रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

जीएसटी मुळे, भारतीय अर्थव्यवस्था, 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


वित्तीय लेखापरीक्षणासोबतच, कामगिरीचे लेखापरीक्षणही आवश्यक असल्याचे प्रतिपादन

Posted On: 01 JUL 2021 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2021

 

जीएसटी, म्हणजेच, वस्तू आणि सेवा करामुळे भारतीय अर्थव्यवस्था, 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आज जीएसटी दिनानिमित्त आयोजित एका विशेष वेबिनारमध्ये, “जीएसटीचा प्रवास आणि भविष्यातील वाटचाल-आत्मनिर्भर भारत” या विषयावर ते बोलत होते. इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडिया ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ते पुढे म्हणाले की, “एक देश, एक बाजारपेठ, एक कर” या विचारातून जीएसटीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या महामारीच्या काळातही व्यापार-उद्योगाला त्यामुळे मदत मिळाली असून पुढेही ही प्रणाली सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

वस्तू आणि सेवा कर प्रणाली एक जुलै 2017 पासून लागू करण्यात आली असून त्याच्या अंमलबजावणीची चार वर्षे आज यशस्वीपणे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षात, व्यवसाय उद्योग चालवण्याच्या पद्धतीत, लक्षणीय बदल झाल्याचे दिसत आहे, असे गडकरी म्हणाले. 

डिजिटलीकरण आणि माहिती-तंत्रज्ञानाचीही यात अत्यंत महत्वाची भूमिका आहे. पारदर्शक आणि कालबद्ध निर्णयप्रक्रिया सुनिश्चित होण्यासाठी, वित्तीय लेखापरीक्षणासोबतच, कामगिरीचे परीक्षण होणेही अत्यंत महत्वाचे आहे, असे गडकरी म्हणाले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या समस्यांबाबत बोलतांना ते म्हणाले की या उद्योगांचे थकीत/प्रलंबित पेमेंट सर्वाधिक चिंतेचे कारण असून ही समस्या सोडवणे अत्यंत आवश्यक आहे.

जीएसटी ने चार वर्षे पूर्ण केली असली तरीही, आजही, त्यात सुधारणा करण्यास वाव आहे, असे गडकरी म्हणाले. या प्रणालीशी संबंधित सर्व घटकांकडून सहकार्य, समन्वय, संपर्क आणि सुधारणेची अपेक्षा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

देशभरातील विविध हितसंबंधीयांसाठी, विविध विषयांवर नियमितपणे वेबिनार्स, सेमिनार्स, विविध अभ्यासक्रम आयोजित करत असल्याबद्दल, त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटट्स ऑफ इंडियाचे कौतुक केले. या माध्यमातून, नवनव्या विषयासंदर्भातील अद्ययावत ज्ञान मिळत असून, आजच्या बदललेल्या जगात टिकून राहण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाची पूर्ण लिंक : https://youtu.be/83c7SBwegX0

 


* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1731919) Visitor Counter : 160