आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
प्रौढांनी मुलांना संवाद साधण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्याशी संबंधित विविध मुद्यांवर त्यांची मते जाणून घेणे महत्वाचे- डॉ राजेश सागर, प्राध्यापक, मानसोपचार विभाग, एम्स आणि केंद्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरणाचे सदस्य
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2021 4:22PM by PIB Mumbai
कोविड महामारीचे लहान मुलांवर होणारे मानसिक परिणाम आणि त्यांची काळजी कशी घ्यायची, याविषयी, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था- एम्स( दिल्ली)च्या मानसोपचार विभागातील प्राध्यापक आणि केंद्रीय मानसिक आजार प्राधिकरणासाजे सदस्य, डॉ राजेश सागर यांनी माहिती दिली आहे.
प्रश्न- कोविड महामारीचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला आहे?
उत्तर- लहान मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या नाजूक,हळवी असतात. कुठलेही ताण-तणाव, काळज्या, धक्के यांचा त्यांच्या मनावर खोलवर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो. सध्या या महामारीमुळे त्यांच्या दिनचर्येतही खूप बदल झाले असून त्यांची खूप कामे बंद झाली आहेत.शाळा बंद आहेत, शिक्षण ऑनलाइन झाले आहे, त्यांच्या मित्रांसोबतचा संवाद थांबला आहे किंवा त्यावरही मर्यादा आल्या आहेत. त्याशिवाय, काही मुले अशीही आहेत ज्यांनी या कोविडमुळे आपल्या पालकांना अथवा जवळच्या व्यक्तींना गमावले आहे.
या सगळ्या परिस्थितीचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर निश्चित परिणाम होऊ शकतो. त्यांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक असलेल्या सकारात्मक भावनिक वातावरणापासून ते वंचित राहिले, तर त्याचेही गंभीर परिणाम होऊ शकतात.
प्रश्न:. अशा तणावग्रस्त मुलांवर उपचार करतांना आपल्यासमोर काय आव्हाने होती?
उत्तर- लहान मुले विशिष्ट परिस्थितीत अनेकदा मोठ्या माणसांपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात. काही मुले आईबाबांच्या जवळ जातात तर काही एकदम अलिप्त होतात. काही आक्रमक होतात, तर कधी निराशही होऊ शकतात.
त्यामुळे, मुलांची मानसिक स्थिती समजून घेणे अनेकदा कठीण असते. मुलांच्या मानसिकतेवर,त्यांच्या भावनिक स्थितीवर आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम निश्चितच होत असतो. कधीकधी तर एखादी परिस्थिती मुलांच्या संपूर्ण भावविश्वाचा ताबा घेते.भीतीचे वातावरण, आजार, किंवा जवळच्या व्यक्तींचा मृत्यू आशा घटनांचा त्यांच्यावर गंभीर परिणाम होतो. कधीकधी ते आपल्या मनातील भीती, अस्वस्थता किंवा चिंता व्यक्तही करु शकत नाहीत.
म्हणूनच घरातील मोठ्यांनी मुलांच्या वर्तनाकडे लक्ष देणे गरजेचे असते. सध्याच्या संकटकाळात, तर मुलांना विविध विषयांवर मोकळेपणानी त्यांची मते व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे , जाणीवपूर्वक त्यांच्याशी संवाद साधायला हवा आहे. जेणेकरून, त्यांच्याशी संबंधित विषयांवर मुले मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतील. त्यांना त्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करुन द्यायला हवे.जर ते बोलू शकत नसतील, तर त्यांना व्यक्त होण्यासाठी चित्र काढणे, रंगवणे, किंवा इतर काही माध्यम उपलब्ध करुन घ्यावे. मुलांच्या मनावर कोविड महामारीचा झालेला परिणाम, त्यांना थेट प्रश्न विचारुन समजून घेता येणार नाही. त्यासाठी त्यांचे पालक, काळजी घेणाऱ्यांनी हळुवारपणे,संवेदनशीलतेने त्यांच्याशी संवाद साधायला हवा, त्यांना बोलतं करायला हवे. अनेकदा, मुलांनाही, त्यांच्या भावनिक ताण-तणावांची कल्पना नसते. त्यामुळेच, त्यांना समजून घेण्यासाठी काही वेगवेगळ्या उपयांचा अवलंब उपयुक्त ठरतो. मात्र, ज्यावेळी तुम्ही त्यांच्याशी महत्वाच्या , कठीण विषयांवर बोलता, जसे की संसर्ग, मृत्यू, त्यावेळी त्यांच्याशी थेट संवाद साधा.
प्रश्न- मुलांच्या आयुष्यातील पहिली पाच-सहा वर्षे, त्यांची मानसिक-शारीरिक घडण ठरवणारी पायाभरणीची वर्षे मानली जातात. अशा काळात, मुलांचा योग्य आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असते. अशा वयाच्या मुलांवर महामारीचा काय परिणाम होतो आहे? हा परिणाम आपण कशाप्रकारे कमी करु शकू, असे आपल्याला वाटते?
उत्तर- मुलांच्या आयुष्यात पहिली पाच वर्षे निश्चितच खूप महत्त्वाची असतात. या काळात आपल्याला मुलांना सर्व प्रकारचे प्रोत्साहन देण्याची गरज असते.सकारात्मक वातावरणाचा अभाव, पुरेसे प्रोत्साहन नसणे अथवा संवाद नसण्याचा विपरीत परिणाम मुलांवर होऊ शकतो. आपण अर्थातच, मुलांना संसर्गाचा धोका होईल, अशा वातावरणात नेऊ शकत नाही. पण आपण त्यांच्यासाठी आनंददायी आणि त्यांना सतत व्यस्त ठेवणारे वातावरण निश्चितच निर्माण करु शकतो.
आपण मुलांसाठी अशा काही गोष्टी शोधून काढायला हव्यात, जिथे ते सुरक्षितही असतील आणि आनंदीही.
ऑनलाइन शिक्षण देखील कृतिशील शिक्षणावर आधारित असावे. अशा मार्गांनी आपण त्यांच्यावर महामारीचा होणारा परिणाम कमी करु शकतो.
प्रश्न-- मोठ्या मुलांनाही शैक्षणिक क्षेत्रातल्या अनिश्चिततेचा सामना करावा लागतो आहे. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
उत्तर- या काळात अशी अनिश्चितता त्यांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. या महामारीने त्यांचे शिक्षण आणि करियरच्या नियोजनावर परिणाम केला आहे. याठिकाणी पालक, मुलांची काळजी घेणारे, शिक्षक यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. अशा सर्वांनी मुलांना समजावून सांगायला हवे की सध्याच्या परिस्थितीत कोणाच्याच फारसे काही हातात नाही.ही अपरिहार्य स्थिती आहे आणि ते एकटेच नाही, तर सगळीच मुले त्याचा सामना करत आहेत, सगळ्यांसमोर त्याच समस्या आहेत. तसेच, पालकांनीही सध्याची वस्तुस्थिती समजून घेत, तिचा स्वीकार करणे आणि मुलांना ती समजेल, अशा स्वरूपात त्यांना सांगणेही महत्वाचे आहे.शिक्षण मंडळे देखील परीक्षा घेण्याबाबत लवचिक भूमिका घेत आहेत. आणि म्हणूनच, मला वाटते ली आपण आता एका ठिकाणी पोचू जिथे मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या भविष्यावर या विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विपरीत परिणाम होणार नाही.
प्रश्न- या महामारीमुळे पालकत्वची जबाबदारी आणि आयामही बदलले आहेत, त्यांच्यासमोरील आव्हानांवर मात करण्याबाबत आपण त्यांना काय सल्ला द्याल?
उत्तर- सध्या कामकाजाची जागा आणि वैयक्तिक आयुष्यातील अंतराची सीमारेषा धुसर झाली आहे, त्यामुळे अनेक पालकांना मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याची अतिरिक्त जबाबदारी पार पाडणे कठीण झाले आहे.प्रत्येक वयोगटाच्या मुलांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यांना वेळ हवा असतो, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असते, काही संसाधने हवी असतात आणि एक आनंदी वातावरण हवे असते. घरात जर तणावाची परिस्थिती असेल, तर त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो. मात्र, सुरक्षित वातावरण त्यांना अशा मानसिक ताण-तणावांपासून मुक्त राहण्यास मदत करेल.
अशा वेळी मुलांशी संवाद साधतांना आधी पालकांच्या मनात सकारात्मक विचार हवेत. तसेच, त्यांची दैनंदिन कामांचे नीट वेळापत्रक आखायला हवे, जेणेकरून ते मुलांनाही वेळ देऊ शकतील.
ज्यांना या ताणतणावांचा सामना करणे कठीण जात आहे, त्यांनी आपले कुटुंब, मित्रमंडळी आणि व्यवसायिक समुपदेशकांची मदत घ्यायला हवी.
***
G.Chippalkatti/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1738145)
आगंतुक पटल : 573