संरक्षण मंत्रालय

फुटबॉलची 130 वी ड्यूरँड चषक 2021 स्पर्धा 5 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोलकाता येथे होणार

Posted On: 12 AUG 2021 10:07AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 12 ऑगस्ट 2021


कोविड-19 महामारीमुळे एक वर्ष भरविता न आलेली, जगातील तिसरी सर्वात प्राचीन आणि आशियातील सर्वात प्राचीन ड्यूरँड चषक फुटबॉल स्पर्धा पुन्हा घेतली जाणार आहे.अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, भारतीय फुटबॉल संघटनेचा पश्चिम बंगाल विभाग आणि पश्चिम बंगाल सरकारच्या भरघोस पाठिंब्यामुळे या वर्षी ड्यूरँड चषक फुटबॉल स्पर्धेचे 130वे आयोजन हा मोठा उल्लेखनीय कार्यक्रम असणार आहे.


ही प्रतिष्ठित स्पर्धा हिमाचल प्रदेशमधील दागशाई येथे 1888 मध्ये सर्वात प्रथम भरविण्यात आली आणि भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव मॉर्टीमेर ड्यूरँड यांच्या नावावरून या स्पर्धेचे नामकरण करण्यात आले. ब्रिटीशांच्या सैन्याचे आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्याच्या उद्देशाने सुरुवातीला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असली तरी नंतर ती स्थानिक नागरिकांना खेळण्यासाठी खुली करण्यात आली. सध्या ही स्पर्धा जगातील अनेक प्रमुख स्पर्धांपैकी एक समजली जाते. या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात, मोहन बागान आणि पूर्व बंगाल या संघांनी प्रत्येकी 16 वेळा ड्यूरँड चषक जिकल्यामुळे  हे संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ समजले जातात.


या स्पर्धेतील विजेत्या संघाला राष्ट्रपती चषक (सर्वात प्रथम डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिला गेला), ड्यूरँड चषक (स्पर्धेतील मूळ बक्षीस- फिरता चषक) आणि शिमला चषक (शिमल्याच्या नागरिकांनी 1903 मध्ये या पारितोषिकाची सुरुवात केली, हा देखील फिरता चषक आहे) असे तीन चषक दिले जातात.


या स्पर्धेच्या आयोजनाचे दिल्ली हे पूर्वीचे ठिकाण बदलून 2019 मधील स्पर्धा कोलकाता येथे भरविण्यात आली आणि त्यात अंतिम फेरीत मोहन बागान संघाला 2-1 असे पराभूत करून गोकुलम केरळचा संघ विजयी ठरला. या वर्षी 5 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर अशी चार आठवडे कालावधीची ही स्पर्धा कोलकाता येथे भरविण्यात येत आहे. या स्पर्धेतील विविध सामने कोलकाता शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी खेळविले जातील. भारतीय सैन्यदलांच्या चार संघांसह एकूण सोळा संघ या वर्षीच्या स्पर्धेत भाग घेऊन मानाचे चषक मिळविण्यासाठी खेळताना उत्तम स्पर्धात्मकता आणि खऱ्या खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविण्यासाठी सिध्द झाले आहेत.


 

***

MI/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745089) Visitor Counter : 286