आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना डेल्टा प्लस व्हेरीयंट, या सध्याच्या चिंतेच्या विषाणू स्वरूपाच्या हाताळणीबाबत दिला सल्ला

Posted On: 22 JUN 2021 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2021


कोविड-19 च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार सातत्याने बहुस्तरीय आरोग्य यंत्रणा आणि चाचणीच्या पायाभूत सुविधा अधिकाधिक बळकट करत आहे. आणि राज्यांशी समन्वय साधून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील उपाययोजनांवर भर देत आहे. कोविड-19 च्या आजवरच्या प्रवासातील महत्वाच्या काळात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी राज्य सरकारांना आवश्यक त्या सूचना देत, संकटांचा सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना कोविड-19 च्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरीयंट म्हणजे प्रकाराबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तिन्ही राज्यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यांत, केरळच्या पलक्कड आणि पाठ्नामथित्ता जिल्ह्यांत तसेच मध्यप्रदेशातील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यात हा व्हेरीयंट आढळला आहे.

इन्साकॉग ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या चिंतेचा विषय ठरलेल्या या विषाणूच्या स्वरुपाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :-

  • संक्रमणक्षमतेत वाढ
  • फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता
  • मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना सल्ला दिला आहे की या व्हेरीयंटचा सामना करतांना सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना आधीप्रमाणेच अमलात आणायच्या असल्या तरीही, त्या अधिक प्रभावीपणे आणि या व्हेरीयंटच्या रुग्णांकडे बारकाईने लक्ष देत अमलात आणल्या जाव्यात. इंसाकॉग ने निश्चित केलेले या विषाणूच्या संसर्गाचे समूह आणि जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्राविषयीच्या उपाययोजना तातडीने अमलात आणल्या जाव्यात असे निर्देश, राज्यांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. यात गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी संचारावर निर्बंध, चाचण्यांची संख्या वाढवणे, संशयित रुग्णांचा माग अशा उपायांचा समावेश आहे. तसेच या भागात लसीकरणाला वेग देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

कोविड पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या स्वाबचे नमुने ताबडतोब इंसाकॉगच्या प्रयोगशाळांमध्ये पाठवले जावे जेणेकरुन त्यांचे क्लिनिकल परीक्षण लगेच केले जाऊन, राज्यांना त्याविषयी माहिती दिली जाऊ शकेल, अशीही सूचना राज्यांना देण्यात आली आहे.


* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1729507) Visitor Counter : 308