संरक्षण मंत्रालय

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सिक्कीम हिमालयातील चार शिखरांवरच्या चढाई मोहिमेची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सांगता

Posted On: 17 AUG 2021 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2021

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, दार्जीलिंग मधल्या हिमालयीन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट या  गिर्यारोहण संस्थेने  आयोजित केलेल्या,सिक्कीम हिमालयातील चार शिखरांवरच्या चढाई मोहिमेची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत  17 ऑगस्ट 2021 ला नवी दिल्ली इथे सांगता झाली. 20-25 एप्रिल 2021 दरम्यान सिक्कीम हिमालयातील चार लहान शिखरावर ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.  ग्रुप कॅप्टन जय किशन यांच्या नेतृत्वाखाली माउंट रेनॉक, माउंट  फ्रे, माउंट बीसी रॉय आणि  माउंट पालुंगवर  125 गिर्यारोहकांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी  केली. 

समुद्र सपाटीपासून 16,500  फुट उंचीवरच्या रेनॉकच्या शिखरावर   7,500  चौरस फुटाचा आणि  75 किलो वजनाचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला त्या स्थानाला सिक्कीमचे आद्य स्वातंत्र्यसैनिक त्रिलोचन पोखरेल यांचे नाव देण्यात आले आहे, गांधी पोखरेल म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.

एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये गिरीशिखरावर सर्वात मोठा तिरंगा फडकविण्याचा हा विक्रम नोंदविला गेला आहे.

दार्जीलिंग इथल्या हिमालयीन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूट या गिर्यारोहण संस्थेत अथक 75 तास 2.51लाख वेळा सूर्यनमस्कार घालण्याचा जागतिक विक्रमही या चमूने केला आहे.

या अनोख्या उपक्रमाबद्दल या संस्थेची प्रशंसा करत अशा प्रकारच्या उपक्रमातून युवकांमध्ये साहसा द्वारे देशभक्तीला प्रोत्साहन मिळेल असे संरक्षण मंत्री म्हणाले. या चमूला शुभेच्छा देतानाच सहभागी झाल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी प्रदान केले.

 

 

 

M.Iyengar/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1746745) Visitor Counter : 369