सांस्कृतिक मंत्रालय

बुद्धांच्या शिकवणुकीमुळे वसुधैव कुटुंबकम् मुल्याला बळकटी मिळाली : जी. किशन रेड्डी


गुरुपौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्कृती मंत्री सहभागी

Posted On: 24 JUL 2021 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2021

 

सर्व जग एक कुटुंब आहे अर्थात वसुधैव कुटुंबकम् या भारतीय विचाराला बुद्धांच्या शिकवणुकीमुळे बळकटी मिळाली. बौद्ध तत्वज्ञानाने केवळ बौद्धानांच नाही तर सगळ्यानांच खूप काही दिलं आहे, असे केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटले आहे.

आषाढ पौर्णिमा - धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या चित्रफीत संदेशात त्यांनी सांगितले की आजचा दिवस गुरु पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो.

आपण आजच्या दिवशी गुरुप्रंतीचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो. आषाढ पौर्णिमा केवळ जगभरातील बौद्धांसाठीच पवित्र दिवस नाही तर तो मानवतेच्या दृृृष्टीनेही महत्वाचा दिवस आहे., असे ते म्हणाले.

अडीच हजार वर्षांपेक्षाही अधिक काळापूर्वी आजच्याच दिवशी सारनाथ इथे बुद्धांनी शिक्षक म्हणून आपल्या पाच सहाध्यायींना, पहिले प्रवचन दिले होते. हे पाचही जण नंतर तथागतांचे अनुयायी झाले.

एकदा ज्ञानप्राप्ती झाल्यावर मानवतेलाही या ज्ञानाचा लाभ होईल असे बुद्धांनी आश्वस्त केले. बौद्ध आणि हिंदू तत्वज्ञानाचे निकटचे नाते असल्याचेही त्यांनी नमूद केले.

"महाभारताचे लेखक वेद व्यास यांच्या जन्माचाही संबंध गुरु पौर्णिमेशी जोडला जातो. बुद्धांनी दाखवलेले अष्टमार्ग आजही मानवतेसाठी मार्गदर्शक आहेत. शांततेने मिळून राहाण्यासाठी ते विश्वसमुदायाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरत आहेत, असे रेड्डी म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आंतरराष्ट्रीय बौध्द महासंघाचे कौतुक केले. जगभरातील बौद्धांना एक समान व्यासपीठ उपलब्ध करण्याचे महत्वाचे काम ही संघटना करते असे त्यांनी सांगितले.

भारतात यावर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत पर्यटन, संस्कृती मंत्रालये आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघासोबत मिळून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्याचा विचार करत असल्याचे रेड्डी म्हणाले. जगभरातील विद्वानांना बौद्धतत्वज्ञावर विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले जाईल. भारत यंदा स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष "आझादी का अमृत महोत्सव" साजरा करत आहे. यासोबतच बुद्धांचे योगदानही साजरे केले जाईल असे ते म्हणाले. बौद्धतत्वज्ञाचे माहेरघर असलेला भारत बौध्द समुदायाला त्यांचा वारसा आणि तत्वज्ञान यांचा प्रसार करण्यासाठी सहकार्य करेल असंही त्यांनी स्पष्ट केले. बौद्धांच्या वारशाच्या संवर्धन आणि प्रसारासाठी पंतप्रधानांनी खूप प्रयत्न केले. अनेक स्तुपांचा पुनर्विकास केला, यामुळे जगभरातील भाविक भेट देऊ शकतील, असे ते म्हणाले.

बोधगया इथल्या बोधी वृक्षाचे रोप राष्ट्रपती भवनाच्या उद्यानात आज राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी लावले. या कार्यक्रमातही श्री किशन रेड्डी सहभागी झाले.

गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला,सांस्कृतिक क्षेत्रातील आदरणीय सरोजा वैद्यनाथन आणि उमा शर्मा या थोरांच्या निवासस्थानी जाऊन श्री जी. किशन रेड्डी यांनी भेट घेतली.

 

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738641) Visitor Counter : 202