संरक्षण मंत्रालय
रशियातील ऑरेनबर्ग इथे होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शांतता अभियानाच्या सहाव्या संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराच्या तुकडीचा सहभाग
Posted On:
15 SEP 2021 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2021
शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांमधील लष्करी मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून,दर दोन वर्षांनी संयुक्त दहशतवाद विरोधी मोहीम राबवण्यासाठी, बहुराष्ट्रीय शांतता युद्धसराव घेतला जातो. यंदा या संयुक्त शांतता अभियानाचे हे सहावे वर्ष असून, रशियात ऑरेनबर्ग इथे हा संयुक्त युद्धाभ्यास होत आहे. 13 ते 25 सप्टेंबर 2021 दरम्यान, हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे. या युद्धाभ्यासाचा उद्देश, शांघाय सहकार्य परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे संबंध अधिक दृढ करणे आयनई लष्करी नेतृत्वाची क्षमता वाढवून त्यायोगे, बहुराष्ट्रीय लष्करी अभियान हाताळण्यास त्यांना सक्षम करणे, हा आहे.
भारतीय लष्कराची तुकडी देखील या संयुक्त युद्धसरावात सहभागी झाली आहे. 200 जवानांच्या या तुकडीत देशातील सर्व सैन्यदलांचे सैनिक असून, त्यात भारतीय हवाई दलाचे 38 कर्मचारीही या शांतता मोहिमेत सहभागी झाले आहेत. IL-76 या दोन लढावू विमानांमधून भारतीय जवानांची तुकडी रशियाला पोचली आहे. या अभ्यासात सहभागी होण्यापूर्वी, या तुकडीने दक्षिण-पश्चिम कमांडच्या नेतृत्वाखाली यासाठी प्रशिक्षण आणि तयारी केली होती.
या संयुक्त युद्धाभ्यासामुळे, एससीओच्या सदस्य देशांच्या लष्करांमध्ये असलेल्या उत्तमोत्तम पद्धती आणि प्रात्यक्षिके इतरांना शिकता येतील. तसेच, सध्याच्या बहुराष्ट्रीय आणि एकमेकांशी जोडलेले असलेल्या जगात, शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर, वाढत असलेला दहशतवाद विरोधी लढा अधिक मजबूत करण्यासही मदत मिळेल. या संयुक्त युद्धाभ्यासात, वैयक्तिक व्यावसायिक चर्चा, संयुक्त मोहिमा आणि पद्धतींचे प्रशिक्षण, संयुक्त कमांडची स्थापना तसेच, दहशतवादाच्या धोक्याचे समूळ उच्चाटन अशा सर्व गोष्टींचा समावेश असेल.
दहशतवाद विरोधातील आंतरराष्ट्रीय सहकार्य आयनई संयुक्त लष्करी अभियानातील शांतता अभियान ही एक महत्वाची मोहीम आहे.
* * *
M.Iyengar/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755205)
Visitor Counter : 230