वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जागतिक पातळीवर फिनटेक अर्थात तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा सुविधांच्या स्वीकारार्हतेच्या 64% दराच्या तुलनेत भारतात फिनटेकचा स्वीकारार्हता दर सर्वात जास्त म्हणजे 87% आहे : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल


भारताने जगातील सर्वात मोठ्या डिजिटल बाजारांमध्ये स्थान मिळविण्यासाठी समतोलपणे काम केले आहे- केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांचे प्रतिपादन

केंद्रीय मंत्री म्हणतात की, प्रत्यक्ष संपर्क विरहित बँकिंग सेवांना प्रोत्साहन देऊन भारताचे फिनटेक उद्योग क्षेत्र टाळेबंदीच्या आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात सामान्य जनतेच्या मदतीला धावून आले

Posted On: 30 SEP 2021 5:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30  सप्टेंबर 2021

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की भारताने जगातील सर्वात मोठ्या डिजिटल बाजारांमध्ये स्थान मिळविण्यासाठी समतोलपणे काम केले आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून दुसऱ्या जागतिक फिनटेक उत्सव -2021 ला संबोधित करताना आज ते म्हणाले की, जागतिक पातळीवर फिनटेक अर्थात तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा सुविधा  स्वीकारार्हतेच्या 64% च्या तुलनेत भारतात फिनटेकचा स्वीकारार्हता दर सर्वात जास्त म्हणजे मे 2021 मधील आकडेवारी बघता, भारताच्या यूपीआय अर्थात एकीकृत भरणा मंचाच्या प्रणालीत 224 बँका सहभागी झाल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 6कोटी 80 लाख डॉलर्सचे  26 लाख आर्थिक व्यवहार  झाले आहेत, ऑगस्ट 2021 मध्ये सर्वात जास्त म्हणजे 36 लाख आर्थिक व्यवहार झाले आहेत अशी माहिती गोयल यांनी दिली.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, विशेषतः टाळेबंदी आणि कोविडची दुसरी लाट आली होती त्या कालावधीत लोकांना त्यांचे अत्यंत महत्त्वाचे व्यवहार घराच्या सुरक्षित वातावरणात राहून पूर्ण करता येणे शक्य करून देऊन फिनटेक उद्योगाने महामारीच्या काळात लोकांना फार मोठी मदत केली आहे.

प्रत्येक संकटाचे संधीत रुपांतर करता येणे शक्य आहे’ या पंतप्रधान मोदी यांच्या म्हणण्यानुसार काम केल्याने, आता नागरिकांना बँकेत जावे लागत नाही तर बँकाच ग्राहकांच्या घरात आणि त्यांच्या मोबाईल फोनमध्ये अवतीर्ण झाल्या आहेत, असे केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले.

त्यांनी सांगितले, थेट बँक खात्यांतील हस्तांतरणाशिवाय जॅम त्रिसूत्रीने देखील देशातील मोठ्या लोकसंख्येला पारदर्शकता, एकात्मता यांच्यासह आर्थिक लाभ आणि सेवा यांचे वितरण योग्य वेळेत होणे शक्य केले. जॅम त्रिसूत्रीने भारताला फिनटेक क्षेत्राच्या विकासासाठी तंत्रज्ञानविषयक क्षमतेचा लाभ घेता येणे शक्य करून दिले. असे ते म्हणाले. 

केंद्रीय मंत्री म्हणाले की, राष्ट्रीय ब्रॉडबॅंड अभियानाअंतर्गत लवकरच भारतातील प्रत्येक गावात वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध होईल आणि या नवीन क्षमतेच्या उपयोग करून  भारताला फिनटेक संशोधनाचे केंद्र म्हणून स्थापित करता येऊ शकेल.

गोयल यांनी सांगितले की, आजच्या फिनटेक क्षेत्रामध्ये मोबाईल अॅप्स, ई-वाणिज्य दुकाने आणि इतर अनेक डिजिटल सुविधांसाठी गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे.

आज बिगर-आर्थिक सेवा क्षेत्रे देखील सक्रियतेने फिनटेक सुविधांचा सक्रियतेने वापर करताना दिसत आहेत.

गोयल म्हणाले की, त्यांच्या मूल्य साखळ्यांच्या विस्तारासोबतच, अधिकाधिक फिनटेक सेवांची वाढ आपल्या गरजेच्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.

सुमारे 2,100 हून अधिक विविध कार्यरत फिनटेकसह आज भारत वेगाने विकसित होणाऱ्या फिनटेक बाजारांपैकी एक झाले आहे अशी माहिती  केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी दिली.

अनेक भारतीय फिनटेक कंपन्या या 1 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक उलाढाल करणार्या आहेत आणि भारताचा बाजार सध्या 31 अब्ज डॉलर्सचा आहे, येत्या 2025 मध्ये याची उलाढाल 84 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1759668) Visitor Counter : 268