शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण मंत्रालयाचा नवोन्मेष विभाग, एआयसीटीई आणि बीपीआरअँड डी च्या मंथन-2021 या हॅकेथॉनचा शुभारंभ


नवोन्मेषी युवा प्रतिभा आणि स्टार्ट अप्स शोधणार राष्ट्रीय सुरक्षेबाबत देशी उपाययोजना

Posted On: 26 AUG 2021 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2021

पोलिस संशोधन आणि विकास विभागाचे (BPR&D) अतिरिक्त महासंचालक नीरज सिन्हा आणि अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेचे (AICTE) अध्यक्ष प्रा अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते आज संयुक्तपणे मंथन-2021 या हॅकेथॉनचा शुभारंभ झाला. मंथन-2021 या हॅकेथॉनचे आयोजन पोलिस संशोधन आणि विकास विभागाने, शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष विभाग तसेच एआयसीटीई च्या सहकार्याने केले आहे.

या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलतांना, नीरज सिन्हा म्हणाले, की मंथन 2021 साठी त्यांच्या विभागाने 20 आव्हानात्मक प्रश्न जारी केले आहेत, ज्याद्वारे आपल्या युवा प्रतिभेला चाकोरीबाहेर विचार करण्याची आणि सुरक्षा यंत्रणांना भेडसावणाऱ्या काही किचकट समस्या सोडवण्यासाठी अभिनव संकल्पना साकार करण्याची संधी मिळणार आहे. त्यापैकी काही कल्पना जर आम्हाला आवडल्या तर, आम्ही त्या कल्पना सुचवणाऱ्या चमूसोबत काम करुन त्याच्या अंमलबजावणीत मदत करु.

गेल्या पाच वर्षांपासून आम्ही विविध संस्थांच्या सहकार्याने असे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन आयोजित केले आहेत. आयुष्यात प्रत्यक्षात येणारे प्रश्न, आव्हाने यांची विद्यार्थ्यांना कल्पना यावी आणि त्यांनी त्याच्यावर उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करावा, यासाठी आम्ही असे उपक्रम राबवत असतो. आपल्या देशासाठी महत्वाचे असलेले प्रश्न त्यांनी सोडवावेत, अशी आमची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने मंथन हॅकेथॉन उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे, असे डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले. या हॅकेथॉनद्वारे आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना मिळू शकतील, असेही ते म्हणाले. अनेक युवा या उपक्रमात सहभागी होतील आणि त्याद्वारे, पोलिस संशोधन आणि विकास विभागाला उत्तमोत्तम प्रतिभा आणि संकल्पना शोधण्यात मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंथन 2021 दोन टप्प्यात असेल. पहिल्या टप्प्यात, स्पर्धकांना दिलेल्या समस्यांची उकल करणाऱ्या संकल्पना सादर करायच्या आहेत. या संकल्पनांचे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या तज्ञामार्फत विश्लेषण केले जाईल. त्यातून निवड झालेल्या अभिनव संकल्पनांना 28 नोव्हेंबर 2021 रोजी होणाऱ्या दुसऱ्या किंवा अंतिम फेरीत आपल्या संकल्पना सादर कराव्या लागतील आणि या संकल्पना तंत्रज्ञानाच्या दृष्टीने उपयुक्त आणि अंमलबजावणी करण्यायोग्य आहेत, हे परीक्षकांसमोर सिद्ध करावे लागेल. यापैकी सर्वोत्तम संकल्पना सादर करणाऱ्याना विजेते  म्हणून घोषित केले जाईल.

हॅकेथॉन मंथन 2021 हा एक अभिनव राष्ट्रीय उपक्रम असून या अंतर्गत, एकविसाव्या शतकात, आपल्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी नवनव्या संकल्पना आणि तंत्रज्ञानविषयक उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या 36 तासांच्या ऑनलाइन हॅकेथॉन आयोजन 28 नोव्हेंबर ते एक डिसेंबर 2021 दरम्यान केले हणाऱ्य आहे. देशातील विविध शिक्षण संस्थांमधून निवड झालेले विद्यार्थी आणि नोंदणी केलेल्या स्टार्टअप्स त्यात सहभागी होतील. त्यांच्या तंत्रज्ञानविषयक ज्ञानाच्या आधारे ते सुरक्षेसाठी काही तांत्रिक उपाययोजना सांगू शकतील. विजेत्या चमूला एकूण 40 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. स्पर्धकांनी, दिलेल्या सहा संकल्पनांवर आधारित 20 विविध आव्हानांसाठी डिजिटल उपाय विकसित करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, सखोल अध्ययन, ऑग्युमेंटेड रिएलिटी, मशीन लर्निंग इत्यादी तंत्रज्ञानांचा वापर करायचा आहे. सातत्याने स्वरूप बदलत राहणारी सुरक्षाविषयक आव्हाने, यात फोटो/व्हिडीओ विश्लेषण, बनावट कंटेंट आणि त्याचा मूळ रचनाकार ओळखणे, सायबर गुन्ह्यांविषयी अनुमानात्मक डेटा विश्लेषण इत्यादीसाठी उपाययोजना अपेक्षित आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठीची नोंदणी मंथनच्या https://manthan.mic.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून सुरु झाली आहे.

 

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1749293) Visitor Counter : 239