उपराष्ट्रपती कार्यालय
कठोर मेहनत करून ध्येय साध्य करण्याची ऑलिंपिक खेळाडूंची प्रेरणा युवा वर्गाने घ्यावी - उपराष्ट्रपतींचे आवाहन
शिवाजी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचे भाषण
Posted On:
25 AUG 2021 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2021
कर्तृत्ववान कामगिरी करत केवळ देशाचा अभिमान वाढवणाऱ्या तसेच सर्वांना विविध खेळांमध्ये व्यापक रस निर्माण होईल,असे यश मिळवणाऱ्या ऑलिंपिक खेळाडूंकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू आज युवा वर्गाला केले.
कठोर मेहनत कधीच वाया जात नाही आणि त्याचे सकारात्मक फळ मिळतेच असे सांगत नायडू यांनी तरुणांना ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आग्रही आवाहन केले.
शिवाजी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याच्या समारोप समारंभात भाषण करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, वर्गात आणि खेळाच्या मैदानात सारखाच वेळ घालवण्याची परवानगी विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या जीवनातील,आयुष्य बदलवून टाकणाऱ्या शिक्षकांची भूमिका अधोरेखित करत उपराष्ट्रपतींनी यावर भर दिला की, कोणतीही व्यक्ती कितीही यशस्वी झाली तरी तिने आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकाच्या मुख्य भूमिकेचा कधीही विसर पडू देऊ नये. दर्जेदार शिक्षण देण्याव्यतिरिक्त, धैर्याने आणि समतोल साधून कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता आपल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले. विशेषतः महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या भावनिक तणावावर शैक्षणिक संस्थांनी विशेष लक्ष दिले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
कोविड -19 महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य आपत्कालीन सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवाजी महाविद्यालय आणि दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.
शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाज सेवेमध्ये आणि पर्यावरण-संवेदनशील उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक पी.सी. जोशी, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.शिवकुमार सहदेव आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला आभासी माध्यमातून उपस्थित होते
* * *
R.Aghor/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748979)
Visitor Counter : 216