कृषी मंत्रालय

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून जागतिक नारळ दिवस साजरा


नारळ उत्पादन आणि उत्पादकतेत भारत जगात अव्वल स्थानी- नरेंद्र सिंह तोमर

अपारंपारिक क्षेत्रामध्ये लागवड वाढल्यामुळे महाराष्ट्रात नारळाच्या उत्पादनात वाढ

Posted On: 02 SEP 2021 10:30PM by PIB Mumbai

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय नारळ समुदायाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जागतिक नारळ दिन साजरा केला.  संयुक्त राष्ट्रांच्या आशिया आणि प्रशांत महासागर प्रदेशासाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगांतर्गत नारळ उत्पादक देशांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय नारळ समुदायाची स्थापना केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते. भारताने नारळ उत्पादनात मोठी प्रगती केली आहे, असे तोमर यावेळी म्हणाले. नारळाचे उत्पादन आणि उत्पादकता या क्षेत्रात भारत जगात  तिसऱ्या स्थानी आहे, असे तोमर म्हणाले. वर्ष 2020-21 मध्ये नारळाचे उत्पादन 21207 दशलक्ष नारळ इतके होते, जे जागतिक उत्पादनाच्या 34 टक्के एवढे आहे . नारळाची उत्पादकता, प्रति हेक्टर 9687 नारळ इतकी असून ही जगभरात सर्वाधिक आहे. नारळाची नवी उत्पादने आणि उद्योग वाढत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना रोजगार मिळत आहे, असेही तोमर यावेळी म्हणाले.

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलजे यावेळी म्हणाल्या की, ‘भारतात लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे, त्यामुळे आपल्या देशांतर्गत नारळ उद्योगांचे भविष्य आपल्या शेतकऱ्यांच्या संघटन बांधणीवर अवलंबून आहे, त्याशिवाय, आपण प्रक्रिया उद्योग कसा पुढे नेतो आणि त्यात मूल्यवर्धन करतो,  आणि उत्पादनात विविधता आणणे आणि  विविध उप-उत्पादनांचा औद्योगिक वापर शोधण्यावर  आणि त्यांचे मूल्यवर्धन करण्यावर भर द्यायला  हवा तरच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवायला मदत होईल" असे त्या म्हणाल्या.

 

2 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारमध्ये नारळ विकास मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. राज्य विभागाचे अधिकारी, केव्हीके, शेतकरी, उद्योजक यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. तांत्रिक सत्र अतिशय माहितीपूर्ण होते आणि सर्व संबंधितांनी  समाधान व्यक्त केले.

23 व्या जागतिक नारळ दिवसाची संकल्पना “कोविडच्या पार्श्वभूमीवर एक सुरक्षित, एकात्मिक , लवचिक आणि शाश्वत अशा नारळ उत्पादकांचा समुदाय निर्माण करणे” अशी आहे.  नारळ विकास महामंडळ दरवर्षी नारळ दिवस साजरा करुन नारळाच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्याचा  आणि त्याकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते.

209.87 दशलक्ष नारळ वार्षिक उत्पादनासह  लागवड क्षेत्रात  महाराष्ट्र 7 व्या स्थानावर आणि उत्पादनात 9 व्या स्थानावर आहे. 1986-87 ते 2018-19 या 33 वर्षांच्या कालावधीत नारळाचे क्षेत्र 6900 हेक्टर वरून 43320 हेक्टर पर्यंत आणि उत्पादन 76.32 दशलक्ष नारळ वरून 209.87 दशलक्ष नारळ इतके वाढले आहे.

नारळाच्या लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि त्याखालोखाल रत्नागिरीमध्ये  आहे. महाराष्ट्रात या पिकाच्या लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे आणि अपारंपरिक क्षेत्रात नारळाची लागवड करण्याकडे  कालांतराने कल वाढत आहे.

 

नारळ विकास मंडळ, राज्य केंद्र, ठाणे आणि डीएसपी फार्म, पालघर यांचे  महाराष्ट्रात दर्जेदार लागवड साहित्याचे उत्पादन वाढवणे, नारळाखाली अधिक क्षेत्र आणून भविष्यातील उत्पादन क्षमता निर्माण करणे, नारळाच्या विद्यमान झाडांची  उत्पादकता सुधारणे,  मुख्य कीटक आणि रोग यांचे एकत्रित व्यवस्थापन आणि उत्पादन विविधीकरण आणि उपउत्पादनाच्या वापरास प्रोत्साहन देऊन नारळ उद्योग मजबूत करणे  आणि राज्य कृषी/फलोत्पादन विभाग , राज्य कृषी विद्यापीठ,  केव्हीके. यांच्या सहकार्याने राज्यात नारळ उत्पादन आणि वापराच्या एकात्मिक विकास करणे उद्दिष्ट आहे.

 

राज्यात मंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये  गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचे उत्पादन आणि वितरण, नारळ लागवड  क्षेत्राचा विस्तार, उत्पादकता सुधारणेसाठी नारळ एकात्मिक शेती, माहिती आणि माहिती तंत्रज्ञान, नारळावरील तंत्रज्ञान मिशन, नारळ पाम विमा. योजना, केरा सुरक्षा विमा योजना यांचा समावेश आहे.

***

 

M.Chopade /R.Aghor/S.Kane/C.Yadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751574) Visitor Counter : 739