गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केलेल्या प्रकल्पांबद्दल केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी गुजरातची जनता आणि गांधीनगर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने पंतप्रधानांचे मानले आभार
या प्रकल्पांमुळे गुजरातच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होईल –केंद्रीय गृह मंत्री
Posted On:
16 JUL 2021 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या विविध विकास प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. पुनर्विकसित गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानक, अहमदाबाद इथल्या सायन्स सिटी मधली एक्वेटिक गॅलरी आणि रोबोटिक्स गॅलरी आणि नेचर पार्कचा या प्रकल्पात समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. आजचा दिवस हा संपूर्ण गुजरात आणि विशेषकरून गांधीनगर लोकसभा मतदार संघातल्या नागरिकांसाठी अतिशय आनंदाचा असल्याचे शहा यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा गुजरातमधली सर्व विकास कामे जागतिक तोडीची रहावीत यावर त्यांचा कटाक्ष होता आणि त्याप्रमाणेच आखणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याचेच फलित म्हणजे विकासाभिमुख जागतिक दर्जाचे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये उभे आहेत असे सांगून आजच्या योजनेची त्यात भर पडली आहे असे ते म्हणाले. 800 कोटी रुपये खर्चाच्या पुनर्विकसित गांधीनगर राजधानी रेल्वे स्थानकामुळे आणि त्यामधल्या पंच तारांकित हॉटेलमुळे गांधीनगरमध्ये पायाभूत सुविधा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गांधीनगर आणि वरेठा दरम्यानची मेमू सेवा जनतेसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.
सायन्स सिटी मधली एक्वेटिक गॅलरी आणि रोबोटिक्स गॅलरी, विज्ञानात रुची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची ठरेल असे शहा यांनी सांगितले. सागरी विश्वाबद्दल मुलांची जिज्ञासा या एक्वेटिक गॅलरीद्वारे पूर्ण होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या नेचर पार्कचे जैव उद्यानात रुपांतर करण्याची योजना असल्याचेही शहा यांनी सांगितले. गांधीनगर या आपल्या मतदार संघात जागतिक तोडीचे विकास प्रकल्प सुरु होत असल्याबद्दल गुजरातची जनता आणि गांधीनगर लोकसभा मतदार संघाच्या वतीने त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी गुजरातच्या जनतेला दिलेली ही भेट गांधीनगर मतदार संघातल्या लोकंसाठी अतिशय उपयुक्त असून या प्रकल्पांमुळे गुजरातच्या विकासाला नवा आयाम प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
M.Chopade/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736307)