पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

100 कोटी लसींच्या मात्रांचा मैलाचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधानांचा राष्ट्राला उद्देशून संदेश

"100 कोटी लसींच्या मात्रा केवळ आकडा नाही तर देशाच्या सामूहिक शक्तीचे प्रतिबिंब"

"हे भारताचे यश, आणि प्रत्येक भारतीयाचे यश"

"जर आजार भेदभाव करत नाही, तर लसीकरणातही कुठलाच भेदभाव नको.म्हणूनच लसीकरण मोहिमेत व्हीआयपी संस्कृती असणार नाही, हे आम्ही सुनिश्चित केले."

'औषधनिर्मितीचे केंद्र' अशी भारताची जगभरात ओळख यामुळे अधिकच दृढ झाली आहे.

"महामारीविरुद्धच्या देशाच्या लढ्यात,केंद्र सरकारने लोकसहभाग ही संरक्षणाची पहिली ढाल बनवली"

"भारताची संपूर्ण लसीकरण मोहीम विज्ञान-मूलक, विज्ञानप्राणित आणि विज्ञानाधिष्ठित आहे.

"आज भारतीय कंपन्यांमध्ये विक्रमी गुंतवणूक तर येत आहेच, शिवाय युवांसाठी रोजगाराच्या नव्या संधीदेखील निर्माण होत आहेत. स्टार्ट-अप्स मधल्या विक्रमी गुंतवणुकीतून युनिकॉर्न्स उदयास येत आहेत."

"जशी स्वच्छ भारत अभियान एक लोकचळवळ आहे, तशाचप्रकारे, भारतात निर्मित वस्तू, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू विकत घेणे, व्होकल फॉर लोकल होणे हे देखील प्रत्यक्षात आचरणात आणणे महत्त्वाचे,"

"सुरक्षा कवच कितीही उत्तम असले,आधुनिक शस्त्रास्त्रे सुरक्षिततेची पूर्ण हमी देणारी असली तरीही जोवर युद्ध सुरु आहे, तोवर कोणीही शस्त्रे खाली ठेवत नाही, निष्काळजी होण्याची गरज नाही, आपले सर्व सणवार संपूर्ण काळजी घेऊनच साजरे करा"

Posted On: 22 OCT 2021 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  22 ऑक्टोबर 2021

देशाने 100 कोटी लसींच्या मात्रा देण्याचा ऐतिहासिक मैलाचा टप्पा पूर्ण केल्याचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून संदेश दिला.

देशवासियांशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी सुरुवातीलाच, 100 कोटी लसींच्या मात्रा देण्याचे हे अशक्यप्राय पण असामान्य यश मिळवल्याबद्दल सर्व संबंधितांचे कौतुक केले. ही कामगिरी फत्ते करण्याचे श्रेय त्यांनी देशाला आणि देशबांधवांना दिले. हे यश भारताचे आहे, प्रत्येक भारतीयाचे आहे, असं पंतप्रधान म्हणाले. 100 कोटी लसींच्या मात्रा हा केवळ एक आकडा नाही,तर देशाच्या सामूहिक शक्तीचे ते प्रतिबिंब आहे, इतिहासाच्या नव्या अध्यायाची ही निर्मिती आहे. हे अशा नव्या भारताचे चित्र आहे, जो आपल्यासमोर कठीण उद्दिष्टे ठेवतो आणि ती उद्दिष्टे कशी साध्य करायची हे ही जाणतो, असे पंतप्रधान म्हणाले.

आज अनेक लोक भारताच्या लसीकरण मोहिमेची तुलना इतर देशांच्या लसीकरण कार्यक्रमाशी करत आहेत. ज्या गतीने भारताने 100 कोटींचा, म्हणजेच एक अब्ज लसींच्या मात्रांचा टप्पा पार केला आहे, त्या गतीचे सर्वत्र कौतुक होत  आहे. मात्र, असे असले तरीही, या विश्लेषणात भारताने लसीकरण मोहिमेची सुरुवात कुठून आणि कशी केली, या मुद्द्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते,असे पंतप्रधानांनी नमूद केले. विकसित देशांकडे लस बनवण्यासाठीच्या अनेक दशकांच्या अध्ययनाचा आणि संशोधनाचा अनुभव होता. याआधी भारत बरेचदा, या विकसित देशांनी तयार केलेल्या लसींवरच अवलंबून असायचा. म्हणूनच, शतकातील सर्वात मोठ्या महामारीचे संकट जगावर आले, त्यावेळी, या महामारीचा सामना करण्यासाठीच्या भारताच्या क्षमतेवर अनेक प्रशचिन्हे उपस्थित केली गेली. इतर देशांकडून लस विकत घेण्यासाठी भारताकडे इतका पैसा कुठून येणार? भारताला लस कधी मिळणार? भारतातील लोकांना लस मिळेल की नाही? या महामरीचा संसर्ग रोखण्यासाठी भारत पुरेशा लोकांचे लसीकरण करु शकेल का? या सगळ्या प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे भारताने 100 कोटी मात्रांचे लसीकरण पूर्ण करुन दिली आहेत,असे पंतप्रधान म्हणाले. भारताने केवळ आपल्या नागरिकांना 100 कोटी लसींच्या मात्रा दिल्या नाहीत, तर या मात्रा मोफत दिल्या आहेत, यावरही त्यांनी भर दिला. या यशामुळे, 'औषधनिर्मितीचे केंद्र' अशी असलेली भारताची जगभरातली  ओळख अधिकच दृढ झाली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

कोरोना महामारीची सुरुवात झाल्यावर अनेक लोकांच्या मनात शंका-कुशंका होत्या की भारतासारख्या लोकशाही देशात अशा महामारीचा सामना करणे अतिशय कठीण होईल. इथले लोक एवढा संयम आणि आणि शिस्तपालन करु शकतील का? असे प्रश्नही उपस्थित केले गेले., मात्र भारतासाठी लोकशाहीचा अर्थ आहे, सबका साथ! असे त्यांनी सांगितले. देशाने 'मोफत लस, सर्वांसाठी लस" ही मोहीम सुरु केली. गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी अशा सर्वांना समानतेने लस दिली जाऊ लागली.देशाचा केवळ एकच मंत्र आहे, की जर आजार भेदभाव करत नाही,तर मग लसीकरणात देखील भेदभाव होऊ शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले.म्हणूनच, लसीकरण मोहिमेत व्हीआयपी संस्कृती शिरणार नाही, याची आम्ही काळजी घेतली, असं त्यांनी पुढे सांगितले.

भारतातील बहुतांश लोक लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर जाणार नाहीत असेही म्हटले गेले होते . आजही अनेक विकसित देशांसमोर, लोकांच्या मनात लसीकरणाबद्दल असलेली अनास्था आणि भीती हा कळीचा मुद्दा आहे.मात्र,भारतातील लोकांनी 100 कोटी मात्रा घेऊन या शंकेलाही उत्तर दिले आहे. ही मोहीम म्हणजे सर्वांचे एकत्रित प्रयत्न आहेत , आणि जेव्हा सर्वांच्या प्रयत्नांची ऊर्जा एकत्र होते त्यावेळी मिळणारे यश नेहमीच अद्भुत असते. कोरोना विरुद्धच्या देशाच्या लढाईत, सरकारने लोकसहभाग ही पहिली संरक्षक ढाल बनवली होती, असेही त्यांनी सांगितले.

भारताची ही संपूर्ण लसीकरण मोहीम, विज्ञानाच्या कुशीत जन्मली आहे, वैज्ञानिक निकष आणि तथ्यांवर आधारलेली आहे आणि शास्त्रीय पद्धतीनेच, चारही दिशांना लस पोचवण्यात आली आहे.  आपली ही लसीकरण मोहीम विज्ञानमूलक, विज्ञानाधिष्ठित आणि वैज्ञानिक आधारांवर आहे ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमामाची बाब आहे. जेव्हा लस विकसित झाली तेव्हापासून ते लस देण्यात आली तोपर्यंतची संपूर्ण मोहीम वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेली होती. एवढया मोठ्या प्रमाणावर लसींचे उत्पादन करणे हे ही एक महत्वाचे आव्हान होते. त्यानंतर, विविध राज्यांमध्ये लसींचे वितरण करणे, योग्य वेळेत दुर्गम भागांपर्यन्त लस पोचवणे हे ही आव्हानच होते. मात्र, शास्त्रीय पद्धतीने आणि  अभिनव कल्पना वापरुन या सर्व आव्हानांवर आपण मात केली. अत्यंत जलद गतीने संसाधने वाढवण्यात आली. भारतात विकसित करण्यात आलेल्या 'कोविन' प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना उत्तम सुविधा तर मिळालीच ;शिवाय वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कामही सोपे झाले, असे पंतप्रधान म्हणाले.

आज, भारतातील तसेच देशविदेशातील अनेक तज्ञ आणि अनेक संस्थाची भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी सकारात्मक भावना आहे. आज भारतात विक्रमी गुंतवणूक तर येते आहेच,शिवाय त्यातून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. स्टार्ट अप्स मध्ये होणाऱ्या विक्रमी गुंतवणुकीतून युनिकॉर्न उदयास येत आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातही नवी ऊर्जा संचारली आहे. गेल्या काही महिन्यांत, अनेक सुधारणा आणि उपक्रम राबवले गेले असून, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणखी गती मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.महामारीच्या काळात, कृषी क्षेत्राने देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवली. आज कृषीमालाची किमान हमीभावानुसार विक्रमी खरेदी होत आहे, आणि त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

छोट्यात छोटी वस्तू खरेदी करताना ती भारतातच बनलेली, ज्यात एका भारतीयाची मेहनत असेल अशी, असावी असा पंतप्रधानांनी जनतेला आग्रह केला आहे. ते म्हणाले हे प्रत्येकाच्या प्रयत्नांनीच शक्य होणार आहे. ज्या प्रमाणे स्वच्छ भारत अभियान ही एक लोकचळवळ बनली आहे, त्याचप्रमाणे, भारतात बनलेल्या, भारतीयांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करणे, लोकलसाठी व्होकल बनणे हे अंगी बाणवले पाहिजे.

पंतप्रधान म्हणाले, मोठे लक्ष्य ठेवून ते कसे साध्य करावे हे नव्या भारताला माहीत आहे. मात्र यासाठी आपण कायम सजग असलं पाहिजे. संरक्षक कवच कितीही चांगले असो, शस्त्रे कितीही आधुनिक असो, जरी त्या हत्याराने संपूर्ण संरक्षणाची ग्वाही दिली तरीही, युद्ध सुरू असताना कुणी शस्त्र खाली ठेवत नाही असे ते म्हणाले, निष्काळजीपणा करण्याचं कुठलंही कारण नाही, असं सांगत. सणवार साजरे करताना कोरोनाविषायक  संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलं आहे.

 

 Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1765715) Visitor Counter : 155