पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

ओपेक महासचिवांसोबत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेत धर्मेंद्र प्रधान यांनी कच्च्या तेलाच्या किंमतींबद्दल व्यक्त केली चिंता


उत्पादन कपात करू नये यासाठी केले आवाहन

2021 मध्ये भारत सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरण्याचा ओपेकचा अंदाज

Posted On: 24 JUN 2021 8:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 24 जून 2021  

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद  मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी आज ओपेकचे  महासचिव डॉ मोहम्मद सानुसी बरकिंडो यांच्यासमवेत उच्चस्तरीय चर्चा केली. प्रधान यांनी या बैठकीत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि त्याचे ग्राहकांवर तसेच अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणाऱ्या स्मार्ट प्रक्रियांवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली.  कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतावरील चलनफुगवट्याच्या दबावामध्ये भर पडत असल्याच्या बाबीवर त्यांनी जोर दिला.

दोन्ही नेत्यांनी  तेल बाजारातील अलीकडील घडामोडी, तेलाच्या  मागणीतील कल, आर्थिक वाढीचा अंदाज आणि ऊर्जाविषयक आव्हानांवर मात यासह  परस्पर स्वारस्याच्या इतर बाबींवर चर्चा केली.  प्रधान यांनी उत्पादन कपात   थांबवण्याच्या आपल्या विनंतीचा पुनरुच्चार केला आणि  कच्च्या तेलाच्या किंमती, ग्राहक व उत्पादक दोघांच्याही एकत्रित हितसंबंधात राहतील  आणि उपभोगप्रणीत सुधारणेला प्रोत्साहित करतील, यासाठी वाजवी स्तरामध्येच राहाव्यात , यावर त्यांनी भर दिला.

कोविड साथीच्या दुसऱ्या  लाटेत  भारताला केलेल्या साहाय्याबद्दल, विशेषत: औषधे , आयएसओ कंटेनर्स , द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू आणि महत्त्वाची पेट्रोलिअम उत्पादने पुरवल्याबद्दल  प्रधान यांनी ओपेक महासचिव डॉ. बरकिंडो  आणि ओपेकमधील महत्त्वपूर्ण भागीदार देश - सौदी अरेबिया आणि युएई(संयुक्त अरब अमिराती ) यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.   2021 मध्ये भारत सर्वात वेगाने विकसित होणारी बाजारपेठ अर्थव्यवस्था होईल, या ओपेकच्या विश्लेषणावर त्यांनी आनंद व्यक्त केला.

पहिल्या उच्च-स्तरीय ओपेक-भारत  ऊर्जा बैठकीपासून भारत ओपेकबरोबर तांत्रिक सहकार्य,  तज्ज्ञांमधील आदानप्रदान  आणि इतर सहकार्य विस्तारत  आहे.

 

* * *

S.Patil/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1730128) Visitor Counter : 127