वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीयूष गोयल यांनी देशातील सनदी लेखापालांना मोठ्या पातळीवर विचार करण्याचे आणि मोठी उंची गाठण्याचे केले आवाहन

Posted On: 01 JUL 2021 8:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2021

 

केंद्रीय रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न तसेच सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज देशातील सनदी लेखापालांना मोठ्या पातळीवर विचार करण्याचे आणि जागतिक पातळीवर मोठी उंची गाठण्याचे आवाहन केले. 73 व्या सनदी लेखापाल दिनानिमित्त ICAI अर्थात भारतीय सनदी लेखापाल संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की आपण आपली मानसिकता संपूर्णपणे बदलण्याची आणि आपल्या व्यवसायातील महत्वाकांक्षा नव्याने निश्चित करण्याची गरज आहे. देशातील कंपन्यांनी विलीनीकरण, अधिग्रहण, भागीदारी आणि अधिक मोठ्या प्रमाणातील उपक्रमांकडे लक्ष द्यावे आणि जागतिक दर्जा गाठावा असे त्यांनी पुढे सांगितले.

गोयल म्हणाले की आता ICAI ला 75 वर्षे पूर्ण होत असताना आपण जगभरातील ग्राहकांना सेवा देणाऱ्या जागतिक दर्जाच्या सनदी लेखापाल कंपन्या तयार करण्याचा विचार करू शकतो का याचा विचार व्हायला हवा. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की विकास पावत असताना या संस्थेने जागतिक दर्जाच्या नैतिक मूल्यांचा, तंत्रज्ञानविषयक माहितीचा आणि कठोर मानकांचा विचार करणे अनिवार्य आहे.ते म्हणाले की जर आपल्याला जगाकडून उत्तम पत, आदर आणि विश्वास मिळवायचा असेल तर आपल्यापैकी प्रत्येक व्यवसायिकामध्ये आपण 100% विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे. प्रत्येक सनदी लेखापाल झालेल्या व्यक्तीने आणि सनदी लेखापाल पदाची पदवी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने या संस्थेचे नाव सतत उज्ज्वल करणे ही स्वतःची जबाबदारी मानावी अशी विनंती त्यांनी केली. देशाच्या प्रगतीमध्ये भागीदार होताना आपण स्टार्टअप परीसंस्थेमध्ये कशा प्रकारे अंतर्भूत होऊ शकतो याकडे लक्ष द्यायला सुरुवात करायला हवी असे गोयल म्हणाले.

सनदी लेखापालांच्या व्यवसायाचे कौतुक करून गोयल म्हणाले की अत्यंत नावाजलेला आणि सन्मान मिळवणारा हा व्यवसाय आहे हे पाहून खूप छान वाटते. सनदी लेखापाल होण्यासाठी  लोक चुरशीने तळमळत असताना दिसतात.या संस्थेने देशाची सेवा करण्याची, व्यावसायिक कर्तव्ये पार पाडण्याची आणि आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे असे मत केंद्रीय मंत्री गोयल यांनी नोंदविले.

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732034) Visitor Counter : 154