युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागासह संपूर्ण देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत : केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर

Posted On: 02 AUG 2021 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2021

 

महत्त्वाचे मुद्दे

  • ‘खेलो इंडिया योजने’चा भाग असलेल्या  ‘प्रतिभा शोध आणि विकास’ उपक्रमाअंतर्गत पात्र खेलो इंडिया क्रीडापटू निश्चित करून त्यांची या योजनेसाठी निवड करून त्यातील प्रत्येक क्रीडापटूला वर्षाला 6 लाख 28 हजारांची आर्थिक मदत देण्यात येते.
  • केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशभरात 1000 खेलो इंडिया केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 360 खेलो इंडिया केंद्रे यापूर्वीच सूचित करण्यात आली आहेत.
  • ‘खेलो इंडिया योजने’चा भाग असलेल्या “राष्ट्रीय/प्रादेशिक /राज्यस्तरीय क्रीडा अकादमींना पाठबळ पुरविण्यासाठी” देशभरात  आतापर्यंत 236 क्रीडा अकादमींना मान्यता देण्यात आलेली आहे.   

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागासह संपूर्ण देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत:-

(i) खेलो इंडिया योजना (ii) राष्ट्रीय क्रीडा महासंघाला मदत (iii)आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना विशेष पुरस्कार (iv) गुणवंत क्रीडापटूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि निवृत्तीवेतन (v) पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय क्रीडा कल्याण निधी (vi)राष्ट्रीय क्रीडा विकास निधी आणि (vii)भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून क्रीडा प्रशिक्षण केंद्रांचे परिचालन

या योजनांपैकी बहुतांश योजनांचे लाभार्थी क्रीडापटू देशातील ग्रामीण, मागास, आदिवासी भाग आणि महिलावर्गातील आहेत. या सर्वांना, संबंधित योजनेद्वारे मंजूर असलेल्या निवासी आणि अनिवासी पातळीवर नियमित प्रशिक्षणाचा लाभ मिळत आहे.

खेलो इंडिया योजनेअंतर्गत खालील दोन प्रकारांमध्ये अगदी मुलभूत पातळीपासून प्रतिभा शोध मोहीम राबविण्यात येत आहे:-

  • क्रीडा क्षमतेबाबत प्रतिभा निश्चिती
  • सिद्ध प्रतिभा ओळख 

‘खेलो इंडिया योजने’चा भाग असलेल्या  ‘प्रतिभा शोध आणि विकास’ उपक्रमाअंतर्गत पात्र खेलो इंडिया क्रीडापटू निश्चित करून त्यांची या योजनेसाठी निवड करून त्यातील प्रत्येक क्रीडापटूला वर्षाला दिल्या जाणाऱ्या 6 लाख 28 हजारांच्या आर्थिक मदतीमध्ये किरकोळ भत्ता म्हणून 1 लाख 20 हजार रुपये आणि प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान पाठबळ, आहार, खेळाची साधने, इतर वापराच्या वस्तू, विमा शुल्क इत्यादीमुळे होणारे खर्च भागविण्यासाठी 5 लाख 8 हजार रुपये यांचा समावेश आहे. तसेच विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जिल्हा पातळीवरील या योजनेअंतर्गत सूचीत केलेल्या प्रत्येक खेलो इंडिया केंद्राला प्रत्येक क्रीडाप्रकारासाठी 5 लाख रुपये एकदाच दिले जाणारे अनुदान म्हणून आणि 5 लाख रुपयांचे पुनरावर्ती अनुदान मिळणार आहे. 

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1741607) Visitor Counter : 279