरल्या जाणार्या एकूण डिझेलपैकी सुमारे 65 ते 75 टक्के डिझेल हे डंपर वापरतात.एलएनजीमुळे डिझेलचा वापर 30 ते 40 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे आणि जर डंपर्ससह अवजड यंत्रांमध्ये एलएनजी संच बसवले तर इंधनाचा खर्च सुमारे 15 टक्क्यांनी कमी होऊन दरवर्षी 500 कोटी रुपयांच्या बचतीचा मार्ग मोकळा होईल.
प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि एलएनजीच्या वापरानंतर डंपरच्या कामगिरीचा तांत्रिक अभ्यास केल्यानंतर प्रकल्पाच्या खर्चाचे मूल्यमापन केले जाईल. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प वर्षअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.फलनिष्पत्तीच्या आधारे, कोल इंडिया लिमिटेड कंपनी तिच्या अवजड यंत्रांमध्ये , विशेषतः डंपरमध्ये एलएनजीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याबाबत निर्णय घेईल.हा प्रकल्प यशस्वी झाल्यास कोल इंडिया लिमिटेड केवळ एलएनजी इंजिन असलेली अवजड यंत्रसामग्री खरेदी करण्याची योजना आखत आहे आणि यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होण्यास आणि शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होईल.
जागतिक स्तरावर, उच्च क्षमतेच्या खनिज वाहक ट्रकमध्ये एलएनजीचा वापर करत अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, रशिया आणि घाना यांनी संमिश्र परिचालन सुरु केले आहे.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1768907)
Visitor Counter : 232