उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कार्यभार स्वीकारल्याला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उपराष्ट्रपती कार्यालयाकडून ई-बुक प्रकाशित


गेल्या वर्षभरात 22 उद्‌घाटन समारंभासह एकूण 133 कार्यक्रमांना उपराष्ट्रपतींची उपस्थिती

मातृभाषेला प्रोत्साहन देण्यासंदर्भात भारतीय भाषांमध्ये अधिकाधिक लिखाण

राज्यसभेची उत्पादकता 2020-21 या वर्षात अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत 95.82% ने वाढली, या वर्षभरात 44 विधेयके मंजूर झाली, हा गेल्या चार वर्षातील सर्वाधिक आकडा

राज्यसभेच्या यूट्यूब वाहिनीची प्रेक्षकसंख्या गेल्या चार वर्षात 5 लाखांवरून 59 लाखांवर

Posted On: 11 AUG 2021 4:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2021

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम व्यैंकय्या नायडू यांनी पदग्रहण केल्याला आज चार वर्षें पूर्ण झाली. यानिमित्ताने उपराष्ट्रपती कार्यालयाने गेल्या वर्षभरातील उपराष्ट्रपती यांच्या कार्याचा आढावा घेणारे फ्लिप बुक प्रसिद्ध केले आहे. अनेक भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या या ई- बुकमध्ये दिलेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपतींनी गेल्या वर्षभरात देशभरातील दहा राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण 133 कार्यक्रमांना उपस्थिती लावली.  यामध्ये थेट तसेच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेले अशा दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमांचा समावेश आहे, तर 22 उद्घाटन सोहळ्यांचा समावेश आहे.

गेले वर्ष हे कोविड-19 महामारीचे वर्ष होते. या महामारीमुळे जगभरातच जीवित आणि वित्तहानी झाली. या आरोग्यासंबंधित आणीबाणीचा वेध घेत उपराष्ट्रपतींनी आशा आणि उमेद जागवण्यासाठी फेसबूक पोस्ट लिहिल्या तसेच या अभूतपूर्व आरोग्य आणीबाणीतून नागरिकांना दिलासा देणारे लेख लिहिले. धैर्य आणि आत्मविश्वास जागवण्यासाठी प्रोत्साहनपर लिखाणाचा भाग म्हणून

विस्मृतीत गेलेल्या 26 महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या कहाण्या तसेच सेल्युलर तुरुंगात बंदिवास सहन केलेल्या 10 स्वातंत्र्यसैनिकांच्या सर्वसामान्यांना फारशा माहित नसलेल्या कथा सांगणारी मालिका फेसबुकवर लिहिली

या वर्षीच्या एप्रिलमध्ये त्यांनी 'आजादी का अमृत महोत्सवया कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या पंचवीस दिवसीय दांडी यात्रा संस्मरण उपक्रमाच्या समारोपाला दांडी येथे संबोधित केले.   हा उपक्रम म्हणजे देशातील सुप्त सामूहिकशक्तीला आवाहन करणारा होता. भारतीय भाषांचे खंदे समर्थक म्हणून उपराष्ट्रपती ओळखले जातात.

गेल्या वर्षभरात त्यांनी प्रत्येक मंचावर हा भारतीय भाषांचा महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाला त्यांनी बावीस भारतीय भाषांमध्ये ट्विट संदेश पाठवले तर 24 स्थानिक भाषिक वृत्तपत्रात मातृभाषेचे महात्म्य सांगणारे लेख लिहिले. याशिवाय सर्व खासदारांना त्यांच्या मातृभाषेत पत्र लिहून मातृभाषेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. CREST, डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संस्था, CCMB IIT मद्रास अशा अनेक  विज्ञान संस्थांना भेटी देऊन त्यांच्या संशोधन व विकास कामातील नवीन प्रगतीची प्रशंसा केली. राजनैतिक कामाचा भाग म्हणून शांघाय सहकार्य संघटना, शासन प्रमुखांची बैठक या नवी दिल्ली येथे झालेल्या एकोणिसाव्या बैठकीला उपराष्ट्रपती दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहिले.

राज्यसभेचे सभापती म्हणून नायडू सातत्याने देशातील संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी झटत असतात. त्यांनी व लोकसभा अध्यक्षांनी कोविड-19 महामारीच्या कालखंडातही संसदेचे कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी पावले उचलली, परिणामीराज्यसभेची उत्पादकता 2020-21 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत 95.82% ने वाढली. वर्ष 2017 -18 मध्ये ही कार्यक्षमता 48.17% होती.

राज्यसभा टीव्ही ही राज्यसभेची अधिकृत वाहिनी आहे. एम व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली या वाहिनीचे युट्युब नियमित प्रेक्षक संख्या (सबस्क्रायबर्स) गेल्या चार वर्षात 5 लाखांपासून 59 लाखांवर पोहोचली. गेल्या चार वर्षात राज्यसभेत 44 विधेयके पारित झाली आणि आठ राज्यसभा समित्यांकडून 74 अहवाल सादर करण्यात आले. या दोन्हींची संख्या गेल्या चार वर्षातील सर्वाधिक आहे.

 

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1744832) Visitor Counter : 189