पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत परिवर्तन’ या विषयावरील परिषद आणि प्रदर्शनाचे लखनऊ येथे उद्घाटन
प्रधानमंत्री आवास योजना- नागरी (PMAY-U) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 75,000 हजार घरांच्या किल्ल्या उत्तरप्रदेशातील 75 जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द
उत्तरप्रदेशात, स्मार्ट सिटी अभियान आणि अमृत योजनेअंतर्गत, 75 नागरी विकासाच्या प्रकल्पांचे उद्घाटन/कोनशिला समारंभ
फेम- 2 अंतर्गत, लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज, गोरखपूर, झाशी आणि गाजियाबाद शहरांसाठी 75 बसेसना दाखवला हिरवा झेंडा
बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ, लखनऊ येथे अटल बिहारी वाजपेयी अध्यासन सुरु करण्याची घोषणा
पंतप्रधानांचा आग्रा, कानपूर आणि ललितपूर इथल्या तीन लाभार्थ्यांशी अनौपचारिक, स्वयंस्फुर्त संवाद
“पीएमएवाय अंतर्गत, 1.13 कोटी, शहरी घरांचे बांधकाम प्रगतीप्रथावर, यापैकी 50 लाख घरांचे बांधकाम पूर्ण होऊन घरे गरीब कुटुंबांना सुपूर्द”
“पीएमएवाय अंतर्गत, देशभरात 3 कोटी घरांचे बांधकाम, अनेक गरीब लोक झाले ‘लखपती’”-पंतप्रधान
आता आपल्याला तंत्रज्ञानाला ‘पहले आप’ म्हणण्याची गरज
“एलईडी पथदिवे लावून, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 1000 कोटी रुपयांची बचत”
Posted On:
05 OCT 2021 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, ‘आझादी@75- नवा नागरी भारत: शहरी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन’ या परिषद आणि प्रदर्शनीचे लखनऊ येथे उद्घाटन झाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, हरदीप पुरी, महेंद्रनाथ पांडे, कौशल किशोर, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते डिजिटल स्वरूपात, ‘प्रधानमंत्री आवास योजना-नागरी (PMAY-U) च्या किल्ल्या उत्तरप्रदेशातील 75 जिल्ह्यांतील 75,000 लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आल्या. तसेच, यावेळी पंतप्रधानांनी या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादही साधला. यावेळी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे पथदर्शी अभियान, फेम- 2 अंतर्गत, लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज, गोरखपूर, झाशी आणि गाजियाबाद या शहरांसाठी 75 बसेसना पंतप्रधानाच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्याशिवाय, लखनऊ इथल्या डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे, अध्यासन सुरु करण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली.
यावेळी, आग्र्यातील विमलेश या लाभार्थीशी संवाद साधतांना, त्यांनी पंतप्रधानांना सांगितले की, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, घर मिळाले आहे, त्याशिवाय, इतर विविध योजनांअंतर्गत, गॅस सिलेंडर, शौचालय, वीज, नळाने पाणीपुरवठा आणि रेशन कार्ड असे लाभ मिळाले आहेत. सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, आणि आपल्या मुलांना, विशेषतः मुलींना उत्तम शिक्षण द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी विमलेश यांना केले.
कानपूर येथील राम जानकी जी या दूध विक्रेत्यांशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी विचारले की, त्यांना स्वामित्व योजनेचे लाभ मिळाले आहेत का? आपल्याला एका योजनेअंतर्गत, 10 हजार रुपयांचे कर्ज मिळाले, जे व्यवसायात गुंतवले आहेत, अशी माहिती राम जानकी जी यांनी दिली. आपल्या व्यवसायात डिजिटल व्यवहारांची वाढ करावी, असा सल्ला पंतप्रधानांनी त्यांना दिला.
पंतप्रधानांनी ललितपूरच्या पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थी श्रीमती बबिता यांना त्यांच्या जीवनमान आणि योजनेचा अनुभव याबद्दल विचारले. ते म्हणाले की, जनधन खात्याने लाभार्थ्यांना थेट पैसे हस्तांतरित करण्यास मदत केली. तंत्रज्ञान गरीबांना सर्वात जास्त मदत करते असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांना स्वामित्व योजनेचा लाभ घेण्यास सांगितले. पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी अतिशय अनौपचारिक आणि हलक्याफुलक्या वातावरणात संवाद साधला.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, ज्या घरातील पुरुषांच्या नावे सर्व मालमत्ता आहेत त्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. एक ठोस पाऊल म्हणून पीएम आवास योजनेअंतर्गत 80 टक्क्यांहून अधिक घरांची नोंदणी महिलांच्या नावे किंवा त्या संयुक्त मालकीची आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सारखे राष्ट्रीय द्रष्टे दिल्याबद्दल पंतप्रधानांनी लखनऊचे कौतुक केले. अटलजी पूर्णपणे भारतमातेला समर्पित होते असे ते म्हणाले. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात आज त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अटलबिहारी वाजपेयी अध्यासनाची स्थापना केली जात आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
पूर्वीच्या तुलनेत पीएम आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी सांगितले की, शहरांमध्ये 1.13 कोटीहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत आणि यापैकी 50 लाखांहून अधिक घरे आधीच बांधली गेली असून ती गरिबांना सुपूर्दही करण्यात आली आहेत. पंतप्रधान म्हणाले की, झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि पक्के छप्पर नसलेल्या तीन कोटी शहरी गरीब कुटुंबांना लखपती होण्याची संधी मिळाली आहे. “प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत, देशात सुमारे 3 कोटी घरे बांधली गेली आहेत, तुम्ही त्यांच्या किंमतीचा अंदाज लावू शकता. हे लोक लखपती झाले आहे ”, असे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशात सध्याचे वाटप करण्यापूर्वी, आधीच्या सरकारांनी योजना राबवण्यात अडथळे आणले. 18000 हून अधिक घरे मंजूर झाली होती पण त्यावेळी 18 घरेही बांधली गेली नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले.
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकार सत्तेवर आल्यानंतर 9 लाखांहून अधिक घरे शहरी गरीबांना देण्यात आली आणि 14 लाख घरे बांधकाम प्रक्रियेच्या विविध टप्प्यांत आहेत. ही घरे आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
शहरी मध्यमवर्गाच्या समस्यांवर आणि आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारने अत्यंत गांभीर्याने प्रयत्न केले आहेत असे भर देत पंतप्रधानांनी सांगितले. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (रेरा) कायदा हा एक मोठा टप्पा आहे. या कायद्याने संपूर्ण गृहनिर्माण क्षेत्राला अविश्वास आणि फसवणूकीतून बाहेर काढण्यास मदत केली आहे. सर्व भागधारकांना मदत केली. त्यांचे सशक्तीकरण केले आहे असे ते म्हणाले.
एलईडी पथदिवे बसवून शहरी स्थानिक स्वराज्य संस्था दरवर्षी सुमारे 1000 कोटी रुपयांची बचत करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आता ही रक्कम, इतर विकास कामांसाठी वापरली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, एलईडी दिव्यांमुळे शहरात राहणाऱ्या लोकांचे वीज बिलही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
भारतात गेल्या 6-7 वर्षांत तंत्रज्ञानामुळे शहरी क्षेत्रात मोठे परिवर्तन झाले आहे. तंत्रज्ञान हा एकात्मिक आणि नियंत्रण केंद्रांचा आधार आहे जो आज देशातील 70 हून अधिक शहरांमध्ये कार्यान्वित आहे असे पंतप्रधान म्हणाले. "आज, आपल्याला 'पहले आप'- टेक्नॉलॉजी फर्स्ट 'म्हणावे लागेल,' असे पंतप्रधान म्हणाले.
पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत, रस्त्यावरील विक्रेते बँकांशी जोडले गेले. या योजनेच्या माध्यमातून 25 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना 2500 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 7 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी स्वनिधी योजनेचा लाभ घेतला आहे असे सांगत डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी विक्रेत्यांचे कौतुक केले.
भारत मेट्रो सेवेचा देशभरातील प्रमुख शहरांमध्ये वेगाने विस्तार होत आहे. 2014 मध्ये, मेट्रो सेवा 250 किमीपेक्षा कमी लांबीच्या मार्गावर धावत असे, आज मेट्रो सुमारे 750 किमी लांबीच्या मार्गावर धावत आहे. देशात आता 1000 किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्गावर काम सुरू आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
S.Thakur/R.Aghor/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1761092)
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam