आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

एम्स, नागपूरच्या तिसऱ्या स्थापना दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नितीन गडकरी आणि डॉ भारती पवार


"केवळ महाराष्ट्रच नाही, मध्य भारतातील सर्व सीमेलगतच्या राज्यांमधील रुग्णांना परवडणाऱ्या आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील": नितीन गडकरी

"पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक राज्यात एम्स स्थापन करण्याचे धोरण सरकारने विकसित केले": डॉ भारती पवार

Posted On: 26 SEP 2021 4:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26  सप्टेंबर 2021

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत एम्स, नागपूरच्या तिसऱ्या स्थापना दिनानिमित्त आयोजित डिजिटल कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. राज्यसभा खासदार डॉ.विकास महात्मे आणि राज्याचे ऊर्जा मंत्री आणि पालकमंत्री (नागपूर) डॉ.नितीन राऊत हे   देखील उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष, संचालक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन व्यक्त करताना  गडकरी म्हणाले, विदर्भ प्रांताच्या गरजा लक्षात घेऊन, नागपूर येथे एम्स, नागपूर सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या स्थापनेमुळे  मध्य भारताच्या सर्व सीमावर्ती राज्यांमधील रुग्णांना  परवडणाऱ्या आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा मिळतील. मात्र आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की या सुविधांचा लाभ केवळ शहरांपर्यंतच नाही तर आपल्या भागातील दुर्गम गावांमधल्या  लोकांपर्यंत देखील पोहोचला पाहिजे.

अलीकडेच बांधण्यात आलेल्या एम्स संस्था दीर्घकालीन प्रादेशिक असंतुलन दूर करण्याच्या उद्देशाने बांधल्या आहेत हे अधोरेखित करत ते म्हणाले की, सध्याच्या एम्स संस्थांची संख्या दुप्पट केल्यास भारताच्या आकांक्षा  अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील.

सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातील वंचित क्षेत्रांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे याबद्दल डॉ. पवार यांनी आनंद व्यक्त केला. " आपणा सर्वांना माहित आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  इतक्या दशकांनंतरही देशात फक्त 6 एम्स स्थापन झाल्या .  त्यानंतर वर्ष 2014 मध्ये, सरकारने पंतप्रधान  नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक राज्यात एम्स विकसित करण्याचे धोरण विकसित केले.

एम्स नागपूरने शैक्षणिक आणि रुग्ण सेवांमध्ये सकारात्मक प्रभाव पाडल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, या संस्थेने 2020 मध्ये पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम सुरु केला हे उल्लेखनीय आहे. मला सांगण्यात आले आहे की संस्थेने पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे विविध स्वरूपातले अभ्यासक्रम  विकसित केले आहेत, जे राष्ट्रीय महत्त्व असलेल्या या संस्थेतील उच्च दर्जाचे मापदंड  दर्शवतात.

भारताच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोविडप्रति  मिळालेल्या भक्कम सार्वजनिक आरोग्य प्रतिसादाबद्दल बोलताना त्यांनी  उपस्थितांना आठवण करून दिली की, कोविड महामारी  काळात, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने  संस्थेच्या गरजा लक्षात घेऊन प्राधान्याने व्हेंटिलेटर, हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई, किटची उपलब्धता, मास्क आणि जीवरक्षक औषधांची उपलब्धता सुनिश्चित केली. कोविड महामारीच्या  दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांना कोविड डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

डॉक्टर म्हणून आपल्या समृद्ध अनुभवातून बोलताना त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी आणि समुदायाला सल्ला देताना सांगितले  की वैद्यकीय उपचाराबरोबरच, रूग्णांसाठी सहानुभूती आणि भावनिक काळजी देखील तितकीच  महत्त्वाची आहे.  आरोग्य सेवा प्रदात्याची आणि काळजी घेणाऱ्या टीमच्या प्रत्येक सदस्याची ही मुख्य जबाबदारी आहे . रुग्ण त्यांचा बहुतांश वेळ  परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक आणि रिसेप्शनिस्ट यांच्याशी संवाद साधण्यात घालवतात. हे संवाद रुग्णांप्रती करुणा आणि सहानुभूती दाखवण्याच्या अनेक संधी देतात.  म्हणूनच, रुग्णाची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिल्यास रुग्णांवर  सकारात्मक  परिणाम होईल.

त्यांनी  गरीबांच्या उपचाराचा खर्च कमी करणे आणि डॉक्टरांची संख्या वाढवण्याबरोबरच आधुनिक उपचार सुविधांना प्राधान्य देणाऱ्या प्रतिबंधात्मक सेवांवर  भर दिला आणि  केंद्र सरकारच्या  प्रयत्नांची रूपरेषा स्पष्ट केली.  एम्स नागपूर समुदायाचे एकत्र काम करण्याचे त्यांनी स्वागत केले जेणेकरून देशाचे विकास कार्य समर्पण आणि चिकाटीने पुढे नेता येईल.

केंद्र सरकारच्या विविध आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये ही संस्था महत्वाची भूमिका बजावेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. "अनेक आव्हाने येतील, मात्र  मला खात्री आहे की, तुम्ही हे सर्व अडथळे पार कराल, अधिक उंची गाठाल आणि राज्यातील इतर आरोग्य संस्थांसाठी आदर्श बनाल . असे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी संस्थेच्या  "अभिज्ञानम" मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1758291) Visitor Counter : 149