पंतप्रधान कार्यालय

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथील प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन

Posted On: 31 JUL 2021 4:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जुलै 2021

 

आपल्या सर्वांशी संवाद साधून मला खूप छान वाटले. दरवर्षी माझा असा प्रयत्न असतो, की आपल्यासारख्या तरुण मित्रांशी संवाद साधावा, आपले विचार जाणून घ्यावे. आपण सांगितलेल्या गोष्टी आपले प्रश्न, आपली उत्सुकता, हे सगळे मला भविष्यातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

मित्रांनो,

यावेळी हा संवाद अशा काळात होतो आहे, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या वर्षीची 15 ऑगस्ट ही तारीख, आपल्यासोबत स्वातंत्र्याचा 75 वा वाढदिवसही घेऊन येत आहे.गेल्या 75 वर्षात, भारताने एक उत्तम पोलिस सेवा व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस प्रशिक्षणाशी  संबंधित पायाभूत सुविधांमध्ये देखील गेल्या काही वर्षात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत. आज जेव्हा मी आपल्याशी संवाद साधतो आहे, त्यावेळी, येत्या 25 वर्षांसाठी भारतात कायदा-सुव्यवस्था उत्तम राहील हे सुनिश्चित करण्यात सहभागी होणारे युवक मला दिसताहेत. ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणूनच, आता तुम्हाला एक नवी सुरुवात, एक नवा संकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भविष्याची वाटचाल करायची आहेत.

मित्रांनो.

मला कल्पना नाही, की आपल्यापैकी किती लोक दांडी इथे गेले आहात, किंवा किती लोकांनी साबरमती आश्रम पाहिला आहे. मात्र, मी आज आपल्याला 1930 च्या दांडी यात्रेचे स्मरण करुन देऊ इच्छितो. गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह करुन, त्याआधारे , इंग्रज सरकारचा पाया हलवण्याचा इरादा व्यक्त केला होता. त्यांनी त्यावेळी हे देखील म्हटले होते, की “जेव्हा साधने न्याय्य आणि योग्य असतात, त्यावेळी देव देखील आपली मदत करायला आपल्यासोबत असतो.”

मित्रांनो,

एका छोट्याश्या जमावाला सोबत घेऊन महात्मा गांधी साबरमती आश्रमातून बाहेर पडले होते. एकेक दिवस जात होता आणि जे लोक जिथे होते, तिथूनच मीठाच्या सत्याग्रहात सहभागी होत होते. 24 दिवसांनी ज्यावेळी गांधीजी दांडीला पोहोचले. त्यावेळी संपूर्ण देश, एकप्रकारे हा देशच त्यांच्यासोबत उठून वाटचाल करत होता, काश्मीरपासून ते कन्याकुमारी, अटक पासून ते कटक पर्यंत. संपूर्ण हिंदुस्थानात एक चेतनामय वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळेची मनोभावना लक्षात घ्या, संपूर्ण जनतेची एकवटलेली इच्छा शक्ति आठवा. याच प्रेरणेने, याच ऐक्यभावनेने भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाला सामूहिक शक्तिने भारुन टाकले होते. आज देशाला, तुम्हा युवकांकडून परिवर्तनाची तीच भावना, संकल्प आणि  तिच इच्छाशक्ति अपेक्षित आहे. 1930 पासून 1947 पर्यंत, देशात जी चेतना, जी प्रेरणा होती, ज्या प्रकारे देशातील युवक एकत्र होऊन पुढे आले होते, एक लक्ष्य घेऊन, युवा पिढी एकजूट झाली होती, तीच मानसिकता, तीच दृढ इच्छाशक्ति आज आपल्यामध्ये देखील अपेक्षित आहे.

आपल्या सर्वाना याच भावनेने काम करावे लागेल. हाच संकल्प मनात घ्यावा लागेल. त्या काळात देशातले लोक, विशेषतः देशातील युवक, स्वराज्यासाठी लढत होते, आज आपल्याला सुराज्यासाठी अखंड मेहनत करायची आहे. त्या काळातील लोक स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायला तयार होते. आज आपल्याला देशासाठी जगण्याची भावना घेऊन पुढे जायचे आहे. 25 वर्षानी, जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी आपली पोलीस सेवा कशी असेल, किती सशक्त असले, हे सगळे आपल्या आजच्या कार्यावर अवलंबून आहे. आपल्याला तो पाया रचायचा आहे, ज्यावर, 2047 च्या भव्य, शिस्तबद्ध भारताची इमारत बांधली जाईल.काळाने या संकल्पपूर्तीसाठी तुमची निवड केली आहे. आणि म्हणूनच मी हे तुम्हा सर्वांचे सौभाग्य मानतो. आपण सगळे अशा काळात आपल्या कारकीर्दीची सुरुवात करत आहात, जेव्हा भारत प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक टप्प्यावर परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जातो आहे. आपल्या कारकीर्दीची येणारी 25 वर्षे भारताच्या विकासातील सर्वात महत्वाची 25 वर्षे ठरणार आहेत. म्हणूनच आपली तयारी, आपली मनोवस्था, याच मोठ्या उद्दिष्टासाठी अनुकूल असायला हवी. येत्या 25 वर्षात आपण सगळे देशातील वेगवेगळ्या भागात, वेगवेगळया पदांवर काम करणार आहात. वेगवेगळ्या भूमिका पार पडणार आहात.

आपल्या सर्वांवर एक आधुनिक, प्रभावी आणि संवेदनशील पोलीस सेवा व्यवस्था निर्माण करण्याची खूप मोठी जबाबदारी आहे आणि म्हणूनच, आपल्या सर्वाना हे नेहमीच लक्षात ठेवायचे आहे की तुम्ही पुढची 25 वर्षे एका विशेष अभियानासाठी कार्यरत आहात आणि भारताने या खास कामासाठी तुमची निवड केली आहे.

मित्रांनो.

जगभरातील अनुभव आपल्याला सांगतात की जेव्हा कोणतेही राष्ट्र विकासाच्या मार्गाने पुढे वाटचाल करत असते, त्यावेळी देशाबाहेर आणि देशाच्या आतही तेवढीच आव्हाने निर्माण होतात, अशावेळी, तंत्रज्ञानाच्या उलथापालथीच्या या जगात, पोलिसिंगसाठी  सदैव तयार असणे हे आपल्यासमोरचे मोठे आव्हान आहे. गुन्ह्यांच्या नवनवीन पद्धतींना त्यापेक्षाही अभिनव अशा पद्धती शोधून काढत,त्याला आळा घालणे, हे ही तुमच्यासमोरचे आव्हान आहे. विशेषत: सायबर सुरक्षेविषयीचे नवे प्रयोग, नवी संशोधने आणि नव्या पद्धती आपल्या विकसित देखील कराव्या लागतील आणि त्यांची अंमलबजावणी देखील करावी लागेल.

मित्रांनो,

देशाच्या संविधानाने, देशाच्या लोकशाहीने जे अधिकार देशबांधवांना दिले आहेत, जी कर्तव्ये पूर्ण करण्याची अपेक्षा केली आहे, त्या अधिकारांचे रक्षण आणि  कर्तव्याचे पालन होईल, हे सुनिश्चित करण्यात आपली भूमिका महत्वाची आहे. आणि म्हणूनच आपल्याकडून खूप अपेक्षा केल्या जातील, आपल्या आचरणाकडे कायम लक्ष दिले जाते. आपल्यावर अनेक दबाव देखील येतील, आपल्याला केवळ पोलिस ठाणे ते पोलिस मुख्यालय, एवढ्याच मर्यादेत विचार करायचा नाही. आपल्याला प्रत्येक भूमिका, प्रत्येक घटकांची पण ओळख असायला हवी . आपण त्यांच्याशी मित्रत्वाने वागायला हवे. आणि आपल्या गणवेशाची प्रतिष्ठा आणि मर्यादा नेहमी सर्वोच्च ठेवायच्या आहेत. आणखी एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे. आपल्या सेवा, देशातल्या वेगवगेळया जिल्ह्यात असणार आहेत, शहरांत असणार आहेत. म्हणूनच एक मंत्र आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. कार्यरत असतांना आपण जे काही निर्णय घ्याल, त्यात देशहिताचा विचार असायलाच हवा, राष्ट्रीय दृष्टिकोन असायला हवा. आपल्या कार्यक्षेत्राची व्याप्ती आणि समस्या कदाचित नेहमीच स्थानिक असतील. अशा स्थितीत, त्यांचा सामना करताना, हा मंत्र तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. आपल्याला हे कायम लक्षात ठेवायचे आहे, की आपण एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक देखील आहात. त्यासाठी, आपली प्रत्येक कृती, प्रत्येक हालचालीमागे, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हीच भावना असायला हवी.

मित्रांनो,

मी  माझ्यासमोर, तेजस्वी महिला अधिकऱ्यांची नवी पिढी देखील बघतो आहे. गेल्या काही वर्षात, पोलिस दलात, मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले गेले. आमच्या या मुली , पोलिस दलात, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व या सोबतच, विनम्रता, सहजता आणि संवेदनशीलता अशी मूल्ये अधिक सशक्त करत आहेत. याचप्रमाणे, 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आयुक्तालय सुरु करण्यासाठी देखील राज्ये काम करत आहेत. आतापर्यंत 16 राज्यांमधील अनेक शहरात ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मला विश्वास आहे की इतर ठिकाणीई याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील.

मित्रांनो,

पोलीस गस्त अत्याधुनिक आणि अधिक प्रभावी करण्यासाठी, सामूहिकता आणि संवेदनशीलतेसह कार्य करणे खूप महत्वाचे आहे. या कोरोना काळातही, पोलीस सहकाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्यात कशी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे ते आपण बघितलेच आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत आमच्या पोलिसांनी देशवासियांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. या प्रयत्नात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. मी या सर्व जवानांना, पोलिस साथीदारांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि देशाच्या वतीने मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.

मित्रांनो,

आज तुमच्याशी बोलताना, मी तुमच्यासोबत आणखी एक बाजू मांडू इच्छितो. आजकाल, आपण पाहतो की जिथे जिथे नैसर्गिक आपत्ती येते, कुठे पूर, कुठे चक्रीवादळ तर कुठे दरड कोसळण्याच्या घटना तेव्हा आमचे एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सहकारी तिथे पूर्ण तत्परतेने हजर असतात. आपत्तीच्या वेळी एनडीआरएफ चे नाव ऐकल्यावर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होतो. ही विश्वासार्हता एनडीआरएफने त्याच्या उत्कृष्ट कार्याद्वारे निर्माण केली आहे. आज लोकांचा विश्वास आहे की एनडीआरएफचे जवान आपत्तीच्या वेळी स्वतःचे प्राण पणाला लावूनही त्यांचे रक्षण करतील. एनडीआरएफमध्ये सुद्धा, पोलीस दलातीलच जवान असतात जे आपलेच सहकारी असतात. पण हीच भावना, तोच आदर समाजातील पोलिसांबद्दल आहे का? NDRF मध्ये पोलीस आहेत. एनडीआरएफ विषयी आदर आहे. NDRF मध्ये काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचाही आदर केला जातो. पण समाज व्यवस्था तशी आहे का? पण का? तुम्हालाही उत्तर माहीत आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल नकारात्मक धारणा तयार झाली आहे, जी स्वतःच एक मोठे आव्हान आहे. कोरोना कालावधीच्या सुरुवातीला असे वाटले की ही धारणा थोडी बदलली आहे. कारण जेव्हा लोक व्हिडिओ पाहत होते, समाज माध्यमांमध्ये बघत होते की पोलीस कशाप्रकारे गरीबांची सेवा करत आहेत. भुकेल्यांना जेवण देत आहेत. कधीकधी जेवण शिजवून ते गरिबांपर्यंत पोहोचवत आहेत तेव्हा पोलिसांकडे बघण्याचा, त्यांच्याविषयी विचार करण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत होता. पण आता पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी जनतेचा विश्वास का वाढत नाही, विश्वासार्हता का वाढत नाही?

मित्रांनो,

देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, दहशत नष्ट करण्यासाठी, आमचे पोलीस साथीदार अगदी आपल्या प्राणांचे बलिदान देतात. आपण बरेच दिवस घरी जाऊ शकत नाही, सणांच्या वेळी देखील आपल्याला सहसा आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागते. पण जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेची बाब येते तेव्हा लोकांची मानसिकता बदलते. ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी पोलिस खात्यात येणाऱ्या नव्या पिढीची आहे, पोलिसांप्रतीची  ही नकारात्मक धारणा संपली पाहिजे. तुम्हालाच हे करायचे आहे. तुमचे प्रशिक्षण, तुमची विचारसरणी यांच्या बरोबरीनेच वर्षानुवर्षे चालत आलेल्या पोलीस खात्याच्या प्रस्थापित परंपरेला तुम्हाला सामोरे जावे लागणारच आहे. यंत्रणा तुम्हाला बदलते कि तुम्ही यंत्रणेला बदलता, हे  तुमचे प्रशिक्षण, तुमची इच्छाशक्ती आणि तुमचे मनोबल यावर अवलंबून असते. तुमचे हेतू काय आहेत? आपण कोणत्या आदर्शांशी जोडलेले आहात? कोणता संकल्प घेऊन तुम्ही ते आदर्श पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात? हेच फक्त आपल्या वागण्याबद्दल महत्त्वाचे आहे. एक प्रकारे, ही तुमच्यासाठी आणखी एक परीक्षा असेल. आणि मला खात्री आहे, तुम्हीही यात यशस्वी व्हाल, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.

मित्रांनो,

इथे उपस्थित असलेल्या आपल्या शेजारील देशांच्या तरुण अधिकाऱ्यांना मी माझ्या खूप खूप शुभेच्छा देखील देऊ इच्छितो. भूतान असो, नेपाळ असो, मालदीव असो, मॉरिशस असो, आपण सर्वजण फक्त शेजारीच नाही तर आपल्या विचारसरणीत आणि सामाजिक जडणघडणीतही बरेच साम्य आहे. आपण सर्व सुख -दु: खाचे साथीदार आहोत. जेव्हा जेव्हा कोणतेही संकट येते, आपत्ती येते, तेव्हा सर्वप्रथम आपणच परस्परांची मदत करतो. कोरोनाच्या काळातही आपण हे अनुभवले आहे. म्हणूनच, येत्या काळात होणाऱ्या विकासामध्येही आमची भागीदारी वाढेल हे निश्चित आहे. विशेषतः आज जेव्हा गुन्हेगारी आणि गुन्हेगार सीमेपलीकडे असतात, तेव्हा परस्पर समन्वय अधिक महत्त्वाचा असतो. मला खात्री आहे की तुम्ही सरदार पटेल अकादमीमध्ये घालवलेले हे दिवस तुम्हाला तुमचे करिअर, तुमची राष्ट्रीय आणि सामाजिक बांधिलकी आणि भारताशी मैत्री अधिक दृढ करण्यास मदत करतील. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद !

 

* * *

Jaydevi PS/V.Joshi/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1741045) Visitor Counter : 256