पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले संबोधन
Posted On:
03 AUG 2021 5:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी , उप-मुख्यमंत्री नितिन भाई पटेल जी, संसदेतील माझे सहकारी आणि गुजरात भाजपा अध्यक्ष सी. आर. पाटिल, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचे सर्व लाभार्थी, बंधू आणि भगिनींनो,
गेल्या अनेक वर्षात गुजरातने विकास आणि विश्वासाची जी सातत्यपूर्ण प्रक्रिया सुरु केली आहे ती राज्याला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. गुजरात सरकारने आपल्या भगिनी, आपले शेतकरी,आपल्या गरीब कुटुंबांच्या कल्याणासाठी प्रत्येक योजना सेवाभावाने वास्तवात साकारली आहे. आज गुजरातच्या लाखो कुटुंबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एकाच वेळी मोफत शिधावाटप केले जात आहे. हे मोफत शिधावाटप जागतिक महामारीच्या या काळात गरीबांची चिंता कमी करत आहे, त्यांचा विश्वास वाढवत आहे.हा विश्वास यामुळे आला आहे कारण त्यांना वाटत आहे की आव्हान कितीही मोठे असो, देश त्यांच्याबरोबर आहे. थोड्या वेळापूर्वी लाभार्थ्यांबरोबरच्या चर्चेत मी हा अनुभव घेतला आहे.
मित्रानो,
स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासूनच बहुतांश सर्वच सरकारांनी स्वस्तात भोजन देण्याची घोषणा केली होती. स्वस्त शिधा योजनांची व्याप्ती आणि तरतुदीत वर्षागणिक वाढ होत गेली मात्र त्याचा जो प्रभाव पडायला हवा होता तो मर्यदितच राहिला. देशाची धान्याची कोठारे वाढत गेली, मात्र उपासमारी आणि कुपोषणात तेवढ्या प्रमाणात घट झाली नाही. याचे एक मोठे कारण होते - वितरण प्रणाली प्रभावी नसणे. ही स्थिति बदलण्यासाठी वर्ष 2014 नंतर नव्याने काम सुरु करण्यात आले. नवीन तंत्रज्ञानाला या परिवर्तनाचे माध्यम बनवण्यात आले. कोट्यवधी बनावट लाभार्थ्यांना व्यवस्थेतून हद्दपार करण्यात आले. शिधापत्रिका आधारशी जोडण्यात आली आणि सरकारी शिधावाटप दुकानांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहित करण्यात आले. त्याचा आज परिणाम आपल्यासमोर आहे.
बंधू आणि भगिनींनो,
शंभर वर्षातील सर्वात मोठे संकट देशावर ओढवले आहे. उपजीविका संकटात सापडली, कोरोना लॉकडाउन यामुळे उद्योग व्यवसाय बंद करावे लागले. मात्र देशाने आपल्या नागरिकांना उपाशी झोपू दिले नाही. दुर्दैवाने जगातील अनेक देशांच्या लोकांवर आज संक्रमणबरोबरच उपासमारीचे भीषण संकट ओढवले आहे. मात्र भारताने संक्रमणाची चाहूल लागल्यापासून पहिल्या दिवसापासूनच हे संकट ओळखून त्यावर काम सुरु केले. म्हणूनच आज जगभरात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची प्रशंसा होत आहे. मोठमोठे तज्ञ या गोष्टीची प्रशंसा करत आहेत की भारत आपल्या 80 कोटींहून अधिक लोकांना या महामारीच्या काळात मोफत अन्नधान्य पुरवत आहे. यावर देश 2 लाख कोटींहून अधिक खर्च करत आहे. उद्देश एकच आहे - कुणीही भारतीय उपाशी राहू नये. आज 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदळाच्या कोटयाव्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थीला 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले जात आहेत. म्हणजेच या योजनेद्वारे पूर्वीच्या तुलनेत शिधापत्रिकाधारकांना सुमारे दुप्पट प्रमाणात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जात आहे. ही योजना दिवाळीपर्यंत चालेल. गुजरातमध्येही सुमारे साडे 3 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा आज लाभ मिळत आहे. मी गुजरात सरकारची प्रशंसा करतो कारण त्यांनी देशाच्या अन्य भागातून गुजरातमध्ये कामासाठी आलेल्या मजुरांना प्राधान्य दिले. कोरोना लॉकडाउनमुळे प्रभावित लाखो मजुरांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यामध्ये अनेकजण असे होते ज्यांच्याकडे एकतर शिधापत्रिका नव्हती किंवा त्यांची शिधापत्रिका अन्य राज्यांची होती. गुजरात त्या राज्यांपैकी एक आहे ज्यांनी सर्वप्रथम एक राष्ट्र, एक शिधापत्रिका योजना लागू केली. एक राष्ट्र,एक शिधापत्रिकेचा लाभ गुजरातमधील लाखो मजुरांना होत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
एक काळ होता जेव्हा देशात विकास केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित होता. तिथेही विकासाचा अर्थ एवढाच होता की विशिष्ट भागात मोठमोठे उड्डाणपूल बांधले गेले, रस्ते बांधले गेले, आणि मेट्रोचे काम सुरु झाले. म्हणजे गावे-खेड्यांपासून दूर आणि आपल्या घराबाहेर जे काम होत होते त्यालाच विकास समजले जात होते. गेल्या काही वर्षात देशाने ही विचारधारा बदलली आहे. आज देश पायाभूत विकासावर लाखो कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र त्याचबरोबर , सामान्य माणसाच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी राहण्यास सुलभ असे नवे मापदंड देखील स्थापित करत आहे. गरीबाच्या सक्षमीकरणाला आज सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. जेव्हा 2 कोटी गरीब कुटुंबांना घरे दिली जातात तेव्हा त्याचा अर्थ असतो की ते आता थंडी ,उन, पावसाच्या भीतीपासून मुक्त होऊन जगू शकतील. जेव्हा 10 कोटी कुटुंबांना शौचासाठी घराबाहेर जाण्यापासून मुक्ती मिळते तेव्हा त्याचा असा अर्थ होतो की त्यांचे जीवनमान उंचावले आहे. त्याचबरोबर जेव्हा देशातील गरीब जन-धन खात्याच्या माध्यमातून बँकिंग व्यवस्थेशी जोडला जातो, मोबाईल बँकिंग गरीबाच्या हातात येते तेव्हा त्याला ताकद मिळते, त्याला नव्या संधी मिळतात. आपल्याकडे म्हटले जाते-
सामर्थ्य मूलम्
सुखमेव लोके!
याचा अर्थ असा आहे की, आपल्या जीवनामध्ये सुख असेल तरच त्याआधारे सामर्थ्य प्राप्त होते. ज्याप्रमाणे आपण सुखाच्या मागे धावलो तरी सुख काही प्राप्त करून घेवू शकत नाही आणि सुखासाठी जे काही निर्धारित कार्य असते ते आपल्याला वास्तविक करावे लागते. असे कार्य केले तरच कशाची तरी म्हणजेच सुखाची प्राप्ती होवू शकणार आहे. अगदी तसेच सशक्तीकरणाचेही आहे. आरोग्य, शिक्षण, सुविधा आणि आपली प्रतिष्ठा वाढली तरच सशक्तीकरण होते. ज्यावेळी कोट्यवधी गरीबांना आयुष्मान योजनेतून मोफत औषधोपचार मिळतो, त्यावेही आरोग्य सेवेचे सशक्तीकरण होत असते. ज्यावेळी शहराचं रस्ते गावांनाही जोडले जातात, ज्यावेळी गरीब कुटुंबाला मोफत स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी दिली जाते, मोफत विजेची जोडणी दिली जाते, त्यावेळी या सुविधांमुळे त्या गरीबांचे सशक्तीकरण केले जाते. ज्यावेळी एका व्यक्तीला औषधोपचार, शिक्षण आणि इतर सुविधा मिळतात, त्यावेळी ती व्यक्ती आपल्या उन्नतीच्या दृष्टीने आणि देशाच्या प्रगतीविषयी विचार करायला लागतात. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आज देशामध्ये मुद्रा योजना आहे, स्वनिधी योजना आहे. भारतामध्ये असलेल्या अशा अनेक योजनांमुळे गरीबांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवत आहेत. सन्मानाने सशक्तीकरणाचे माध्यम म्हणजे या योजना आहेत.
बंधू भगिनींनो,
ज्यावेळी सामान्य माणसाला स्वप्ने पाहण्याची, ती पूर्ण करण्याची संधी मिळते, तशी व्यवस्था ज्यावेळी घरापर्यंत पोहोचवली जाते, त्यावेळी त्याच्या जीवनामध्ये कसा कायापालट होतो, हे गुजरातला खूप चांगले माहिती आहे, गुजरातने चांगले अनुभवले आहे. कधी काळी गुजरातच्या एका खूप मोठ्या भागातल्या लोकांना, माता- भगिनींना पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत होती. परंतु आज, सरदार सरोवर धरणामुळे, साउनी योजनेमुळे, कालव्यांचे जाळे तयार करण्यात आल्यामुळे, कच्छमध्येही माता नर्मदेचे पाणी पोहोचत आहे. नर्मदेचे पाणी कच्छमध्ये पोहोचू शकेल, असा कोणी याआधी विचारही केला नव्हता. या प्रयत्नांचे परिणाम म्हणजे, आज गुजरातमध्ये अगदी शंभर टक्के, नळाव्दारे पेयजल उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य गाठण्याच्या अगदी जवळ आले आहे. गुजरात हे लक्ष्य सहज गाठू शकणार आहे. या वेगाने काम होत असल्यामुळे सामान्य जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन येत आहे. असेच परिवर्तन आता हळूहळू संपूर्ण देशामध्येही होत असल्याचे सर्वांना जाणवत आहे, दिसून येत आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक दशकांनंतरही देशामध्ये फक्त तीन कोटी ग्रामीण परिवारांना नळाव्दारे पाणी पुरवठ्याची सुविधा मिळू शकली होती. आज मात्र जल जीवन अभियानाअंतर्गत देशभरामध्ये अवघ्या दोन वर्षांच्या आत साडे चार कोटींपेक्षा जास्त परिवारांना जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट करून घेतले आहे.
बंधू आणि भगिनींनो,
डबल इंजिनाच्या सरकारचा लाभही कितीतरी मिळू शकतो, याचाही गुजरातला सातत्याने अनुभव आहे. आज सरदार सरोवर धरणामुळे विकासाची नवीन धारा वाहू लागली आहे, इतकेच नाही; तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या रूपाने संपूर्ण विश्वामध्ये सर्वात उंच, मोठ्या पुतळ्याविषयीचे आकर्षण वाढते आहे. हे आकर्षण गुजरातमध्येच आहे. कच्छमध्ये स्थापित होत असलेल्या नवीकरणीय ऊर्जा पार्कमुळे गुजरातला संपूर्ण विश्वाच्या नवीकरणीय ऊर्जा नकाशावर मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. गुजरातमध्ये रेल्वे आणि हवाई संपर्क व्यवस्था आधुनिक बनविण्यासाठी आणि ती अधिक व्यापक बनवण्यासाठी मोठे, भव्य पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. गुजरातमधल्या अहमदाबाद आणि सूरत या शहरांमध्ये मेट्रो संपर्क व्यवस्थेचा विस्तार वेगाने केला जात आहे. आरोग्य दक्षता आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही गुजरातमध्ये कौतुकास्पद काम होत आहे. गुजरातमध्ये तयार झालेल्या चांगल्या वैद्यकीय पायाभूत सुविधामुळे 100 वर्षांतल्या सर्वात मोठ्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळामध्ये सेवेचे नियोजन करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
मित्रांनो,
गुजरातसहित संपूर्ण देशामध्ये अशी अनेक कामे झाली आहेत, त्यांच्यायोगे आज प्रत्येक देशवासियाचा, प्रत्येक क्षेत्राचा आत्मविश्वास वाढतोय. हा आत्मविश्वासच आज प्रत्येकाला येणारे प्रत्येक आव्हान पार करण्याचे, प्रत्येक स्वप्नपूर्ती करण्यासाठी एक खूप मोठे सूत्र बनतोय. आजचे अगदी ताजे उदाहरण आहे. ऑलिपिंक्समध्ये आपल्या खेळाडूंनी केलेले प्रदर्शनाचे घेवू. यावेळी ऑलिपिंक्समध्ये भारताच्या सर्वात जास्त खेळाडूंनी पात्रता फेरी पार केली आहे. आपण विशेष लक्षात घेतले पाहिजे की, हे कार्य सर्वांनी 100 वर्षांतल्या सर्वात मोठ्या वैद्यकीय आणीबाणीला तोंड देत केले आहे. या खेळाडूंनी फक्त पात्रता फेरी जिंकली असे नाही, तर त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून टक्कर दिली आहे. आपले खेळाडू प्रत्येक खेळ प्रकारामध्ये स्वतःचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करीत आहेत. या ऑलिपिंकमध्ये नवीन भारताचा तगडा आत्मविश्वास आपल्याला प्रत्येक खेळामध्ये दिसून येत आहे. ऑलिपिंक्समध्ये उतरलेले आपले खेळाडू आपल्यापेक्षा चांगली कामगिरी करणारे, वरची क्रमवारी असलेल्या खेळाडूंना, संघांना आव्हान देत आहेत. भारतीय खेळाडूंचा उत्साह, त्यांचा जोश आणि खिलाडू वृत्ती, आज सर्वोच्च स्तरावर आहे. ज्यावेळी खेळाडूंमधले योग्य गुण, कौशल्य, ओळखून खेळाडूंची निवड केली गेली की, हा असा आत्मविश्वास दिसून येतो. खेळाडूंच्या गुणांना प्रोत्साहन मिळते. ज्यावेळी व्यवस्था बदलते, व्यवस्था पारदर्शक बनते, त्याचवेळी हा आत्मविश्वास येत असतो. हा नवीन आत्मविश्वास नव भारताची ओळख बनत आहे. हा आत्मविश्वास आज देशाच्या कानाकोप-यात, प्रत्येक लहान-लहान गावांमध्ये मोठ्या गावांच्या गल्ली बोळांमध्ये, गरीब, मध्यम वर्गातल्या युवा भारतामध्ये येत आहे.
मित्रांनो,
या आत्मविश्वासानेच आपल्याला कोरोनाविरोधातल्या लढाईमध्ये आणि आपल्या लसीकरण अभियानामध्ये पुढे जायचे आहे. वैश्विक महामारीच्या या काळामध्ये आपल्याला सातत्याने सतर्क राहिले पाहिजे. देश आता 50 कोटी लोकांच्या लसीकरणाचा टप्पा पार करण्यासाठी वेगाने वाटचाल करीत आहे. तर गुजरातही साडे तीन कोटी लसीकरणाचा टप्पा गाठण्याच्या जवळ आला आहे. आपल्या सर्वांना लस तर घ्यायची आहे, मास्कही लावायचा आहे, आणि जितके शक्य आहे, तितके गर्दीपासून दूर रहायचे आहे. आपण दुनियेमध्ये पाहतोय की, जिथे जिथे मास्क लावण्याचे निर्बंध काढून टाकण्यात आले होते, त्या भागांमध्ये काही दिवसांनी पुन्हा मास्क लावण्याचा आग्रह केला जात आहे. दक्षता आणि सुरक्षितता यांचा बरोबरीने विचार करून आपल्याला पुढे जायचे आहे.
मित्रांनो,
आज ज्यावेळी आपण अन्न योजनेविषयी इतका मोठा कार्यक्रम करीत आहोत, तर मी आणखी एक संकल्प देशवासियांना देवू इच्छितो. हा संकल्प आहे, राष्ट्र निर्माणाची नवीन प्रेरणा जागृत करण्याचा ! स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनादिनीनिमित्त, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये, आपण हा पवित्र संकल्प केला पाहिजे. या संकल्पामध्ये, या अभियानामध्ये गरीब-श्रीमंत, महिला-पुरूष, दलित-वंचित असे सगळेजण समसमान भागीदार आहेत. गुजरातने आगामी वर्षात आपले सर्व संकल्प सिद्धीस न्यावेत, विश्वामध्ये आपली गौरवशाली ओळख अधिक मजबूत करावी. या कामनेबरोबर मी आपले भाषण समाप्त करतो. पुन्हा एकदा अन्न योजनेच्या सर्व लाभार्थींना खूप- खूप शुभेच्छा!!!......
Jaydevi PS/S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1741920)
Visitor Counter : 378
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam