नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मधून निघणाऱ्या ड्वार्फ कंटेनर अर्थात कमी उंचीचे कंटेनर असलेल्या रेल्वे गाडीला दाखवला हिरवा झेंडा


यामुळे लॉजिस्टिक खर्च आणि कंटेनरचा माल हाताळणीचा अवधीही महिन्यावरून कमी होऊन काही दिवसांचाच राहणार असल्याने हा उपक्रम महत्वाचा ठरणार

Posted On: 20 SEP 2021 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 सप्‍टेंबर 2021 

 

केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज दूर दृश्य प्रणाली द्वारे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट इथल्या ड्वार्फ कंटेनर अर्थात कमी उंचीच्या कंटेनर रेल्वे गाडीला हिरवा  झेंडा दाखवला. याबरोबरच  बंदरावर डेपोतून मालासह कमी उंचीच्या कंटेनरची पहिली खेप आयसीडी  कानपूरला रवाना झाली.

जेएनपीटी मधून कमी उंचीच्या कंटेनर रेल्वे सेवा सुरु झाल्याने, या दुमजली  कमी उंचीच्या कंटेनरद्वारे,  आयात-निर्यात मालासाठी स्पर्धात्मक किमतीचा लाभ आयात-निर्यातदारांना शक्य होणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्गे बंदरात मालाची वाहतूक वाढणार आहे. नेहमीच्या कंटेनरपेक्षा ड्वार्फ कंटेनरची उंची  660 मिलीमीटरने कमी आहे त्याचा वाहतुकीच्या दृष्टीने फायदा होतो. कमी उंची कंटेनरमुळे ग्रामीण, अर्ध- नागरी आणि शहरी रस्त्यावरून, मर्यादित उंचीचे सब वे,लेव्हल क्रोसिंग वरूनही ट्रेलर सहज जाऊ शकतात.

याशिवाय हे कमी उंचीचे कंटेनर, जेव्हा एकावर एक असे दुमजली असतात  त्यामुळे अधिक  माल वाहून नेण्याची क्षमता   67% इतकी  वाढते आणि हे कंटेनर 71 टन वजन वाहून नेऊ शकतात तर आयएसओ  मानांकन असलेले नेहमीचे कंटेनर 40 टन वजन वाहून नेऊ शकतात. याशिवाय भारतीय रेल्वेने, यावर,दुमजली आयएसओ  कंटेनर रेल्वेच्या तुलनेत माल वाहतुक खर्चावर 17% सवलत दिल्याने एकूण 33% सवलत होत असून याद्वारे भारतीय रेल्वे मालवाहतूक स्पर्धात्मक होत आहे. कमी उंचीच्या कंटेनर द्वारे मालाची वाहतूक केल्याने आयात-निर्यात मालाचा वाहतूक खर्च कमी राहण्याची शक्यता असून भारतीय निर्यात, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहील. 

जेएनपीटी मधून सुरु झालेली ड्वार्फ कंटेनर रेल्वे सेवा म्हणजे आयात-निर्यात मालाची दुमजली कमी उंचीच्या कंटेनर द्वारे वाहतूक करत रेल्वे वाहतूक सूटसुटीत करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. यामुळे आयात-निर्यातदार समुदायाला देशाच्या  अंतर्भागातून वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी मदत होणार असून जेएनपीटी बंदरात रेल्वे माल वाहतूक वाढणार असल्याचे ते म्हणाले.  हे कंटेनर बंदरांसाठी अनुकूल असून किफायतशीर किमतीच्या दृष्टीकोनातून  यांचे उत्पादन  भारतात करता येऊ शकते, यामुळे मेक इन इंडिया अभियानासाठी संधी खुल्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याच धर्तीवर जेएनपीटी कंटेनर टर्मिनल मध्ये कमी उंचीच्या  कंटेनरसाठी  डेपो उभारण्यासाठी, ठिकाण निश्चित करण्यात आले असून  इथून   नेहमीच्या आयएसओ कंटेनर मधून माल कमी उंचीच्या कंटेनरमध्ये हलवण्यात येईल.यामुळे बंदरात निर्यातीसाठी आवश्यक असणार्या  आयएसओ कंटेनरची उपलब्धता राहील. सध्या निर्यातीसाठी  आयएसओ कंटेनरचा तुटवडा भासत आहे. या पावलामुळे कंटेनरचा बंदरात मालाची चढ-उतार करण्यासाठी थांबण्याचा काळ कमी होऊन तो महिन्यावरून काही दिवसापर्यंत कमी होईल. माल कमी उंचीच्या कंटेनरमध्ये हलवला जाईल आणि रिकामे आयएसओ कंटेनर जवळच्या कारखान्यातील निर्यातक्षम  मालासाठी सहज उपलब्ध होतील.

जेएनपीटी मधून ड्वार्फ कंटेनर रेल्वे सेवा सुरु झाल्याने बंदराच्या व्यापार मार्गात   वैविध्य येईल. बंदर,आयात-निर्यातदार समुहाला कमी वाहतूक खर्च देऊ शकेल, विविध फाटकातील तसेच रस्ते वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि थेट बंदरावर माल पोहोचवण्याला प्रोत्साहन मिळेल.  

 

* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1756411) Visitor Counter : 857