उपराष्ट्रपती कार्यालय
लसीसंदर्भातील साशंकता दूर करण्याची आवश्यकता - उपराष्ट्रपती
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्हायला हवे देशव्यापी जनआंदोलन
वैद्यकीय क्षेत्राने लसीकरणाचे महत्व पटवून देत लोकांना शिक्षित करावे: उपराष्ट्रपतींचे आवाहन
ग्रामीण भागातील लसीकरणावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची सूचना
लसीकरण ही आपली सामूहिक जबाबदारी: उपराष्ट्रपती
आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांनी केलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल, डॉक्टर्स दिवसाचे औचित्य साधत उपराष्ट्रपतींनी मानले आभार
कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी स्वतःचे जीव धोक्यात घातले - उपराष्ट्रपती
Posted On:
01 JUL 2021 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2021
कोविड-19 लसीकरणाच्या महत्वाबाबत लोकांना शिक्षित करण्याची गरज उपराष्ट्रपती एम वैंकेया नायडू यांनी आज व्यक्त केली. या वर्षाच्या शेवटापर्यंत सर्व घटकांनी मिळून संपूर्ण लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. डॉक्टर दिवसानिमित्ताने आज चेन्नई इथे प्रख्यात मुत्रपिंडतज्ञ डॉ जॉर्जी अब्राहम यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी उपराष्ट्रपती बोलत होते. "माय पेशन्ट माय गॉड- जर्नी ऑफ ए किडनी डॉक्टर" हे पुस्तक डॉक्टर अब्राहम यांच्या चार दशकांच्या डॉक्टर, शिक्षणतज्ञ तसेच संशोधक म्हणून केलेल्या प्रवासाचा लेखाजोखा आहे.
काही घटकातील विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची लस घेण्यासंदर्भातील साशंकता दूर करायला हवी, यावर त्यांनी भर दिला. समाजातल्या काही घटकांमधील भीती दूर करायला हवी आणि लसीकरण हे खऱ्या अर्थाने देशव्यापी जनआंदोलन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वैद्यकीय क्षेत्राने याकामी पुढाकार घेत लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे, त्यांना शिक्षित करत जनजागृती करावी असे आवाहनही उपराष्ट्रपतींनी केले.
कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यात समाजाचा पाठिंबा अतिशय महत्वाचा आहे. लस घेण्याबाबत टाळाटाळ करणारे स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या जीवालाही धोक्यात टाकत आहेत, हे त्यांना पटवून द्यायला हवे. हा धोका लसीकरणाने टाळता येणारा आहे असे ते म्हणाले.
राज्ये तसेच केंद्राने "एक भारत" या संघ भावनेनने काम करत लसीकरण अभियानाचा वेग वाढवावा. समाजातील मान्यवर, सिनेजगत, क्रीडापटू, राजकीय नेते यासह विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींनी लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करावे असे आवाहनही त्यांनी केले. लसीकरण ही आपली सामूहिक जबाबदारी हे लक्षात घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
लसीकरणाचा वेग वाढवणे ही कोविड-19 विरोधातल्या लढ्याची गुरुकिल्ली आहे याचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी खास करुन नमूद केले की भारताने आधीच अमेरिकेला मागे टाकत 32 कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार केला आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या त्यागाचाही त्यांनी उल्लेख केला. महामारीच्या काळात कोविडग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी हे कर्मचारी स्वतःच्या जीवाची बाजी लावत असल्याचे ते म्हणाले. भारतीय वैद्यकीय संघटनेच्या आकडेवारीनुसार वैद्यकीय क्षेत्रातील सुमारे 1500 जणांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या क्षेत्राप्रतीची अतुलनीय समर्पणवृत्ती आणि कर्तव्याची घेतलेली शपथ सार्थ ठरवण्याची वचनबद्धता याचे हे महान निदर्शक असल्याचे नायडू म्हणाले. निःस्वार्थ सेवेबद्दल, त्यांनी आरोग्यसेवा क्षेत्राचे आभार मानले, देश त्यांच्या महान त्याग, बलिदानासाठी कायम कृतज्ञ राहील असे नायडू यांनी सांगितले.
यंदाच्या डॉक्टर्स दिवसाची संकल्पना "रक्षणकर्त्याचे रक्षण करा" अशी आहे. कोविड-19 च्या या कठीण काळात अतुलनीय सेवा देत असलेल्या डॉक्टरांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
भारतीय समाजात डॉक्टरांप्रती असणारा आदर, श्रद्धाभाव सांगण्यासाठी 'वैद्यो नारायणो हरी' या उक्तीचा त्यांनी संदर्भ दिला. रुग्णांवर उपचार करताना त्यांच्यासोबत डॉक्टरांनी आपुलकीने वागावे असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले.
आपल्या देशात ज्ञानाची, प्रशिक्षित मनुष्यबळाची प्रचंड क्षमता आहे. या कठिण काळात डॉक्टर, संशोधक, शास्त्रज्ञ यांनी कमी वेळेत प्रभावी लस विकसित केली. पीपीई किट, चाचणी किट आणि व्हेंटिलेटरसारखे अतिआवश्यक साहित्य तयार केले याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
प्रख्यात डॉक्टर, शिक्षणतज्ञ तसेच स्वातंत्र्यसैनिक डॉ बिधान चंद्रा यांची जयंती डॉक्टर दिवस म्हणून साजरी केली जाते, त्यांनाही उपराष्ट्रपतींनी आदरांजली वाहिली.
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731897)
Visitor Counter : 326