इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर “फ्युचर टेक 2021” या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाला उपस्थित
तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आघाडीवर राहण्याचे आपले राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकार खासगी क्षेत्राशी भागीदारी करेल: राजीव चंद्रशेखर
Posted On:
19 OCT 2021 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2021
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री, राजीव चंद्रशेखर आज भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या “फ्युचर टेक 2021” या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनपर सत्राला आभासी पद्धतीने उपस्थित राहिले. ही परिषद 19 ते 27 ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. नीती, विकास, लवचिकता,समावेशकता आणि विश्वास या पाच स्तंभांवर आधारित “ड्रायव्हिंग टेक्नोलॉजीज फॉर बिल्डींग द फ्युचर, वुई ऑल कॅन ट्रस्ट” या केंद्रित संकल्पनेवर ही परिषद आधारित आहे. देशभरातील उद्योजक, उद्योग जगतातील प्रमुख व्यक्ती आणि सरकारी अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणून डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चर्चेसाठी मंच उपलब्ध करून देणे या हेतूने ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
उद्घाटनपर भाषण करताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डिजिटल अर्थव्यवस्थेवर कोविड महामारीमुळे झालेल्या परिणामांबद्दल विवेचन केले.गेल्या 6 वर्षांच्या काळात आपली अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक सेवा यांचे डिजिटलीकारण करण्यात आपण मोठे यश मिळविले आहे. त्यामुळे कोविड महामारीच्या काळात भारताला या क्षेत्रात लवचिकतेने काम करण्यात मदत झाली. आपण या काळात दर महिन्याला 2 ‘युनिकॉर्न’ची (स्टार्टअप उपक्रमशीलतेत ‘युनिकॉर्न’ म्हणजे एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक उलाढालीची पातळी गाठणारे उद्योग) निर्मिती केली, तंत्रज्ञान क्षेत्रात 65 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित केली आणि एकुणातच या क्षेत्रात महत्त्वाकांक्षा वाढविण्यात यश मिळविले.
भविष्यातील मार्गक्रमणाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी, कोविड पश्चात काळाने संधीच्या नव्या आशा दाखविल्या आहेत, तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यासाठी आजच्यासारखा उत्तेजक कालावधी यापूर्वी कधीच नव्हता याची पुष्टी केली.
कार्यक्रमातील भाषण संपवताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा देश म्हणून भरारी घेण्याच्या दृष्टीने भारताचा भविष्यातील आराखडा तयार करण्यासाठी मिळणाऱ्या सर्व सल्ल्यांचे सरकार स्वागत करीत असून सरकारतर्फे वाढीव प्रयत्न करण्यास तयार आहे या सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764976)
Visitor Counter : 269