रेल्वे मंत्रालय

रेल्वे सुरक्षा बलाने वापरलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे प्रवाशांच्या व रेल्वेच्या अन्य प्रचलनांच्या संरक्षण व सुरक्षिततेत वाढ

Posted On: 25 JUN 2021 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2021

 

भारतीय रेल्वेसाठी संरक्षण व सुरक्षितता हे कायमच प्राधान्यविषय आहेत. आरपीएफ म्हणजे रेल्वे सुरक्षा बलाने प्रवाशांच्या संरक्षण व सुरक्षेखेरीज कोविडकाळात कोरोना विषाणूशी लढत देण्यात भारतीय रेल्वेला मोलाची साथ दिली आहे.

कोविडमुळे अनाथ झालेल्यांच्या सांभाळासाठी आरपीएफने 'त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांना सुरक्षित करा, त्यांचे पुनर्वसन करा' अशा प्रकारची विशेष योजना आखली आहे. रेल्वेस्थानकांवरील/ गाड्यांमधील दुःखी-पीडित बालके किंवा जवळच्या शहर/गाव/रुग्णालयातील जी बालके कोविडमुळे अनाथ झाली असतील त्यांना शोधून काढण्याची मोहीमच आरपीएफने हाती घेतली आहे.

रेल्वेस्थानकांवरील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आरपीएफच्या जवानांनी आपले जीव धोक्यात घातल्याची अनेक उदाहरणे नोंदली गेली आहेत. अशाप्रकारे प्राण वाचविणाऱ्या आरपीएफ जवानांच्या सन्मानार्थ 2018 पासून भारताच्या मा.राष्ट्रपतींकडून 9 जीवन रक्षा पदके आणि 01 शौर्यपदक प्रदान करण्यात आले आहे.

आरपीएफमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची भर्ती केल्याने, स्त्रियांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेकडून होत असलेल्या प्रयत्नांना विशेष गती मिळाली आहे. वर्ष 2019 मध्ये आरपीएफमध्ये 10568 रिक्त पदांवर भर्ती करण्यात आली.  केंद्रीय बलांपैकी आरपीएफ हे स्त्रियांचा सर्वाधिक सहभाग असणारे सुरक्षाबल आहे.

रेल्वेच्या सर्व क्षेत्रांमध्ये आरपीएफने 17 ऑक्टोबर 2020 रोजी 'मेरी सहेली (माझी सखी)' हा उपक्रम सुरु केला. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून एकटीने प्रवास करणाऱ्या स्त्रियांच्या सुरक्षिततेकडे या उपक्रमामुळे विशेष लक्ष दिले जाते. आरपीएफ जवानांपैकी तरुण स्त्रियांची एक तुकडी प्रवास सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत या महिला प्रवाशांच्या संपर्कात असते.

महिला प्रवाशांच्या सुरक्षेमध्ये आरपीएफने मोठी सुधारणा केली असून भैरवी, वीरांगना, शक्ती अशा महिला तुकड्या तयार केल्या आहेत. महानगरांमध्ये सर्व महिला विशेष गाड्यांच्या सुरक्षिततेची आरपीएफ पूर्ण खबरदारी घेत असते. रात्री उशिरा आणि पहाटेच्या उपनगरी गाड्यांमध्ये महिलांसाठी आरपीएफचे जवान आवर्जून तैनात केलेले असतात. तसेच स्त्री-पुरुष समानतेविषयी संवेदनजागृती, आणि प्रवाशांची जनजागृती यासाठीही आरपीएफ नियमितपणे कार्यक्रम आयोजित करत असते.

महिला डब्यांमधून अनधिकृत प्रवास करणाऱ्या लोकांविरोधातही आरपीएफचे जवान सातत्याने कारवाई करत असतात. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या सुमारे  129500 पुरुषांना (2019 पासून ते मे-2021 पर्यंत) रेल्वे कायद्याच्या कलम 162 अन्वये अटक करण्यात आली आणि आरपीएफद्वारे त्यांच्यावर खटलेही चालवण्यात आले.

बालकांच्या सुटकेसाठीही आरपीएफने सदैव महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाशी सल्लामसलत करून एसओपी म्हणजे प्रमाणित प्रचालन प्रक्रियाही तयार करण्यात आली आहे. 2020 पर्यंत 132 स्थानकांवर नामनिर्देशित सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या मदतीने बाल सहाय्य केंद्रेही चालविण्यात येत आहेत. 2017 ते मे 2021या काळात एकूण 56318 बालकांची संकटातून सुटका करण्यात आली आहे. तर 2018 ते मे 2021 या काळात एकूण 976 बालकांना मानवी तस्करांकडून सोडविण्यात आले आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आरपीएफ सातत्याने प्रयत्न करीत असते. तक्रार-निवारण, राहून गेलेले सामान परत मिळवून देणे आणि सुरक्षेशी संबंधित संपर्कयंत्रणा या बाबतींत आरपीएफ अतिशय सक्रिय असते.

2019 पासून ते मे 2021 या काळात राहून गेलेल्या सामानाची 22835 प्रकरणे सोडवून 37.13 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू त्यांच्या त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचविण्यात आरपीएफला यश आले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये (2019-20) अखिल भारतीय रेल्वे सुरक्षा मदत क्रमांक- 182 यावर एकूण 37275 सुरक्षाविषयक समस्या नोंदवल्या जाऊन त्यांची योग्य ती दखल घेतली गेली आहे. दि. 01.04.2021 पासून 182  ही हेल्पलाईन रेलमदत या 139 क्रमांकामध्ये विलीन करण्यात आली आहे. एप्रिल आणि मे 2021 मध्ये, 139 क्रमांकावर आलेले 8258 सुरक्षाविषयक समस्या सांगणारे फोन घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे.

 

* * *

M.Chopade/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730396) Visitor Counter : 174