पंतप्रधान कार्यालय

विश्व युवा कौशल्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 15 JUL 2021 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2021

नमस्कार!

विश्व युवा कौशल्य दिनानिमित्त सर्व युवक सहकारीमंडळींना खूप-खूप शुभेच्छा! कोरोना महामारीच्या काळामध्ये आपण दुसऱ्यांदा  हा दिवस साजरा करीत आहोत.

या वैश्विक महामारीच्या आव्हानामुळे विश्व युवा कौशल्य दिनाचे महत्व अनेकपटींनी वाढले आहे. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे- आपण या काळामध्ये स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करीत आहोत. 21व्या शतकामध्ये जन्माला आलेले आजचे युवक, भारताच्या विकास यात्रेला स्वातंत्र्याच्या शतकापर्यंत पुढे घेवून जाणार आहेत. म्हणूनच नवीन पिढीच्या युवकांसाठी कौशल्य विकास ही एक राष्ट्रीय गरज आहे. आत्मनिर्भर भारताचा हा एक मोठा आणि महत्वपूर्ण आधार आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये जो काही पाया तयार झाला आहे, ज्या नव्या संस्था तयार झाल्या आहेत, त्यांची क्षमता एकत्रित करून आपल्याला नवीन पद्धतीने कुशल भारत मिशनला वेग द्यावाच लागेल.

मित्रांनो,

ज्यावेळी एखादा समाज कुशलतेला महत्व द्यायला लागतो, त्यावेळी त्या  समाजाचेही कौशल्य वाढते. समाजाची उन्नती होत असते. संपूर्ण जग ही गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने जाणून आहे. परंतु भारत त्यापुढे दोन पावले जावून विचार करीत आहे. आपल्या पूर्वजांनी कौशल्याला महत्व देतानाच त्यांनी हे काम ‘साजरे’ केले, कुशलता ही समाजाच्या उल्हासपर्वाचा एक भाग मानली होती. आता पहाआपण विजयादशमीला शस्त्रपूजन करतो. अक्षय तृतीयेला शेतकरी बांधव पिकांची, कृषी यंत्रांची पूजा करतात. भगवान विश्वकर्माची पूजा तर आपल्या देशात प्रत्येक कौशल्याशी, प्रत्येक शिल्पाबरोबर जोडले गेलेल्या लोकांच्या दृष्टीने जणू मोठा सण असतो. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे -

विवाहदिषु यज्ञषु, गृह आराम विधायके।

सर्व कर्मसु सम्पूज्यो, विश्वकर्मा इति श्रुतम्।।

याचा अर्थ असा आहे की, विवाह असो, गृहप्रवेश असो अथवा कोणतेही यज्ञ कार्य, सामाजिक कार्य असो, यामध्ये भगवान विश्वकर्माची पूजा, त्यांचा सन्मान जरूर केला पाहिजे. विश्वकर्माची  पूजा म्हणजे, समाज जीवनामध्ये वेगवेगळी रचनात्मक कार्य करणाऱ्या  आपल्या विश्वकर्मांचा सन्मान, कौशल्याचा सन्मान आहे. लाकडाच्या वस्तू बनविणारे कारागिर असोत, धातूकाम करणारे, सफाईकर्मी, बागेचे सौंदर्य वाढविण्याचे काम करणारे माळी, मातीची भांडी बनविणारे कुंभार, हाताने वस्त्र विणणारे विणकर मित्र, असे कितीतरी लोक आहेत, ज्यांना आपल्या परंपरेमुळे विशेष सन्मान दिला आहे. महाभारतामध्येही एका श्लोकामध्ये सांगितले आहे की -

विश्वकर्मा नमस्तेस्तसु, विश्वात्मा विश्व संभवः ।।

याचा अर्थ असा आहे की, ज्यांच्यामुळे या विश्वामध्ये सर्व काही घडणे शक्य आहे, त्या विश्वकर्माला नमस्कार आहे. विश्वकर्माला विश्वकर्मा यासाठीच म्हणतात की, त्यांच्याशिवाय कोणतेही काम, त्यांच्या कौशल्याशिवाय समाजाचे अस्तित्व अशक्य आहे. मात्र दुर्दैवाने गुलामीच्या प्रदीर्घ काळखंडामध्ये कौशल्य विकासाची व्यवस्था आपल्या कार्यपद्धतीमध्ये, आपल्या शैक्षणिक कार्यप्रणालीमध्ये हळूहळू क्षीण होत गेली.

मित्रांनो,

शिक्षणामुळे आपल्याला ज्ञान, माहिती मिळत असते. आपल्याला नेमके काय करायचे आहे, ते विशिष्ट काम वास्तविक स्वरूपामध्ये कसे होणार आहे, हे मात्र कौशल्यामुळेच  शिकता येते. देशाचे कौशल्य भारत मिशन याचा विचार करून, त्याच्या गरजेचा विचार करून तयार केले आहे. त्यामुळे आवश्यकतांच्या पूर्तीसाठी कौशल्य मिशन आहे. ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने’च्या माध्यमातून आत्तापर्यंत सव्वा कोटींपेक्षा जास्त युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, याचा मला आनंद वाटतो.

मित्रांनो,

आज मी आणखी एका घटनेविषयी आपल्याशी बोलू इच्छितो. एकदा कौशल्य विकासासंदर्भात काही अधिकारी मला भेटायला आले होते. मी त्यांना म्हणालो की, तुम्ही सर्व मंडळी या दिशेने इतके प्रचंड काम करीत आहात, मग आपल्याला रोजच्या जीवनात घ्याव्या लागणाऱ्या सेवांची सूची बनविण्याचे काम का करीत नाहीत? याविषयी जाणून तुम्हाला नवल वाटेल, ज्यावेळी त्या अधिकारी मंडळींनी अगदी वरवरच्या सेवांची सूची केली तर, त्यामध्ये 900 पेक्षा जास्त कौशल्यांची कामे करावी लागतात, हे लक्षात आले. या सर्व कौशल्यपूर्ण कामांची आपल्याला आवश्यकता असते, आणि त्यांची सेवा आपल्याला घ्यावी लागते, हे लक्षात आले. यावरून तुम्हाला अंदाज येवू शकेल की, कौशल्य विकास घडवून आणणे किती मोठे काम आहे. शिकताना आपल्याला कमावता आले पाहिजे, शिकताना कमाई थांबून चालणार नाहीही आजची गरज आहे. आज जगामध्ये कुशल कामगारांना खूप प्रचंड मागणी आहे. ज्यांच्याकडे कौशल्य आहे, त्याचीच वाढ, विकास, वृद्धी होणार आहे. ही गोष्ट व्यक्तींच्या बाबतीतही लागू होते आणि देशाच्या बाबतीत लागू होते. दुनियेसाठी एक स्मार्ट आणि कुशल मनुष्यबळाचा पर्याय भारताला देता यावा, ही भावना आपल्या नवयुवकांच्या कौशल्य धोरणाच्या मुळाशी आहे. म्हणूनच, आपल्या युवकांसाठी कौशल्य, पुर्न-कौशल्य आणि उन्नत कौशल्याची मोहीम अविरत सुरू राहिली पाहिजे.

मोठ-मोठे तज्ञ आज अंदाज बांधत आहेत की, ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने तंत्रज्ञानामध्ये परिवर्तन घडून येत आहे, त्यानुसार आगामी 3-4 वर्षांमध्ये खूप मोठ्या संख्येने लोकांना आपल्या कौशल्यांचा विकास म्हणजे पुर्न-कौशल्य प्राप्त करण्याची आवश्यकता भासणार आहे. यासाठीही आपल्याला देशाला सिद्ध केले पाहिजे. आणि कोरोना काळामध्येच आपण सर्वांनी कौशल्य आणि कुशल मनुष्यबळ यांना किती महत्व आहे, हे अगदी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. देश कोरोनाच्या विरोधात इतक्या प्रभावी लढा देवू शकला, यामध्ये आपल्याकडच्या कुशल मनुष्यबळाचे खूप मोठे योगदान आहे.

मित्रांनो,

बाबासाहेब आंबेडकर यांनी युवकांच्या, समाजातल्या दुर्बल घटकांच्या कौशल्यावर खूप भर दिला होता. आज कुशल  भारताच्या माध्यमातून देश बाबासाहेबांच्या दूरदर्शी स्वप्नांच्या पूर्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, आदिवासी समाजासाठी देशाने ‘गोईंग   ऑनलाइन अॅज लीडर्स’ म्हणजेच जीओएएल-‘गोल’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम पारंपरिक कौशल्यांच्या क्षेत्रांविषयी आहे. मग त्यामध्ये कला असो, संस्कृती असो, हस्तकला असो, वस्त्रकला असो, या सर्व गोष्टींमध्ये आदिवासी बंधू-भगिनींना डिजिटल साक्षर बनवून त्यांना नवनवीन संधी मिळाव्यात यासाठी त्यांना कुशल बनविण्यासाठी मदत करणार आहे. यामध्ये उद्योग व्यावसायिकता विकसित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वनधन योजनाही आज आदिवासी समाजाला नवीन संधींबरोबर जोडण्याचे एक प्रभावी माध्यम बनत आहे. आपल्याला आगामी काळामध्ये अशाच पद्धतीने मोहिमेला अधिक जास्त व्यापक बनवायचे आहे. कुशलतेच्या माध्यमातून स्वतःला आणि देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे.

या शुभेच्छांबरोबच आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद!

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735845) Visitor Counter : 230