पंतप्रधान कार्यालय

वैश्विक कोविड-19 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टिपणी: महामारीचा अंत आणि भविष्यामध्ये उत्तम आरोग्य सुरक्षेसाठी सज्जता

Posted On: 22 SEP 2021 10:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22  सप्टेंबर 2021

महामहीम,

कोविड-19 म्हणजे अभूतपूर्व आपत्ती आहे. ही महामारी अद्याप पूर्ण गेलेली नाही. जगातल्या बहुतांश लोकांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. त्याअर्थाने  राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अतिशय योग्यवेळी या शिखर परिषदेचे आयोजित केली, ही स्वागतार्ह बाब आहे.

महामहीम,

भारताच्या दृष्टीने मानवता म्हणजे नेहमीच एक संपूर्ण कुटुंब असते. भारतीय औषध निर्माण उद्योगाने किफायतशीर निदान संच, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि पीपीई संच यांची निर्मिती केली आहे. त्यामुळे जगातल्या अनेक विकसनशील देशांना स्वस्त, परवडणारे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणि आम्ही 150 पेक्षा जास्त देशांना औषधे आणि वैद्यकीय सामुग्रीचा पुरवठा केला आहे. स्वदेशी बनावटीच्या दोन लसींना भारतामध्ये ‘आकस्मिक परिस्थितीतल्या वापरासाठी मान्यता’ मिळाली आहे. यामध्ये जगातल्या पहिल्या ‘डीएनए-आधारित’ लसीचा समावेश आहे.

अनेक परवानाधारक भारतीय कंपन्या वेगवेगळ्या लसींच्या उत्पादन कार्यामध्ये गुंतलेल्या आहेत.

या वर्षाच्या प्रारंभी संयुक्त राष्ट्राच्या शांतता रक्षक आणि इतर 95 देशांना आमच्याकडे तयार करण्यात आलेली लस आम्ही सामायिक केली आहे. आम्ही दुस-या लाटेतून जात असताना एक कुटुंब या नात्याने संपूर्ण जग देखील भारताच्या पाठिशी राहिले.

भारताला दिलेल्या पाठबळासाठी मी, आपल्या सर्वांचे आभार मानतो.

महामहीम,

भारतामध्ये सध्या जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम  राबवला जात आहे. अलिकडेच, आम्ही एका दिवसात सुमारे अडीच कोटी लोकांचे लसीकरण केले. आमच्या तळागाळापर्यंत आरोग्य यंत्रणा कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत लसींच्या 800 कोटींहून जास्त मात्रा लोकांना दिल्या आहेत.

20 कोटींपेक्षा जास्त भारतीयांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आम्ही ‘को-विन’ या नावाने एक नाविन्यपूर्ण डिजिटल कार्यपद्धती विकसित केली असून, त्यामार्फत लसीकरण केले जात  आहे.

आमच्याकडे सामायिक करण्याची भावना आहेच, त्यामुळे को-विन आणि इतर विविध डिजिटल पर्यायांचे सॉफ्टवेअर सर्वांना वापरण्यासाठी मुक्त उपलब्ध केले आहेत.

महामहीम,

ज्या वेगाने नवनवीन भारतीय लसी विकसित होत आहेत, त्याच वेगाने आम्ही लसींच्या उत्पादन क्षमतेमध्येही वृद्धी करीत आहोत.

आमची उत्पादन क्षमता जसजशी वाढत जाईल तसतसे  आम्ही इतर देशांना लसीचा पुरवठा पुन्हा सुरू करू. यासाठी, कच्च्या मालाची पुरवठा साखळी  निरंतर, मुक्त असण्याची आवश्यकता आहे.

आम्ही इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी लस तयार करण्यासाठी आमच्या ’क्वाड’ भागीदारांसह, भारताच्या उत्पादन शक्तीचा लाभ घेतला जात आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेने जागतिक व्यापार संघटनेमध्ये कोविड लस, निदान आणि औषधांसाठी ‘ट्रिप’ माफीचा प्रस्ताव मांडला आहे.

यामुळे साथीविरूद्ध अधिक वेगाने लढा देणे शक्य होईल. या महामारीमुळे झालेल्या आर्थिक परिणामांकडे आपण लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.

याचा विचार करता, आता आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ केला पाहिजे. त्यासाठी लसीकरणाच्या प्रमाणपत्रांना परस्परांनी मान्यता देण्याची आवश्यकता आहे.

महामहीम,

या शिखर परिषदेच्या आयोजनामागचे उद्दिष्ट आणि अध्यक्ष बायडेन यांच्या दूरदृष्टीचे मी पुन्हा एकदा समर्थन करतो.

महामारीचा अंत करण्यासाठी भारत संपूर्ण जगाबरोबर कार्य करण्यासाठी सज्ज आहे.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.

 

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757381) Visitor Counter : 167