पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगर इथे 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे केले उद्‌घाटन


उत्तर प्रदेशचे दुहेरी इंजिन सरकार म्हणजे अनेक कर्मयोग्यांच्या दशकांच्या कठोर परिश्रमांचे फलित

वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या युवा डॉक्टरांना माधव प्रसाद त्रिपाठी यांचे नाव जनसेवेसाठी सदैव प्रेरणा देत राहील

याआधी मेंदूज्वरामुळे प्रतिमा खराब झालेले पूर्वांचल, उत्तरप्रदेश हे पूर्व भारताला आरोग्याचा नवा प्रकाश देईल

जेव्हा सरकार संवेदनशील, गरिबांचे दुःख जाणणारे आणि मनात करुणाभाव बाळगणारे असते तेव्हा असे कार्य घडते

इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण ही राज्यात अभूतपूर्व घटना, आतापर्यंत जे घडू शकले नव्हते ते आता शक्य होत आहे याचे एकच कारण ते म्हणजे –राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय प्राधान्य

2017 पर्यंत उत्तर प्रदेशात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात केवळ 1,900 जागा होत्या, दुहेरी इंजिन सरकारने केवळ गेल्या चार वर्षात 1900 पेक्षा जास्त जागांची भर घातली

Posted On: 25 OCT 2021 2:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  25 ऑक्टोबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थ नगर इथे 9 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्‌घाटन केले. सिद्धार्थनगर, इटाह, हरदोई, प्रतापगड, फतेहपूर, देवरिया, गाझीपूर, मिर्झापूर आणि जौनपूर इथे ही नवी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार  दुहेरी इंजिन सरकार म्हणजे अनेक कर्मयोग्यांच्या  दशकांच्या कठोर परिश्रमांचे फलित असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी संबोधित करताना सांगितले. दिवंगत माधव प्रसाद त्रिपाठी जी यांच्या रूपाने सिद्धार्थ नगरने ही समर्पित लोक प्रतिनिधी देशाला दिला, ज्यांचे अथक कठोर परिश्रम आज देशासाठी उपयुक्त ठरत आहेत.सिद्धार्थ नगरच्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाला माधव बाबू यांचे नाव देणे ही त्यांच्या सेवेप्रती खरी आदरांजली ठरेल. वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या युवा डॉक्टरांना माधव प्रसाद त्रिपाठी यांचे नाव जनसेवेसाठी सदैव प्रेरणा देत राहील असे पंतप्रधान म्हणाले.

9 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे,सुमारे  अडीच हजार नव्या खाटा उपलब्ध झाल्या असून, डॉक्टर आणि निम वैद्यकीय वर्गासाठी 5  हजार पेक्षा जास्त नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे शेकडो युवकांसाठी दर वर्षी वैद्यकीय शिक्षणाचा नवा मार्ग खुला झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.

मेंदूज्वरामुळे झालेल्या दुःखद मृत्यूमुळे पूर्वीच्या सरकारांनी पूर्वांचलची प्रतिमा खराब केली असे पंतप्रधान म्हणाले. तेच पूर्वांचल, तोच उत्तर प्रदेश पूर्व भारताला आरोग्याची नवी दिशा देणार आहे, असे  मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी संसदेतील त्या प्रसंगाची आठवण सांगितली जेव्हा उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदार म्हणून  संसदेत राज्याच्या  वैद्यकीय दुरावस्थेची व्यथा मांडली होती. पंतप्रधान म्हणाले की, आज उत्तर प्रदेशातील जनता पाहत आहे की, योगीजींना जनतेने सेवेची संधी दिली आणि त्यांनी मेंदूला होणाऱ्या विषाणूच्या संसर्गावर प्रतिबंधात्मक  उपाययोजना करून या भागातील हजारो मुलांचे प्राण वाचवले. जेव्हा सरकार संवेदनशील असते, गोरगरिबांचे दु:ख समजून घेण्याची करुणेची भावना मनात असते, तेव्हा अशी कार्यपूर्ती  घडते, असे  पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, राज्यात इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे लोकार्पण होणे हे अभूतपूर्व आहे. हे आधी कधी घडले नव्हते आणि आता ते का होत आहे, याचे एकच कारण आहे – राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय प्राधान्य यावर पंतप्रधानांनी भर दिला. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की 7 वर्षांपूर्वी दिल्लीतील आधीची सरकारे आणि 4 वर्षांपूर्वीचे  उत्तर प्रदेशातील सरकार मतांसाठी काम करायचे आणि मतांसाठी एखादा दवाखाना किंवा एखाद्या छोट्या रुग्णालयाची घोषणा करून समाधान मानायचे. पंतप्रधान  म्हणाले, वर्षानुवर्षे  इमारत बांधली जात नव्हतीइमारत असेल मात्र यंत्रसामुग्री नाही, या दोन्ही गोष्टी आहेत मात्र डॉक्टर आणि इतर कर्मचारी नाहीत .  गरीबांकडून हजारो कोटी रुपये लुटणाऱ्या भ्रष्टाचाराचे चक्र  अहोरात्र सतत चालत होते.

पंतप्रधान म्हणाले की 2014 पूर्वी आपल्या देशात वैद्यकीय जागा 90,000 पेक्षा कमी होत्या. गेल्या 7 वर्षांत देशात 60,000 नवीन वैद्यकीय जागा यात जोडल्या गेल्या आहेत. इकडे उत्तर प्रदेशातही 2017 पर्यंत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात केवळ 1,900 वैद्यकीय जागा होत्या. मात्र  दुहेरी इंजिनच्या सरकारमध्ये गेल्या चार वर्षांत 1900 हून अधिक जागा वाढल्या आहेत.

 

Jaydevi PS/N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1766287) Visitor Counter : 357