आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"भविष्यात लसींच्या बूस्टर डोससाठी शिफारशी नक्कीच येतील”


“मिश्र लसींच्या प्रयोगाने सुरक्षेला नक्कीच कोणताही धोका ठरणार नाही”

“ मास्कचा अचूक वापर आणि प्रत्येकाला लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणे ही भविष्यातल्या कोविड लाटा रोखण्यासाठी दोन सर्वात मोठी शस्त्रे”

कोविड-19 वरील शास्त्रीय घडामोडींबाबत राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या संचालक प्रिया अब्राहम यांचे विश्लेषण

Posted On: 18 AUG 2021 11:22AM by PIB Mumbai

“आपल्यासाठी 2021 हे अतिशय खडतर तरीही फलदायी वर्ष होते" असे आयसीएमआर एनआयव्हीच्या संचालक श्रीमती प्रिया अब्राहम यांनी म्हटले आहे. पुण्यातील आयसीएमआर - राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था ( एनआयव्ही) गेले वर्षभर य संदर्भात  युद्धपातळीवर काम करत आहे. सार्स-सीओव्ही-2 च्या देशातील वैज्ञानिक संशोधनात ही संस्था अग्रेसर आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या इंडीया सायन्स (भारत विज्ञान) या ओटीटी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

सार्स-सीओव्ही-2 च्या देशातील वैज्ञानिक संशोधनात आघाडीवर असलेल्या या संस्थेत कशाप्रकारे लस विकसित केली, त्या प्रक्रियेची त्यांनी झटपट, नेमकी माहिती दिली. “आम्ही लगेच कोरोना विषाणूचे विलगीकरण करत तत्कालिक (प्रकार) स्ट्रेन भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला (बीबीआयएल) एप्रिल (2020) अखेपर्यंत दिला. त्यांनी निष्क्रीय विषाणूपासून मे महिन्यात लस विकसित केली आणि पुनरावलोकनासाठी आमच्याकडे पाठवली." आम्ही, लसीच्या निष्क्रीय वैशिष्टयाबाबतची संपूर्ण तपासणी केली. तिचे वर्गिकरण केले. हॅम्टस्टर आणि माकडांवर त्यांच्या क्लिनिकलपूर्व चाचण्या सुरु केल्या. ते खूपच अवघड प्रयोग आहेत. अत्युच्च जैवसुरक्षा पातळी चार दर्जाच्या नियंत्रण सुविधेसह या चाचण्या घेण्यात आल्या. पुढच्या टप्प्यात, आम्ही त्यांना निदान आणि प्रयोगशाळा सहाय्य या क्षेत्रात टप्पा I, II आणि III मधे क्लिनिकल चाचणीसाठी मदत केली.

 

कोविड-19 संबंधित वैज्ञानिक घडामोडींबाबतच्या मुलाखतीतील भाग, महामारीच्या भविष्याबाबतचे विश्लेषण आणि विषाणू बाबतच्या सर्वसामान्य प्रश्नांचा उहापोह इथे केला आहे.

 

बालकांवरची कोव्हॅक्सिन या लसीची चाचणी कोणत्या टप्प्यावर आहे? बालकांसाठी ती कधीपर्यंत उपलब्ध होईल?

 

बालकांसाठी वयोगट 2-18 करता सध्या कोव्हॅक्सिनची चाचणी II आणि III टप्प्यात आहे. आशा आहे की लवकरच याबाबतचे निष्कर्ष हाती येतील.त्यानंतर  ते नियंत्रकांना सादर केले जातील. त्यामुळे सप्टेंबर किंवा त्यानंतर लगेच बालकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकते. याशिवाय झायडस कॅडिलाच्या लसीचीही चाचणी सुरु आहे. ती देखील बालकांसाठी वापरली जाऊ शकते आणि उपलब्ध होऊ शकते.

 

याव्यतिरिक्त आपल्या नागरिकांसाठी आणखी कोणत्या लसी उपलब्ध होऊ शकतात?

पहिल्या डीएनए लसीच्या रुपात झायडस कॅडिलाची लस वापरासाठी उपलब्ध होईल. याशिवाय, गेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडची एम-आरएनए लस, बायोलॉजिकल-ई लस, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची नोवोवॅक्स आणि आणखी -भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने विकसित केलेली इंट्रा-नेझल ही वैशिष्टपूर्ण लस. यासाठी सुई टोचण्याची गरज नाही. ती नाकपुड्यांद्वारे दिली जाऊ शकते.

 

डेल्टा प्लस प्रकारावर सध्या उपलब्ध असलेल्यापैकी कोणत्या लसी प्रभावी ठरु शकतील?

 

  • आधी एक लक्षात घ्या, डेल्टा-प्लस प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा पसरण्याची शक्यता कमी आहे. डेल्टा प्रकार प्रामुख्याने 130 पेक्षा जास्त देशांमध्ये सध्या आहे. जगभर त्याचा फैलाव झाला असून या प्रकाराचा फैलाव वेगाने होतो. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था इथे आम्ही या प्रकारावर अभ्यास केला आहे. आम्ही लसीकरण केलेल्या लोकांच्या शरीरात तयार होणाऱ्या प्रतिपिंडांचा (अँटीबॉडीजचा) अभ्यास केला आणि या प्रकाराविरुद्ध ते काय करतात हे तपासले. या प्रकाराविरूद्ध प्रतिपिंडांची परिणामकारकता दोन ते तीन पटीने कमी झाल्याचे आढळले. तरीही, या प्रकाराविरुद्ध लस अजूनही सुरक्षा प्रदान करते. त्यांची परिणामकारकता थोडी कमी वाटू शकते पण रुग्णालयात दाखल होण्याची किंवा दगावण्याची शक्यता असणाऱ्या गंभीर स्वरुपाच्या रोगाला, प्रतिबंध करण्यासाठी लसी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे विषाणूचा प्रकार कोणताही असो आतापर्यंत लसी परिणामकारक आहेत. तेव्हा संकोच किंवा संभ्रम बाळगू नका.

येणाऱ्या काळात आपल्याला बूस्टर मात्रेची गरज आहे का? या संदर्भात काही अभ्यास झाला आहे का?

 

जगभरात बूस्टर मात्रेवर अभ्यास केला जात आहे. वेगवेगळ्या किमान सात लसी बूस्टर मात्रा म्हणून वापरल्या गेल्या आहेत. आणखी देशांचे लसीकरण होईपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने सध्या हे थांबवले आहे. श्रीमंत आणि गरीब देशातली लस उपलब्धतेची दरी बघता हे पाऊल उचलले आहे. पण, भविष्यात बूस्टर मात्रेची शिफारस नक्कीच येणार आहे.

 

मिश्र लसीच्या अर्थात त्या आलटून पालटून घेण्याबाबत काही अभ्यास होतोय का? ते आपल्यासाठी लाभदायक असेल का?

 

अनवधानाने दोन वेगवेगळ्या लसीच्या मात्रा लसवंताला दोन टप्प्यात दिल्या गेल्या, असेही घडले आहे.आम्ही एनआयव्हीमधे ते नमूने तपासले. ती व्यक्ती सुरक्षित असल्याचे आढळले. कोणताही प्रतिकूल परिणाम आढळला नाही. रोगप्रतिकारशक्ती थोडी चांगलीच होती. त्यामुळे सुरक्षेला घातक असे यात नक्कीच काही नाही. यावर आमचा अभ्यास सुरु असून थोड्याच दिवसात अधिक तपशील देऊ शकू.

 

अधिक परिणामकारक आणि विश्वासार्ह अशी कोविड-19 चाचणीची कोणती नवी पद्धत उदयाला आली आहे का?

दुसऱ्या लाटेवेळी रुग्णालये आणि प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने रुग्णांची रांग लागली. त्यांचे अनेक कर्मचारी संक्रमित झाले. त्यामुळे चाचण्यांची क्षमता त्यावेळी उणावली होती. आवश्यक रासायनिक द्रव्याचाही तुटवडा होता. या सगळ्याचा चाचण्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला. आरपीसीआर चाचणी 70% परिणामकारक आहे. तरीही जागतिक आरोग्य संघटनेने तीला मान्यता दिली आहे. पण भविष्यात, अधिक सोपी आणि त्वरीत, प्रयोगशाळेत नमूने पाठवण्याची गरज नसलेली, जागेवरच होऊ शकणारी चाचणी आपल्याला दिसेल.

कृपया आयसीएमआर द्वारे विकसित आरटी-एलएएमपी चाचणीबद्दल माहिती द्या.

आयसीएमआरने आरटी-एलएएमपीचे उत्पादन केले आहे. ते किफायतशीर आहे. यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची किंवा विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. अगदी जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातही त्याचा वापर कराता येऊ शकतो. तांत्रिकदृष्टया फारशा प्रगत नसलेल्या ठिकाणीही तातडीने आणि जलदरित्या करता येणाऱ्या या चाचण्या भविष्यात अधिक लोकप्रिय ठरतील.

 

स्वतःच चाचणी करु शकतो असे किटही आता बाजारात आले आहेत, यामुळे चाचण्यांचा वेग वाढेल का?

सेल्फ टेस्ट किट हे अँटीजेन किट आहेत. त्यामुळे त्यांची परिणामकारकता आरटीपीसीआर पद्धतीपेक्षा कमी आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांमधे ती चांगली असू शकते पण लक्षणे नसलेल्या रुग्णामध्ये कमी आहे.

 

बर्ड फ्लू किंवा झिका विषाणूने संक्रमित व्यक्ती सार्स-सीओव्ही-2 संसर्गाली बळी पडू शकते का?

होय, डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका विषाणूसारखे विषाणूजन्य संक्रमण डासांच्या चाव्याव्दारे पसरतात, पावसाळ्यात ते वाढणार आहेत. परिसरात पाणी साचू देऊ नका, कारण त्यात डासांची पैदास होते. डासांच्या चाव्याव्दारे पसरणाऱ्या या संसर्गाच्या सोबत कोरोनाचा संसर्ग होणे अधिक भयंकर असेल.

 

माध्यमांमधे गर्दीची अनेक छायाचित्रे दिसतात. अशा बेजबाबदार वर्तनामुळे किती नुकसान होऊ शकते?

 

नक्कीच यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. नव्या लाटेला हे निमंत्रणच आहे. "आपण महामारी संपवण्याची निवड करु तेव्हा ती संपेल. हे आपल्या हातात आहे." असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस ए घेब्रायसस यांनी म्हटले आहे. याचा अर्ध आपण सावधगिरी बाळगायला हवी. विशेषत: येणाऱ्या सणासुदीच्या काळात, गर्दीत मिसळू नये यामुळे विषाणू वेगाने पसरु शकतो.

 

यापुढे आणखी लाट येणार नाही हे शक्य आहे का?

विषाणूचे नवे प्रकार येतच आहेत. आपल्याकडे सुरक्षेसाठी दोन मोठी शस्त्रे आहेत. ती म्हणजे: मास्कचा अचूक वापर आणि प्रत्येकाला लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणे. मग भले लाट आली तरी ती मोठी नसेल.

 

मुलाखत इथे पाहू शकता.

***

JaideviPS/VGhode/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1746879) Visitor Counter : 389