गृह मंत्रालय

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत स्वातंत्र्य लढ्यातल्या अग्रणीं आणि दुर्लक्षित नायकांची माहिती युवकांपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने देशभरातून 10 सायकल रॅलीचे आयोजन


पुणे ते राजघाट सायकल रॅलीचा येत्या 4 सप्टेंबर पासून होणार प्रारंभ

Posted On: 02 SEP 2021 2:14PM by PIB Mumbai

मुंबई/पुणे दि . 2 सप्टेंबर 2021

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, जे देशातील सर्व राष्ट्रीय महत्वाच्या आस्थापनांचे सुरक्षेचे काम करते, त्यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त  देशाच्या विविध भागातून  10 सायकल रॅलीचे  आयोजन  केले आहे.

स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले  अग्रणी आणि फारसे प्रसिद्ध नसलेल्या अशा काही वीरांची/ दुर्लक्षित नायकांची माहिती, देशातल्या युवा वर्गाला व्हावी या उद्देशाने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले बलिदान आणि त्याग याचा जनतेला विशेषतः युवा वर्गाला परिचय करून देणे  हा या रॅलीचा उद्देश आहे.  

सीआयएसएफचे सहाय्यक उप निरीक्षक धीरज कुमार जानीसे  यांच्या नेतृत्वाखाली सर्वात लांब पल्ला असलेल्या  या  सायकल रॅलीचा  येत्या 4 सप्टेंबरला पुणे येथून प्रारंभ होणार आहे. सुमारे 1703 किमी मार्गक्रमण करत महिनाभराचा  प्रवास करून  ही सायकल रॅली  2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी नवी दिल्लीत राजघाट इथे  पोहोचेल.या रॅलीमध्ये सीआयएसएफ चे 12 सायकलपटू सहभागी होणार आहेत.

ऐतिहासिक पुणे करारावर जिथे स्वाक्षऱ्या झाल्या त्या येरवडा तुरुंगापासून 4 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता या सायकल रॅलीची सुरवात होणार आहे.  सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवरांनी  हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रॅली , स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुण्यातील दुसरे महत्वाचे ठिकाण असलेल्या आगाखान पॅलेसला भेट देउन आपली मार्गक्रमणा करणार आहे. 8 ऑगस्ट 1942 ला छोडो भारत ची हाक दिल्यानंतर ब्रिटीश सरकारने  इथे  महात्मा गांधीना 21 महिने स्थानबद्ध करून ठेवले होते. याच काळात महात्माजींच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांचे सचिव नारायण देसाई यांचे निधन झाले. गांधीजींचे वास्तव्य असलेल्या आगाखान पॅलेसमधील  खोलीचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले आहे .

येरवडा कारागृह आणि आगाखान पॅलेस इथे शनिवारी यानिमित्त दोन स्वतंत्र कार्यक्रम होणार असून सहभागी सायकलपटूना प्रोत्साहन देण्यासाठी युवा वर्ग उपस्थित राहणार  आहे. 

ही रॅली 28 दिवसाच्या आपल्या प्रवासात ज्या शहरांमधून मार्गक्रमण करणार आहे त्यात  हुतात्मा राजगुरू यांचे गाव असलेले राजगुरुनगर, संतवाडी, संगमनेर, नाशिक,चांदवड ,भोपाल, आग्रा,पालवल यांचा   समावेश आहे.   पुणे ते दिल्ली या मार्गातल्या राजगुरुनगर (स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान), मध्य प्रदेशातील भावरा (स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांचे जन्मस्थान) आणि शिवपुरी, मध्य प्रदेशातील (स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांचे मृत्यूस्थान) अशा महत्वाच्या ठिकाणी ही  रॅली जाणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत होत असलेल्या कार्यक्रमांचा भाग म्हणून काढण्यात येणाऱ्या या  रॅली दरम्यान कोविड विषयक सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

सीआयएसएफ हे भारत सरकारचे सशस्त्र बल असून अणुउर्जा  केंद्रे, विमानतळ,दिल्ली मेट्रो तसेच लाल किल्ला, स्टाच्यु ऑफ युनिटी, ताज महाल यासारख्या महत्वाच्या  राष्ट्रीय आस्थापना आणि  स्मारकांचे संरक्षण करते.

Jaydevi PS/N. Chitale/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1751365) Visitor Counter : 358


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu