ऊर्जा मंत्रालय
शहरी गॅस वितरण केंद्रात, नैसर्गिक वायु आणि हायड्रोजनच्या मिश्रणाविषयीचा प्रायोगिक प्रकल्प उभारण्यासाठी एनटीपीसी कडून जागतिक स्वारस्य प्रस्ताव आमंत्रित
Posted On:
14 AUG 2021 3:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021
राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा केंद्र- एनटीपीसी लिमिटेड या ऊर्जानिर्मिती कंपनीने, हायड्रोजन आणि नैसर्गिक वायु यांच्या मिश्रणाचा प्रायोगिक प्रकल्प देशातील शहरी गॅस वितरण केंद्रांमध्ये उभारण्यासाठी जागतिक स्तरावर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) स्वारस्य प्रस्ताव आमंत्रित केले आहेत.
याआधी एनटीपीसी अक्षय ऊर्जा लिमिटेड कंपनीने लेह इथे हरित हायड्रोजन इंधन स्टेशन उभारण्यासाठी आणि एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेड ने इंधन सेल (हायड्रोजन आधारित ई बसेस) बसेसची खरेदी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी निविदा मागवल्या होत्या. एनटीपीसी अक्षय ऊर्जा लिमिटेड कंपनीने लेह इथे एक 1.25 मेगा वॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करत असून ज्यायातून हायड्रोजन इंधन स्टेशनला ऊर्जा पुरवठा केला जाईल.
आता, हायड्रोजन आणि नैसर्गिक वायु मिश्रणातून ऊर्जानिर्मितीचा पहिलाच प्रायोगिक प्रकल्प भारतात सुरु होणार असून, ज्याद्वारे भारताच्या नैसर्गिक वायु ग्रिडला संपूर्णपणे कार्बनमुक्त करण्यासाठीची चाचपणी केली जाणार आहे. भारतात हायड्रोजन ऊर्जा आधारित अर्थव्यवस्थेकडे नेण्यात एनटीपीसी ची महत्वाची भूमिका असून, त्यानंतर त्याला व्यावसाईक स्वरूप देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या उद्दिष्टानुसार, आयातीला पर्याय निर्माण करण्यासोबतच कार्बनमुक्त इंधन निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्नही याद्वारे केला जाणार आहे.
एनटीपीसी लिमिटेड हरित अमोनिया निर्मितीचेही प्रयत्न करत असून, ते यशस्वी झाल्यास, खत उद्योगातील कार्बनचा वापरही कमी होऊ शकेल. तसेच, खत तसेच तेल शुद्धीकरण प्रकल्पामध्ये काही प्रमाणात हरित हायड्रोजन वापरण्याचे सरकारचे उद्दिष्टही साध्य करता येऊ शकेल.
त्याशिवाय, रामगुंडम येथे हरित मेथेनॉल उत्पादनाविषयीचे अध्ययन ही पूर्ण झाले असून, लवकरच कंपनी त्यात गुंतवणूक करण्याविषयी निर्णय घेणे अपेक्षित आहे.
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745761)
Visitor Counter : 218