नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक स्तरावर 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्स गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्याच्या आश्वासनाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या चौथ्या परिषदेची सांगता

Posted On: 22 OCT 2021 3:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  22 ऑक्टोबर 2021

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची (आयएसए) चौथी सर्वसाधारण सभा 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2021 दरम्यान आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. याच्या अध्यक्षस्थानी भारताचे ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आणि आयएसए परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री आर. के सिंग होते. परिषदेत एकूण 108 देश सहभागी झाले, यात 74 सदस्य देश, 34 निरीक्षक आणि संभाव्य देश, 23 भागीदार संघटना आणि 33 विशेष आमंत्रित संघटनांनीही भाग घेतला. अमेरिकेचे हवामान विषयक विशेष अध्यक्षीय दूत जॉन केरी यांनी बीजभाषण केले. तर युरोपिय हरित करारासाठीचे युरोपियन आयोगाचे कार्यकारी उपाध्यक्ष फ्रान्स टिमर्मन्स यांनी 20 ऑक्टोबर रोजी उपस्थितांना संबोधित केले.

उर्जेच्या वापरासाठी सौर आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. आम्ही भारतात हे यशस्वीरित्या केले आहे आणि जागतिक पातळीवर याची पुनरावृत्ती होऊ शकते असे भारताचे ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

ऊर्जेच्या संक्रमणापेक्षा ऊर्जा उपलब्ध करून देण्याची समस्या सोडवणे अधिक महत्त्वाचे आहे. उर्जाच उपलब्ध नसलेल्यांसाठी ऊर्जा संक्रमणाचा मुद्दा गौण आहे. आएसए जगभरातील 800 दशलक्ष लोकांसाठी ऊर्जा उपलब्धता सक्षम करू शकते. विकसित देशांनी मागील हवामान परिषदांमध्ये कबूल केलेला ऊर्जा संक्रमण निधी वळता करण्याची वेळ आली आहे, यावर त्यांनी जोर दिला.  आयएसए यासाठी कर्जाची हमी देईल आणि या देशांमध्ये हरित उर्जा गुंतवणूकीला चालना देण्यासाठी मदत करेल.  आर्थिक विकास स्वच्छ ऊर्जेद्वारे व्हावा की कोळसा आणि सरपण जाळून हे विकसित राष्ट्रांनी ठरवले पाहिजे असे आर के सिंह म्हणाले.

आयएसएचे महासंचालक डॉ.अजय माथूर म्हणाले, की सौर ऊर्जा, जगातील कमी कार्बन असलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देईल. सौर उर्जा, देशातील वीज निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी सर्वात कमी खर्चाची आणि सर्वात किफायतशीर उपाय आहे. एक अब्ज लोकांना ऊर्जा दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मदत करण्याची क्षमता यात आहे. परंतु यासाठी पुरेशी गुंतवणूक आणि योग्य धोरणे आखली तरच हे शक्य आहे. आयएसएने 2030 पर्यंत सौर क्षेत्रात एक ट्रिलियन डॉलर्स गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे, जगाला आवश्यक ऊर्जा संक्रमणांच्या जवळ आणण्यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरेल असे ते म्हणाले.

इंग्लडचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यता मंत्री, संसद सदस्य; जॉर्ज फ्रीमन, म्हणाले, की इंग्लडने स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. हरित ऊर्जेचे संक्रमण, विजेचे ग्रिड कसे बनवायचे आणि कसे चालवायचे हे शोधून काढणे आणि आपल्या जागतिक ऊर्जेच्या गरजा शाश्वत, परवडण्यायोग्य आणि विश्वासार्हतेने पूर्ण करणे ही मुख्य आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे हवामान विषयक विशेष अध्यक्षीय दूत जॉन केरी म्हणाले, की "हवामान संकटाचा सामना करण्यासाठी जगाकडे सौर ऊर्जा हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. सौरऊर्जेवर आधारित अर्थव्यवस्था उभारण्याने केवळ कार्बन उत्सर्जन कमी होणार नाही, तर ते मोठ्या प्रमाणावर  आर्थिक संधी खुल्या करेल.

अपारंपारिक उर्जा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे लागेल असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव इंदू शेखर चतुर्वेदी म्हणाले. ते ऊर्जा संक्रमणाला समर्थन देण्यासाठी महिलांची क्षमता वाढवण्या संबंधित सत्राला संबोधित करत होते. रोजगारक्षमता सुनिश्चित करण्यासाठी क्षमता आवश्यक आहे. पुढे जाऊन मंत्रालय आपल्या कौशल्य आणि क्षमताबांधणी निर्माण कार्यक्रमांमध्ये महिलांच्या सहभागावर अधिक भर देईल असे ते म्हणाले.

परिषदे दरम्यान, : सौर पीव्ही पॅनेलचे व्यवस्थापन आणि बॅटरीच्या वापराने होणारा कचरा तसेच सौर हायड्रोजन कार्यक्रम हे  दोन नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आले.

एक सूर्य एक जग एक ग्रिड (ओएसओओओओजी) उपक्रमावर परिषदेत चर्चा झाली.  2018 च्या अखेरीस आयएसएच्या पहिल्या परिषदेत सौरउर्जेसाठी एकल जागतिक ग्रिडची संकल्पना प्रथम मांडली गेली होती. यात जगभरातील सौर ऊर्जा सामायिक करण्यासाठी आंतर-प्रादेशिक ऊर्जा ग्रिडची निर्मिती आणि विस्ताराची संकल्पना आहे.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने (आएसए) सदस्य देशांमध्ये सौर ऊर्जा मधील क्षेत्रात एक ट्रिलियन डॉलर्सची जागतिक गुंतवणूक व्हावी याकरता ब्लूमबर्ग फिलांथ्रोपिज् सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.  दोन्ही संस्था जागतिक संसाधने संस्थेसोबत (वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, डब्ल्यूआरआय) सौर गुंतवणूक कृती धोरण आणि  सौर गुंतवणूक आराखडाविकसित करण्यासाठी काम करतील, त्याचा प्रारंभ कॉप 26 येथे होईल.

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1765720) Visitor Counter : 397