जलशक्ती मंत्रालय

100 दिवस चालणाऱ्या 'सुजलाम' मोहिमेला प्रारंभ


गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबवून हागणदारीमुक्त गावे अधिकाधिक ओडीएफ प्लस करण्यासाठी ही मोहीम

'सुजलाम' मोहिमेअंतर्गत, हागणदारीमुक्त गांव अभियानाच्या लाभांची शाश्वतता आणि एक लाख शोषखड्ड्यांची निर्मिती सुनिश्चित केली जाईल

Posted On: 25 AUG 2021 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2021

 

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' सोहळ्याचा एक भाग म्हणून जलशक्ती मंत्रालयाने 100 दिवस चालणाऱ्या 'सुजलाम' मोहिमेला प्रारंभ केला आहे. गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबवून अधिकाधिक गावे ओडीएफ प्लस करण्यासाठी ही मोहीम असून या मोहिमेअंतर्गत गाव पातळीवर सांडपाणी व्यवस्थापन करून विशेषतः एक लाख शोषखड्ड्यांची निर्मिती आणि  सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने पुनर्वापरास-योग्य सांडपाण्याचे व्यवस्थापन  करून  अधिकाधिक ओडीएफ प्लस गावे तयार केली जाणार आहेत. देशभरातील गावांना अल्पावधीत वेगाने ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु करून देण्याचा या मोहिमेचा प्रयत्न आहे. मोहीम आजपासून म्हणजेच 25 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली आहे आणि ती पुढचे 100 दिवस सुरु राहणार आहे.

या मोहिमेअंतर्गत गावांमध्ये पुनर्वापरासाठी योग्य सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी शोषखड्डे यांसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासह पाणवठ्यांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी देखील साहाय्य केले जाईल. सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आणि गावांमध्ये किंवा गावांच्या बाहेरील भागात पाण्याची साठवणूक  ही एक प्रमुख समस्या आहे.या मोहिमेमुळे सांडपाणी व्यवस्थापनाला मदत होईल आणि पर्यायाने पाणवठे पुनरुज्जीवित होण्यास मदत होईल.

याशिवाय, या मोहिमेमुळे सामुदायिक सहभागातून स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातील उपक्रमांची गती  वाढेल आणि त्यातून ओडीएफ-प्लस उपक्रमांविषयी जागरूकता वाढेल.

या मोहिमेअंतर्गत गावांमध्ये आयोजित करण्यात येणारे प्रमुख उपक्रम:

  • सद्य परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी सामुदायिक सल्लामसलत, मुक्त बैठका आणि ग्रामसभा आयोजित करणे
  • हागणदारीमुक्त गाव कायम तसेच राखण्यासाठी आणि वापरायोग्य सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक संख्येने शोष खड्ड्यांची निर्मिती करण्यासाठी ठराव मंजूर करणे.   
  • शाश्वतता  आणि खड्डे बांधणीशी संबंधित उपक्रम राबविण्यासाठी  100 दिवसांची योजना विकसित करणे
  • आवश्यक संख्येत शोष खड्डे तयार करणे
  • माहिती, शिक्षण आणि संपर्कांद्वारे  आणि सामुदायिकरित्या  एकत्र येऊन  आवश्यक ठिकाणी स्वच्छतागृहांची पुनर्निर्मिती करणे
  • गावातील सर्व नवीन घरांमध्ये शौचालये उपलब्ध असल्याची खातरजमा करणे.  

 

* * *

R.Aghor/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749014) Visitor Counter : 474