शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी टॉयकेथॉन 2021 च्या भव्य अंतिम सोहळ्याचे केले संयुक्तपणे उद्घाटन
भारताला 100 अब्ज डॉलर्सच्या जागतिक खेळणी उत्पादन बाजारपेठेत स्थान मिळवून देणे हे टॉयकेथॉन 2021 चे उद्दिष्ट
Posted On:
22 JUN 2021 6:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2021
केंद्रीय महिला आणि बालविकास व वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज टॉयकेथॉन 2021 च्या भव्य अंतिम सोहळ्याचे उद्घाटन केले.
भारतीय आणि जागतिक बाजारपेठांसाठी स्वस्त, परवडणारी, सुरक्षित, पर्यावरणास अनुकूल अशी उच्च दर्जाची स्थानिक सामग्री वापरून नवीन आणि नाविन्यपूर्ण खेळण्यांच्या संकल्पनेवर या आंतर-मंत्रालयीन टॉयकेथॉनने भर दिला आहे.
यावेळी बोलताना स्मृती झुबिन इराणी म्हणाल्या की हा ऐतिहासिक क्षण असून देशातील पहिले टॉय हॅकेथॉन जगाला समर्पित केले जात आहे. त्यांनी टॉयकेथॉन 2021 मध्ये अभिनव कल्पना सादर केलेल्या 17,749 वैयक्तिक चमूंचे कौतुक केले. या टॉयकेथॉन ग्रँड फिनालेमधून आणखी अनेक अभिनव कल्पना प्रत्यक्षात साकार होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आपली मुले खेळत असलेली 85% खेळणी आयात केलेली असतात आणि प्रामुख्याने प्लास्टिकपासून बनलेली असतात याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली . शाश्वत विकासाप्रति पंतप्रधानांच्या जागतिक वचनबद्धतेतून प्रेरणा घेऊन त्यांनी संशोधन संस्था आणि खेळणी उत्पादकांना टिकाऊ खेळणी तयार करण्यासाठी आमंत्रित केले.
धोत्रे म्हणाले की भारतीय खेळण्यांची बाजारपेठ सुमारे 1.5 अब्ज डॉलर्स असून सध्या आपण परदेशातून बहुतांश खेळणी आयात करत आहोत. जागतिक खेळण्यांची बाजारपेठ 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. या क्षेत्रांमध्ये आपला वाटा निर्माण करण्यासाठी आपण आपल्या सर्जनशील, नाविन्यपूर्ण आणि उत्पादनक्षम शक्तीचा वापर केला पाहिजे. हे टॉयकेथॉन आपल्या तरुण नवोदित मनांना जगासाठी भारतात खेळणी बनवण्याची संधी देईल. खेळण्यांचा वापर पाठांतरावर आधारित विज्ञान आणि इतर विषयांवरचा भार कमी करू शकेल अशी सूचना त्यांनी केली.
आयात केलेल्या खेळण्यांचे आर्थिक मूल्य खूप जास्त आहे आणि ती आत्मनिर्भर भारतसाठी एक अडथळा आहे अशी चिंता अमित खरे यांनी व्यक्त केली . ते म्हणाले, खेळण्यांच्या आयातीवरील नियंत्रणामुळे आपल्या कारागिरांसाठी नवीन संधी निर्माण होतील. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 5+3+3+4 व्यवस्थेचे समर्थन करते आणि त्यात खेळणी व खेळांच्या माध्यमातून मुलांसाठी सहभाग -आधारित शिक्षणावर भर दिला आहे. यात युवा मनांना आपल्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडण्यात प्रादेशिक भारतीय खेळण्यांचे महत्त्व खूप अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
तीन दिवसांच्या टॉयकेथॉन 2021 च्या अंतिम फेरीसाठी सर्व प्रकारच्या खेळण्यांशी संबंधित सहभागी संघांना सकाळच्या पूर्वार्धात विशेष मार्गदर्शनाच्या सत्राद्वारे मार्गदर्शन केले जाईल आणि उत्तरार्धात सुरुवातीचे दोन दिवस त्यांचे मूल्यांकन केले जाईल आणि त्यानंतर टॉयकेथॉन 2021 डिजिटल आवृत्तीसाठी विजेते घोषित करण्यासाठी सहभागी संघांची निवड फेरी होईल. यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या नाविन्यपूर्ण संशोधन विभागाने 1567 सहभागी संघांसाठी 645 मार्गदर्शक आणि मूल्यांकन तज्ञांना सहभागी करून घेतले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया पहा
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729461)
Visitor Counter : 237