पंतप्रधान कार्यालय

13 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधानांचे उद्‌घाटनपर भाषण

Posted On: 09 SEP 2021 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2021

महामहिम राष्ट्राध्यक्ष  पुतिन, राष्ट्राध्यक्ष शी, राष्ट्राध्यक्ष रामाफोसा, राष्ट्राध्यक्ष  बोल्सोनारो,

नमस्कार,

या ब्रिक्स शिखर परिषदेत मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. ब्रिक्सच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषविणे ही  माझ्यासाठी आणि भारतासाठी खूप आनंदाची बाब आहे. तुमच्यासोबत होत असलेल्या या शिखर परिषदेचा तपशीलवार अजेंडा आपल्याकडे आहे. जर तुम्ही सर्व सहमत असाल तर आपण हा अजेंडा स्वीकारू शकतो. धन्यवाद, अजेंडा आता स्वीकारला गेला आहे.

महामहिम !

एकदा हा अजेंडा स्वीकारला गेला की आपण सर्वजण आपले सुरुवातीचे भाषण  थोडक्यात देऊ शकतो.  सुरुवातीचे भाषण प्रथम देण्याचे स्वातंत्र्य मी घेईन.मग मी तुमच्यामधील प्रत्येक महामहिम यांना तुमच्या सुरुवातीच्या भाषणासाठी आमंत्रित करेन.

या अध्यक्षपदाच्या काळात भारताला सर्व ब्रिक्स भागीदारांकडून आणि प्रत्येकाकडून पूर्ण सहकार्य मिळाले आहे आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभारी आहे.ब्रिक्स मंचाने  गेल्या दीड दशकांत अनेक कामगिरी केल्या आहेत.आज आपण जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत.हा मंच विकसनशील देशांच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरला  आहे.

ब्रिक्सने नवीन विकास बँक, आकस्मिकता राखीव व्यवस्था आणि ऊर्जा संशोधन सहकार्य व्यासपीठ यांसारख्या  सामर्थ्यशाली  संस्था तयार केल्या आहेत.आपल्याला अभिमान वाटेल असे बरेच काही आहे, यात काही शंका नाही.मात्र ,आपण जास्त आत्मसंतुष्ट होऊ नये आणि आगामी  15 वर्षांत ब्रिक्स आणखी अधिक परीणामाभिमुख राहील  हे सुनिश्चित करणे हे देखील महत्त्वाचे आहे.

भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी निवडलेली 'ब्रिक्स@15: सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर ब्रिक्स सहकार्य ’ ही संकल्पना  नेमके हेच  प्राधान्य दर्शवते. हे  चार Cs एक प्रकारे आमच्या ब्रिक्स भागीदारीची मूलभूत तत्त्वे आहेत.

या वर्षी, कोविडने निर्माण केलेली आव्हाने असतानासुद्धा 150 हून अधिक ब्रिक्स बैठका आणि कार्यक्रम आयोजित केले गेले, त्यापैकी 20 पेक्षा जास्त मंत्री स्तरावरचे होते. पारंपरिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबरोबरच आपण  ब्रिक्स अजेंडा आणखी विस्तृत  करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.या संदर्भात, ब्रिक्सने अनेक 'फर्स्ट्स' साध्य केले आहेत म्हणजे अनेक गोष्टी पहिल्यांदाच करण्यात आल्या आहेत. .अगदी अलीकडेच  पहिली ब्रिक्स डिजिटल शिखर परिषद झाली.  तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्याची व्याप्ती वाढवण्यासाठी हे एक अभिनव पाऊल आहे.नोव्हेंबरमध्ये आपले जलसंपदा मंत्री ब्रिक्सच्या  स्वरूपात पहिल्यांदा बैठक घेणार आहेत. 'बहुपक्षीय प्रणालींचे बळकटीकरण आणि सुधारणा ' या विषयावर ब्रीक्समध्ये सामूहिक भूमिका घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे.

आपण  ब्रिक्स दहशतवादाविरोधातील कृती आराखडा  देखील स्वीकारला आहे.आपल्या  अंतराळ संस्थांमधील रिमोट सेन्सिंग उपग्रह संरचना संदर्भातील  करारामुळे सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.आपल्या  सीमाशुल्क विभागांच्या सहकार्याने, ब्रिक्समधील आंतर-व्यापार सुलभ होईल. आभासी माध्यमातून ब्रिक्स लसीकरण संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्याबाबतही एकमत झाले आहे. हरित पर्यटनाबाबतची  ब्रिक्स आघाडी हा आणखी एक नवीन उपक्रम आहे.

महामहिम !

या सर्व नवीन उपक्रमांमुळे केवळ आपल्या नागरिकांनाच फायदा होणार नाही तर आगामी  काही वर्षांमध्ये  ब्रिक्स एक संस्था म्हणून अनुरूप राहण्यास सक्षम होईल. मला विश्वास आहे कीआजची बैठक आपल्याला ब्रिक्सला आणखी उपयुक्त बनवण्यासाठी योग्य दिशेने मार्गदर्शन करेल.

आपण महत्त्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक बाबींवरही चर्चा करणार आहोत. मी आता तुम्हा सर्वांना तुमच्या सुरुवातीच्या भाषणासाठी आमंत्रित करतो.

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1753663) Visitor Counter : 224