आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे ‘मानसिक आरोग्यविषयक जनजागृती अभियान सप्ताहा’ची सुरुवात


केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी शारीरिक आरोग्य आणि स्वास्थ्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या मानसिक आरोग्याच्या महत्त्वाकडे लक्ष वेधले

Posted On: 05 OCT 2021 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5  ऑक्टोबर 2021

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे शारीरिक आरोग्य आणि स्वास्थ्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या मानसिक आरोग्याच्या मुद्द्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आजपासून सुरु होत असलेला आणि जागतिक मानसिक आरोग्य दिनी सांगता होणारा ‘मानसिक आरोग्यविषयक जनजागृती अभियान सप्ताह’ साजरा करीत आहे. मानसिक स्वास्थ्याविषयी जनजागृती आणि मानसिक आरोग्य राखणे यासाठी मदत मिळेल अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संपूर्ण जगभर 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन म्हणून साजरा केला जातो.

कोविड-19 महामारीमुळे सर्वांचे दैनंदिन जीवन लक्षणीय प्रमाणात बदलून गेलेले असतानाच या वर्षीचा जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन येत आहे. या महामारीने लोकांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्यविषयक विकारांना जन्म दिला आहे. मानसिक विकारांच्या विषयाबाबत लोकांच्या मनात असलेली कलंकितपणाची भावना पुसून टाकण्यासाठी जन सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ‘मानसिक आरोग्यविषयक जनजागृती अभियान सप्ताह’ साजरा केला जात आहे.

‘मानसिक आरोग्यविषयक जनजागृती अभियान सप्ताह’ साजरा करण्यासाठीच्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण तसेच रसायने व उर्वरक मंत्र्यांनी आज नवी दिल्ली येथे युनिसेफच्या जगातील लहान मुलांच्या आरोग्याच्या स्थितीबाबतचा अहवाल जारी केला. या अहवालात 21 व्या शतकातील बालके, युवावर्ग आणि काळजी वाहकांच्या मानसिक आरोग्याबाबत सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला आहे. लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर कोविड-19 महामारीमुळे झालेल्या लक्षणीय परिणामांबाबत या अहवालात ठळकपणे भाष्य करण्यात आले आहे.

‘मानसिक आरोग्यविषयक जनजागृती अभियान सप्ताहा’ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या इतर कार्यक्रमांमध्ये बेंगळूरूच्या निमहंस संस्थेने इतर शैक्षणिक संस्था आणि तत्सम समर्पक संघटनांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या आभासी जागृती कार्यशाळा, दिल्ली शहराच्या विविध भागांमध्ये सायकल रॅलींचे आयोजन, हरित फीत अभियान, प्रादेशिक भाषांतील लघुपटांचे प्रदर्शन, #breakthestigma हॅशटॅग सुरु करण्याबाबत मोहीम आणि मानसिक आरोग्य विषयावरील प्रश्नमंजुषा/घोषणा लेखन स्पर्धा यांचा समावेश आहे.

 

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1761199) Visitor Counter : 396