युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

उद्यापासून फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा प्रारंभ होणार


एनएसजीकडून गेटवे ऑफ इंडियापासून फ्रीडम रनचे आयोजन

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांवर नेहरु युवा केंद्र संघटनेकडून फ्रीडम रनचे आयोजन

Posted On: 12 AUG 2021 6:10PM by PIB Mumbai



 

Mumbai | August 12, 2021

आजादी का अमृत महोत्सवचा एक भाग म्हणून उद्या 13 ऑगस्ट 2021 पासून फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चा प्रारंभ होत असताना मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि भारतभरातील महत्त्वाच्या इतर 9 स्थानांपासून होणाऱ्या राष्ट्रीय प्रारंभामध्ये एनएसजीचे 36 कमांडो आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. यामध्ये अलाहाबादच्या आझाद पार्कमधील सीआरपीएफ, पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेल येथून सीआयएसएफ, हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पिती येथून आयटीबीपी, आसाममधील तेजपूर येथील सीमा सुरक्षा बल, भारत- पाकिस्तानमधील अटारी येथील सीमेवर बीएसएफ,झांसी रेल्वे स्थानक यांचा समावेश आहे.  तर नेहरु युवा केंद्र संघटन लेह आणि चेन्नई येथून सहभागी होईल.

नेहरु युवा केंद्र संघटनेकडून महाराष्ट्रात फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन

 नेहरु युवा केंद्र संघटनेच्या महाराष्ट्र- गोवा, मुंबई येथील राज्य कार्यालयांकडून आणि जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेल्या केंद्रांकडूनही महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळांवर फ्रीडम रनचे आयोजन होणार आहे.

13 ऑगस्ट 2021 रोजी एनवायकेएस कार्यक्रमाचा तपशील:

मुंबईत महात्मा गांधी यांनी 1942 च्या ‘भारत छोडो’ चा नारा ज्या ठिकाणाहून दिला होता त्या  ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून सकाळी सात वाजता फ्रीडम रनला झेंडा दाखवून रवाना केले जाणार आहे. कोविड नियमांचे पालन करण्याच्या उद्देशाने निवडक 20 जण यामध्ये सहभागी होतील.

महाराष्ट्रात खालील ठिकाणी फ्रीडम रनचे आयोजन होणार आहे.

 1.   पुणे – गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, बीमसीसी महाविद्यालयाच्या मागे सकाळी 9 वाजता

2.   रत्नागिरी – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान

3.   रायगड – वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान

4.   अकोला – 1938 मध्ये स्थापन झालेले सीताबाई आर्ट्स कॉलेज( बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी)

5.   गोंदिया – श्री कन्हैय्यालाल दीक्षित यांचे निवासस्थान

6.   चंद्रपूर – लोकाग्रणी ऍड. बळवंतराव राघव उर्फ बाळासाहेब देशमुख

 

केंद्रीय युवक कल्याण  आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील. युवक कल्याण  आणि क्रीडा मंत्रालयाच्या या संकल्पनेअंतर्गत  75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले जातील. दीड महिन्यात एकूण 744 जिल्ह्यात हे कार्यक्रम होतील.

राष्ट्रव्यापी फिटइंडिया फ्रीडम रन 2.0 मध्ये भाग घेऊन देशातील प्रत्येकाने या उपक्रमाला लोकांच्या चळवळीचे –“जन भागीदारी से जन आंदोलन” चे स्वरूप प्राप्त करून द्यावे असे आवाहन केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी केले आहे. लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या तंदरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यापासून मुक्तता मिळवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  यातील "फिटनेस की डोस आधा घंटा रोज" मोहिमेद्वारे,नागरिकांनी रोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा संकल्प करण्यासाठी आवाहन केले जात आहे.

फिट इंडिया फ्रीडम रन  2.0  च्या यंदाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये प्रतिज्ञा, राष्ट्रगीत सादर करणे, फ्रिडम रन, कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम, सहभागासाठी युवा स्वयंसेवकांमध्ये जागरूकता आणि त्यांच्या गावांमध्ये अशाच फ्रीडम रनचे आयोजन यांचा समावेश आहे.

समाजातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पंचायत राज  प्रतीनिधी , सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, प्रसारमाध्यमे, डॉक्टर, शेतकरी आणि लष्कराच्या जवानांना त्यांनी विविध स्तरांवर या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, कार्यक्रमात सहभागी व्हावे,  लोकांना प्रोत्साहित करावे, प्रेरित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

लोक फिट इंडिया पोर्टल https://fitindia.gov.in वर नोंदणी करू शकतात आणि आपली दौड  अपलोड करू शकतात. तसेच या उपक्रमाचा आपल्या सोशल मिडिया हँडलवरुन #Run4India आणि #AzadikaAmritMahotsav वरून प्रोत्साहनही देऊ शकतात.

***

JPS/SP/SC/DY

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1745236) Visitor Counter : 306