माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनएफएआयचे ऑनलाईन फिल्म पोस्टर प्रदर्शन “चित्रांजली@75” चे उद्घाटन


या प्रदर्शनात 75 फिल्म पोस्टर्सच्या माध्यमातून देशभक्तीचे विविध रंग

Posted On: 27 AUG 2021 3:53PM by PIB Mumbai

मुंबई/पुणे, 27 ऑगस्ट 2021

 

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशभरात, “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा केला जात आहे. याचाच भाग म्हणून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या पुणे विभागाने, एका विशेष आभासी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. “चित्रांजली@75: अ प्लॅटिनम पॅनोरामा” असे या प्रदर्शनाचे शीर्षक आहे.

दृश्य दस्तऐवजांचा पॅनोरामा असलेल्या या ऑनलाईन प्रदर्शनात, देशालां स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या 75 वर्षांतील ठळक घटनांचा मागोवा घेण्यात आला आहे. या डिजिटल संग्रहात, भारतीय चित्रपटातून, देशाच्या स्वातंत्र्यसेनानींचे आणि आपल्या वीर सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाच्या गाथांचे गौरवगान चित्रित केलेले आहे. या प्रदर्शनात, अशा चित्रपटांचीही झलक आहे, ज्यातून हाताळण्यात आलेल्या सामाजिक प्रश्नांचा जनमानसावर परिणाम झाला आणि त्यातून सामाजिक सुधारणांचा मार्ग मोकळा झाला. तसेच, आपल्या सैनिकी गणवेशातले आपले नायक- आपल्या जवानांच्या शौर्यगाथांची झलक या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळेल.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक विक ऑफ आझादी का अमृत महोत्सव’ या विशेष उपक्रमाचा भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, भारतीय सिनेमा ही देशाची सॉफ्ट पॉवर असून जागतिक व्यासपीठावर भारताची ओळख निर्माण करण्यात या चित्रपटसृष्टीचे योगदान महत्वाचे आहे.

आभासी प्रदर्शनाविषयी माहिती :

‘चित्रांजली@75’, प्रदर्शनात, 75 फिल्म पोस्टर्स तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून भारतातल्या विविध भाषांमधील चित्रपटातले देशभक्तीचे विविध रंग दाखवण्यात आले आहेत. हे प्रदर्शन तीन भागात विभागण्यात आले आहे. “सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’, ‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’ आणि ‘वीर सैनिकांना सलाम’ असे हे तीन विभाग आहेत.

‘सिनेमाच्या कॅमेरा नेत्रातून स्वातंत्र्यलढा’- या विभागात, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रोमहर्षक कथा विविध भाषांमधील चित्रपटातून दाखवण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यसेनानींचे शौर्य आणि त्याग याला चित्रपटातून सर्वसामान्यांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचवण्यात आले आहे आणि या वीरगाथा पुढेही अनेक पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या ठरतील. 

‘‘सामाजिक सुधारणांविषयीचे चित्रपट’’- या विभागात, भारतीय चित्रपट आणि विसाव्या शतकातील सुरुवातीच्या दशकातला राष्ट्रीय स्वातंत्र्यलढा यांच्यातील परस्परसबंध दर्शवण्यात आला आहे. जनशक्तीला एकत्रित आणण्याची चित्रपटांची ताकद यात आपल्याला अनुभवता येते. प्रत्ययकारी दृश्यांच्या आणि गीतांच्या माध्यमातून लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे देखील सिनेमाच्या माध्यमातून करता येते. अनेक सामाजिक सुधारणांच्या चळवळी देखील या चित्रपटांतून दाखवण्यात आल्या आहेत. त्या काळात झालेल्या या चळवळीवरच्या चित्रपटांमुळे समाजात आलेली मरगळ दूर होऊन नवे चैतन्य निर्माण झाले होते.

'सॅल्यूटिन्ग द ब्रेव्ह सोल्जर्स ' ही  सशस्त्र दलांच्या शौर्याला योग्य आदरांजली  आहे ,  आपल्या चित्रपटातूनही ही संकल्पना वारंवार मांडली आहे.  या विभागात  प्रदर्शित झालेल्या युद्ध चित्रपटांनी आपल्या देशातील सैनिकांचे निःस्वार्थ हौतात्म्य  आणि अमरत्वाची आभा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. गणवेशातील नायकांना सलाम करण्यासाठी प्रदर्शनातत्यांची  पोस्टर्स ठेवण्यात आली आहेत. 

या प्रदर्शनात समाविष्ट केलेले काही उल्लेखनीय चित्रपट पुढीलप्रमाणे- 

1857 (हिंदी , 1946) - सुरेंद्र आणि सुरैया अभिनित या ऐतिहासिक काल्पनिक चित्रपटाला पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची पार्श्वभूमी आहे. 

42 'उर्फ बियालीश (बंगाली, 1949) - हा चित्रपट भारताच्या 1942 च्या चळवळीचा  अस्वस्थ काळ सविस्तरपणे दाखवतो. 

पियोली फुकन (आसामी,1955) - हा चित्रपट आसामच्या एका ऐतिहासिक पात्राच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे, पियोली फुकन हा  बदान बोरफुकनचा मुलगा आहे , ज्याने ब्रिटिशांविरोधात बंड केले होते. . त्याला फाशीची शिक्षा झाली आणि 1830 मध्ये जोरहाट येथे फाशी देण्यात आली.

कडू मकरानी (गुजराती, 1960) - ब्रिटिश राजवटीला विरोध करणाऱ्या काथियावाडच्या कडू मकरानी उर्फ पूर्वेकडील रॉबिनहुडचे कार्य हा चित्रपट सर्वांसमोर मांडतो. 

कित्तूर चेन्नम्मा (कन्नड,1961) - कन्नड भाषेतील ऐतिहासिक नाट्यमय  चित्रपट ज्याची निर्मिती आणि दिग्दर्शन बी .आर.पंथुलू यांनी केले होते, बी. सरोजा देवी यांनी  कित्तूर चेन्नम्माची भूमिका साकारली होती. चेन्नमा यांनी  1824 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध सशस्त्र बंडाचे नेतृत्व केले.

पदांदी  मुंडुकू (तेलुगू, 1962) - महात्मा गांधींच्या दांडी मीठ सत्याग्रह  आणि भारताची स्वातंत्र्य चळवळ केंद्रस्थानी असलेला व्ही. मधुसूधन राव यांनी दिग्दर्शित केलेला हा राजकीय चित्रपट आहे. .

हकीकत (हिंदी, 1964)- चेतन आनंद दिग्दर्शित आणि निर्मित युद्धावरील एक चित्रपट.  या चित्रपटात धर्मेंद्र, बलराज साहनी, प्रिया राजवंश, सुधीर, संजय खान आणि विजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सुभाष चंद्र (बंगाली, 1966) - भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान व्यक्तिमत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित पियुष बोस दिग्दर्शित बंगाली चित्रपट

शहीद ए-आझम भगतसिंग (पंजाबी, 1974)-ओम बेदी दिग्दर्शित शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट 

22 जून 1897  (मराठी,  1979) - 1897 मध्ये पुण्यातील चापेकर बंधूंनी वॉल्टर चार्ल्स रँड आणि चार्ल्स एगर्टन आयर्स्ट या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हत्येच्या सत्य घटनेवर  आधारित पुरस्कारप्राप्त चित्रपट.

गांधी (इंग्रजी/हिंदी, 1982) - जगभरात प्रशंसा मिळवलेला  एक चरित्रात्मक चित्रपट, रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित आणि महात्मा गांधीच्या भूमिकेत बेन किंग्स्ले . या चित्रपटाने 11 नामांकनांपैकी 8 अकादमी पुरस्कार (ऑस्कर) जिंकले

डॉ आंबेडकर (तेलुगू, 1992)- भारत पारेपल्ली दिग्दर्शित बाबासाहेब आंबेडकरांवरील एक चरित्रपट .

कालापानी (मल्याळम, 1996)- ऐतिहासिक चित्रपट ज्याचे सह -लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते.  1915 चा काळ दाखवण्यात आलेला हा चित्रपट ब्रिटीश राजवटी दरम्यान  अंदमान आणि निकोबार बेटांच्या सेल्युलर जेलमध्ये (किंवा काला पानी ) बंदिस्त भारताच्या  स्वातंत्र्य संग्रामातील कार्यकर्त्यांच्या जीवनावर केंद्रित आहे.

लोकमान्य: एक युगपुरुष (मराठी, 2015)- एक समाजसुधारक आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक यांची जीवनकथा - या चित्रपटात सुबोध भावे टिळकांच्या भूमिकेत आहेत.

75 चित्रपटांची संपूर्ण यादी येथे मिळू शकेल

या प्रदर्शनाची रचना शेअरिंग आणि डाऊनलोड करण्यासाठी सोप्या वैशिष्ट्यांबरोबरच वापरायला सुलभही आहे. 

प्रदर्शन पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा - https://www.nfai.gov.in/virtual-poster-exhibition.php.

 

* * *

JPS/Sonal/Radhika/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1749547) Visitor Counter : 368