आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

शैक्षणिक उद्देशासाठी किंवा रोजगाराच्या संधींसाठी किंवा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या तुकडीचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या व्यक्तींच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून मानक कार्यप्रणाली जारी


या प्रवाशांच्या पासपोर्टशी कोविन प्रमाणपत्रे जोडण्यात येणार

लस प्रकाराचा "कोविशिल्ड" म्हणून उल्लेख पुरेसा आहे; लसीकरण प्रमाणपत्रात इतर कोणत्याही पात्रता नोंदी आवश्यक नाहीत

Posted On: 07 JUN 2021 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जून 2021


यावर्षी 16 जानेवारीपासून “संपूर्ण सरकार” दृष्टिकोनाअंतर्गत प्रभावी लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकार राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे. लसीकरण मोहिमेचे सार्वत्रिककरण करण्याच्या उद्देशाने सरकारने 1 मे 2021 पासून भारतीय लसीकरण धोरणाच्या तिसर्‍या टप्प्याच्या सुरूवातीला 18 वर्षांवरील सर्व प्रौढांसाठी लसीकरण खुले  केले.

देशातील लोकसंख्येच्या सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी लसीकरण प्रक्रिया सुलभ करण्याचे  केंद्र सरकारने सतत  प्रयत्न केले आहेत. या संदर्भात, कोविशिल्डची पहिली मात्रा घेतलेल्या आणि ज्यांना शैक्षणिक उद्देशाने किंवा रोजगारासाठी किंवा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी  भारताच्या तुकडीचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे मात्र  नियोजित प्रवासाच्या तारखा सध्याच्या पहिल्या मात्रेच्या  तारखेपासून अनिवार्य किमान  84 दिवस पूर्ण होण्याआधी येतात  अशा व्यक्तींना कोविशिल्डची दुसरी मात्रा देण्यास  परवानगी मिळावी  अशा मागणीचे निवेदन  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला अनेक प्रतिनिधींनी पाठवले आहे, त्याची  दखल घेत  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना अशा व्यक्तींचे लसीकरण  सुलभ करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

यासंदर्भात मंत्रालयाने मानक कार्यप्रणाली  (एसओपी) जारी केल्या आहेत ज्या राज्य / केंद्रशासित प्रदेशांना कळवण्यात आल्या आहेत. या एसओपीची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेशांना व्यापक प्रचार आणि सर्व आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली आहे.

मानक कार्यप्रणाली खालीलप्रमाणे आहेतः

सध्या कोविड -19 ((एनईजीव्हीएसी) साठी लस देण्याबाबत राष्ट्रीय तज्ञ गटाने  केलेल्या शिफारसींच्या आधारे राष्ट्रीय कोविड -19 लसीकरण धोरणाअंतर्गत कोविशिल्ड लसीच्या  वेळापत्रकानुसार पहिली मात्रा दिल्यानंतर 12-16  आठवड्यांच्या अंतराने (म्हणजे 84 दिवसांनंतर ) दुसरी मात्रा द्यायची आहे.

ज्यांनी कोविशिल्ड लसीची फक्त पहिली मात्रा घेतली आहे आणि शैक्षणिक उद्देशाने किंवा रोजगाराच्या संधींसाठी किंवा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या पथकातील सहभागासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे मात्र  नियोजित प्रवासाच्या तारखा सध्याच्या पहिल्या मात्रेच्या  तारखेपासून अनिवार्य किमान  84 दिवस पूर्ण होण्याआधी येतात  अशा व्यक्तींना कोविशिल्डची दुसरी मात्रा देण्यास  परवानगी मिळावी  अशा मागणीचे निवेदन अनेक प्रतिनिधींकडून प्राप्त झाल्यानंतर  या विषयावर सक्षम गट 5 (ईजी -5) मध्ये चर्चा केली गेली आणि त्या संदर्भात योग्य शिफारशी प्राप्त झाल्या आहेत.

सर्वांचे लसीकरण  करण्याच्या उद्देशाने आणि अशा वास्तविक कारणास्तव आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्याच्या दृष्टीने  अशा लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा देण्याबाबत पुढील प्रक्रियेचा अवलंब करायचा आहे .

ही विशेष सुविधा त्यांना उपलब्ध असेल...

 1. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेश प्रवास करणार असतील.
 2. ज्या व्यक्तींना नोकरीसाठी परदेशात जावे लागणार आहे
 3. टोकियो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी जाणारे ऍथलीट्स, खेळाडू आणि त्यांच्या सोबत असलेला भारतीय कर्मचारीवर्ग

कोविशील्डची दुसरी मात्रा या कारणांसाठी देण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी प्रत्येक जिल्ह्यात एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी.

पहिली मात्रा घेतल्यानंतर 84 दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी दुसरी मात्रा घेण्याची परवानगी देण्यासाठी हा सक्षम अधिकारी खालील बाबींची पडताळणी करेल:

 1. पहिली मात्रा दिल्यानंतर 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे का
 2. खालील बाबींशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे प्रवासाच्या कारणाची सत्यता-
  1. प्रवेशाचा प्रस्ताव किंवा शिक्षणासाठी झालेला संबंधित अधिकृत पत्रव्यवहार
  2. एखादी व्यक्ती आधीपासूनच परदेशी शिक्षण संस्थेत शिकत आहे का आणि त्या व्यक्तीला ते शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी परतणे आवश्यक आहे.
  3. मुलाखतीसाठी आलेले बोलावणे किंवा नोकरीवर रुजू होण्यासाठी दिलेले ऑफर लेटर
  4. टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मिळालेले मानांकन
 3. अशा व्यक्तींना लसीकरणासाठी पासपोर्टच्या माध्यमातून परवानगी देता येऊ शकेल, जे लसीकरणाच्या परवानगीसाठी मार्गदर्शक नियमांनुसार आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट आहे. जेणेकरून पासपोर्ट क्रमांक प्रमाणपत्रावर मुद्रित करता येऊ शकेल.  पहिली मात्रा घेताना पासपोर्टचा वापर केलेला नसल्यास लसीकरणासाठी वापरलेल्या छायाचित्र ओळखपत्राचे तपशील लसीकरण प्रमाणपत्रावर मुद्रित केले जातील आणि या प्रमाणपत्रावर पासपोर्टच्या उल्लेखाचा आग्रह धरण्यात येणार नाही. जिथे आवश्यकता असेल तिथे सक्षम अधिकारी लसीकरण प्रमाणपत्राशी लिंक केलेले दुसरे प्रमाणपत्र लाभार्थ्याच्या पासपोर्ट क्रमांकासहित जारी करू शकेल.
 4. ही सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध आहे ज्यांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंतच्या कालावधीत उपरोक्त निर्दिष्ट कारणांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची गरज आहे.
 5. कोविड लसीकरण केंद्र आणि एईएफआय व्यवस्थापन इ. संदर्भात मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केल्यानुसार सर्व तांत्रिक नियमांचे पालन करावे लागेल.

हे स्पष्ट करण्यात येत आहे की सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडियाने उत्पादन केलेली आणि डीसीजीआयने मान्यता दिलेली कोविशील्ड ही लस जागतिक आरोग्य संघटनेने 3 जून 2021 रोजी मान्यता दिलेल्या लसींपैकी एक आहे. या लसींच्या यादीत ती चौथ्या क्रमांकावर असून ती खालील लिंकवर पाहाता येईल.

https://extranet.who.int/pqweb/sites/default/files/documents/Status%20of%20COVID-19%20Vaccines%20within%20WHO%20EUL-PQ%20evaluation%20process%20-%203%20June%202021.pdf

लसीकरणाच्या प्रकारात “कोविशील्ड” इतका उल्लेख पुरेसा असून लसीकरणाच्या प्रमाणपत्रामध्ये पात्रतेसाठी इतर माहिती देण्याची गरज नाही.

कोविन प्रणाली लवकरच अशा अपवादात्मक प्रकरणांमध्ये दुसरी मात्रा देण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे.

 

* * *

M.Chopade/S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1725177) Visitor Counter : 285