पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापतींच्या हस्ते संयुक्तपणे संसद टीव्हीचे उद्घाटन


भारतातील लोकशाही केवळ राज्यघटनेतील कलमांचा संग्रह नाही;तर तो आपला जीवनप्रवाह आहे: पंतप्रधान

संसद टीव्ही देशाची लोकशाही आणि लोकप्रतिनिधींचा नवा आवाज सिद्ध होईल: पंतप्रधान

‘दर्जेदार, अर्थपूर्ण साहित्य लोकांना आपल्याशी जोडते’, हे संसदीय व्यवस्थेतही तितकेच लागू आहे- पंतप्रधान

Posted On: 15 SEP 2021 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 सप्‍टेंबर 2021 

 

उपराष्ट्रपती आणि  राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज संयुक्तरित्या, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधत संसद टीव्हीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलतांना, बदलत्या काळानुरूप, विशेषतः एकविसाव्या शतकाच्या गरजा लक्षात घेत, संसदेशी संबंधित वाहिनीने स्वतःला आधुनिक बनवल्याबद्दल, पंतप्रधानांनी या वाहिनीचे कौतूक केले. आज एकविसावे शतक संवाद आणि संचाराच्या माध्यमातून क्रांती घडवत असतांना हे परिवर्तन यथोचित आहे, असेही ते म्हणाले. संसद टीव्हीची ही सुरुवात म्हणजे भारतीय लोकशाहीतील नव्या अध्याय असल्याचेही ते पुढे म्हणाले. या टीव्हीच्या निमित्ताने भारतातील जनतेला, संपर्क आणि  संवादाचे नवे माध्यम मिळाले असून, हे माध्यम देशाची लोकशाही आणि  लोकप्रतिनिधींचा आवाज बनेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आजच दूरदर्शनला 62 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, त्यांनी दूरदर्शनलाही शुभेच्छा दिल्या. अभियंता दिनानिमित्त त्यांनी सर्व अभियंत्यांनाही शुभेच्छा दिल्या.

आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन असल्याचे नमूद करत, पंतप्रधान म्हणाले की,भारत ही लोकशाहीची जननी आहे, त्यामुळे  जेव्हा लोकशाहीविषयी चर्चा होते, त्यावेळी भारताची जबाबदारी सहाजिकच अधिक असते. भारतात, लोकशाही ही केवळ एक व्यवस्था नाही, तर तो आमचा विचार आहे. लोकशाही म्हणजे केवळ संवैधानिक संरचना नाही, तर लोकशाही आपल्या देशाचा प्राण आहे. लोकशाही म्हणजे केवळ राज्यघटनेत बंदिस्त असलेले नियम आणि कलमे नाहीत, तर तो आमचा जीवनप्रवाह आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या संदर्भात बोलतांना, ज्यावेळी एक दैदीप्यमान   इतिहास आणि  आश्वासक भविष्य आमच्यासमोर आहे, अशा वेळी प्रसारमाध्यमांची भूमिका काय आणि कशी असावी, यावर त्यांनी भर दिला. जेव्हा माध्यमातून, स्वच्छ भारत अभियानासारख्या विषयांवर चर्चा केली जाते, त्यावेळी हे अभियान लोकांपर्यंत अत्यंत वेगाने पोहोचते. त्याचप्रमाणे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची वीरगाथा सांगणारी 75 भागांची मालिका किंवा काही विशेष कार्यक्रम करुन, प्रसारमाध्यमे स्वातंत्र्यसैनिकांची गाथा लोकांपर्यंत पोचवू शकतात, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.

कुठल्याही गोष्टीच्या मध्यवर्ती स्थानी, दर्जेदार, आशयघन मजकूर असतो, असे सांगत, आपल्याला मांडायचा विषय, आणि  त्याची मांडणीच लोकांना आपल्याशी जोडत असते, असा आपला स्वानुभव असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘कंटेट ईज कनेक्ट’ असे सांगत ते म्हणाले की जर तुमच्याकडे लोकांना सांगण्यासाठी उत्तम, दर्जेदार काही असेल, तर लोक आपल्याशी सहज जोडले जातात. मध्यमांसाठी ही गोष्ट जेवढी खरी आहे, तेवढीच तंतोतत ती संसदीय व्यवस्थेलाही लागू आहे. कारण, संसदेत केवळ राजकारण नसते, तर धोरणेही तयार केली जातात. संसदेतील कामकाजाचा आपल्याशी संबंध आहे, अशी भावना  सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असली पाहीजे, यावर त्यांनी भर दिला. या नव्या वाहिनीने त्या दिशेने काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ज्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरु असते, त्यावेळी विविध विषयांवर वादविवाद, चर्चा सुरु असतात, त्यातून युवा वर्गाला बरेच काही शिकण्यासारखे असते. तसेच, ज्यावेळी सगळा देश आपल्याकडे बघतो आहे, यांची जाणीव खासदारांना होते, त्यावेळी त्यांना देखील, उत्तम वागणूक ठेवण्याची, चर्चेत अभ्यासपूर्ण मते मांडण्याची प्रेरणा मिळते, असे मोदी म्हणाले. नागरिकांच्या कर्तव्यावर भर देण्याची गरज आहे, असे सांगत, ही जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यम अत्यंत प्रभावी ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमांमधून आपल्या युवा वर्गाला, आपल्या लोकशाही संस्था, त्यांची कार्यपद्धत आणि नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याविषयी जाणून घेता येईल. त्याचप्रमाणे, आपले संसदीय कामकाज, विधिमंडळांचे कामांचे स्वरुप, जाणून घेतल्यास, भारतीय लोकशाही मूळापासून समजून घेता येईल, असेही पंतप्रधान म्हणाले. देशातील लोकशाहीचा पाया असलेल्या ग्रामपंचायतीवरही संसद टीव्हीवर विशेष कार्यक्रम दाखवले जावेत, त्यातून देशातील लोकशाहीला नवी ऊर्जा, नवी चेतना मिळेल,  अशी शुभेच्छा त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1755261) Visitor Counter : 289